जमीन
बीटची लागवडीसाठी मध्यम आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. बीटच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा परंतु सामु १० पर्यत असेल तरी उत्पन्नात फारसा फरक पडत नाही. कृष्णेच्या खारवट क्षारयुक्त जमिनीत बीट हा उत्तम पर्याय आहे.
हवामान
बीट वाढीसाठी १५ ते ३५ से. तापमान योग्य आहे. कमी तापमानात साखर उतरत नाही तर जास्त तापमानात कंदाचा आकार बिघडतो. महाराष्ट्रात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात बीट पीक घेता येते.
वाण
डेट्राईट डार्क रेड
आकार - गोल आणि मुलायम
रंग - गर्द लाल (रक्तासारखा)
पाने - गर्द हिरव्या रंगाची व तपकिरी
कालावधी - ८० ते १०० दिवस
क्रीमसन ग्लोब
आकार - निमुळता गोल आणि चपटा
रंग - मध्यम व फिकट लाल
पाने - आकाराने मोठी आणि गर्द हिरव्या रंगाची व तपकिरी
कालावधी - ८० ते १०० दिवस
इतर वाण - क्रॉसब्रॉय इजिप्शीयन आणि अर्ली वन्डर
लागवड
एक हेक्टर लागवडीसाठी बीटरूटचे ७ ते १० किलो बियाणे लागते. बीटचे बी लागण करण्यापुर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास उगवण चांगली होते. बियाणे पेरताना जमिनीत ओलावा असावा. पाभरीने बीटची पेरणी ३० सेंटीमीटर अंतरावर करतात नंतर विरळणी करून एका ठीकाणी एकच रोप ठेवावे. बी टोकून बीटची लागवड करण्यासाठी ४५ सेंटीमिटर अंतरावर सऱ्या कराव्यात आणि वरंब्यावर १५ - २० सेंटीमीटर अंतरावर बिया टोकून लागवड करावी. बीटची लागवड ३०-४५ बाय १५-२० सेंटीमीटर अंतरावर करावी.
विरळणी
बीटच्या बियाण्याची पेरणी केल्यानंतर विरळणी करणे आवश्यक आहे. बिटच्या एका बीजामध्ये २ ते ६ बिया असतात आणि त्यातील प्रत्येक बी उगवू शकते. म्हणून बीटमध्ये विरळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. विरळणी करतांना एका ठीकाणी फक्त एकच रोप ठेवावे. आणि बाकीची रोपे हातांनी काढून टाकावीत.
खते व्यवस्थापन
जमिनीच्या मशागतीची वेळी १५- २० गाड्या शेणखत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. बीटच्या पिकाला ६०-७० किलो नत्र, १०० ते १२० किलो स्फुरद आणि ६०-७० किलो पलाश दर हेक्टरी द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद आणि पलाशची पुर्ण मात्रा बियांची पेरणी करताना द्यावी. नत्राची उरलेली अर्धी मात्रा पेरणीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी द्यावी. हलक्या जमिनीत लागवड केल्यास नत्राची मात्रा वाढवावी.
पाणी व्यवस्थापन
कंदाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला पाण्याचा भरपूर पुरवठा करावा. जमिनीत सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण चांगली होऊन पिकांची वाढ चांगली होते. पिकवाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. रब्बी हंगामात पिकाला ८-१० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
काढणी आणि उत्पादन -
बीटच्या कंदाची वाढ ३ ते ५ सेंमी झाल्यावर काढणी करावी. काढणीनंतर कंदाची प्रतवारी करावी. कंद विक्रीला पाठविण्यापुर्वी त्यांची पाने काढून टाकावीत आणि कंद पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. बीटचे उत्पादन हेक्टरी २५ टन इतके मिळते.
No comments:
Post a Comment