Search here..

Tuesday, June 18, 2013

सिंचन विहिर योजना व विहीर पुनर्भरण

लाभार्थ्याचे निकष
आजपर्यंत सिंचन विहीरीचा कधीच लाभ न घेतलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असून एका विहिरीकरिता जास्तीतजास्त अडीच लाखांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यास प्राप्त होवू शकते. तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी सिंचन विहीर पूर्ण झाल्यावर विद्युत कनेक्शनसाठी वीज वितरण कंपनीद्वारे प्रथम प्राधान्यतेने वीज जोडणी देण्यात येत आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना पूर्वी पंचायत समित्यांच्यामार्फत जवाहर व नरेगा योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरी उपलब्ध होत होत्या. मात्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील प्रवर्गात लाभार्थ्यांनाच त्या विहिरींचा लाभ मिळत होता. राज्य शासनाने निर्णयात दुरुस्ती करुन समाजातील सर्व प्रवर्गासाठी ही योजना खुली करुन ज्या शेतकऱ्यांकडे दीड एकर शेती आहे व ज्या शेतकऱ्याने यापूर्वी कोणत्याही योजनेतून सिंचन विहिरीचा लाभ घेतला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना धडक सिंचन विहिरी उपलब्ध करुन देण्याचे धोरण स्विकारले आहे. लाभार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरुन पंचायत समित्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना सिंचन विहीर उपलब्ध करुन देण्यासाठी विचार केला जातो.

सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांच्या नावावर कमीत-कमी 0.60 हेक्टर जमीन असावी लागते. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन विहिरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक असावी लागते. यासंदर्भात शाखा अभियंता, उपअभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकारी/कर्मचारी जागेची पाहणी करतात. त्याचा अहवाल घेतला जातो, यापूर्वी अर्जदाराने शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबतच विहीर या घटकांच्या शासकीय योजनामधून लाभ घेतलेला नसावा, अशी अट आहे. दोन अथवा तीन लाभार्थ्यांनी त्यांची जमीन सलग/सामुदायिक असल्याने विहिरींची मागणी केली तर सामुदायिकरित्या विहीर मिळण्यास ते पात्र असतील. यासंदर्भात पाण्याचा वापर व पाण्याची हिस्सेवार याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी स्टँपपेपरवर करार करावा. ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालली आहे त्यांचे वारसदार, दारिद्र्यरेषेखालील (बी. पी. एल.) शेतकरी व इतर लाभार्थ्यांना प्राधान्याने याचा लाभ देण्यात येतो.

लाभार्थ्याची जबाबदारी
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांनी निश्चित केलेल्या जागेवर विहीर होणे बंधनकारक असते. कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून लाभार्थ्यांनी 30 दिवसात विहिरींचे काम सुरु करावे व पुढील सहा महिन्यात काम पूर्ण करावे. लाभार्थ्यांने स्वत:चा राष्ट्रीयकृत बँक / इतर बँकेमधील खाते क्रमांक संबंधित गट विकास अधिकाऱ्यास जिल्हा परिषद यांच्याकडे पासबुकाच्या झेरॉक्ससह सादर करावा. विहीरीचे बांधकाम लाभार्थ्याने स्वत: मजुराद्वारे, अन्य पर्यायी साधनांच्या (जेसीबी /पोकलेन सारख्या मशिनच्या सहाय्याने ) काम करण्याची या योजनेत लाभार्थ्यांना मुभा आहे. ही योजना पूर्णत्त्वास गेल्यानंतर सिंचनाची खात्रीशीर सोय उपलब्ध होत असून पावसाच्या पाण्याचा चांगला उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडत आहे. यामुळे धडक सिंचन विहिरींमुळे वर्षभर पाण्याची उपलब्धता राहून उत्पादन वाढीचे उद्दिष्ट लवकर आणि तुलनेने अल्प गुंतवणुकीतून साध्य होत आहे.

विहीर पुनर्भरणाची प्रक्रिया
विहीर पुनर्भरणासाठी विहिरीपासून काही अंतरावर आठ फूट लांब, सहा फूट रुंद व सहा फूट खोलीचा खड्डा खणावा. या खड्ड्याच्या उताराकडे विहिरीच्या दिशेस सुमारे दहा फूट अंतरावर दुसरा एक चार फूट लांब, चार फूट रुंद व सहा फूट खोल आकारमानाचा खड्डा खणावा आणि या खड्ड्यामध्ये दगड, खडी, वाळू व कोळसा यांचे थर भरावेत. पहिला व दुसरा खड्डा एक चर खोदून एकमेकांस जोडावेत. दुसऱ्या खड्ड्याच्या तळापासून 15 सें.मी. उंचीवरून एक पाइप विहिरीत सोडावा. खड्ड्याच्या आतल्या बाजूला कचरा विहिरीत जाऊ नये म्हणून या पाइपास जाळी बसवावी. उतारामुळे वाहत येणारे पाणी पहिल्या खड्ड्यात येऊन साठते. पाण्याबरोबर काही प्रमाणात गाळही येतो व तो खड्ड्यात खाली बसतो.

या खड्ड्यात पाणी भरल्यानंतर ते पाणी दुसऱ्या खड्ड्यात येते. हा दुसरा खड्डा शोषखड्ड्याच्या तत्त्वानुसार तयार केलेला असल्याने, त्यात येणारे पाणी पाइपद्वारे गाळून विहिरीत पडते. जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहणारे पाणी विहिरीत आल्याने विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते; तसेच भूगर्भात पाणीसाठा वाढविण्यासही मदत होते.

विहीर पुनर्भरणासाठी कोणती विहीर निवडावी?
  • ज्या विहिरीला रब्बी हंगामाच्या शेवटी पाणी कमी पडते.
  • विहिरीचे बांधकाम सिमेंटमध्ये अथवा पक्‍क्‍या दगडांत झालेले असावे.
  • विहिरीचे ठिकाण हे साठणाऱ्या पाण्यापासून 50 मीटरच्या आसपास असावे.
  • विहिरीच्या भोवतालची जागा चिबड किंवा पाणथळ होणारी नसावी.
  • सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील विहिरीची निवड करू नये.
  • भुरकट व गडद पाणलोट क्षेत्रातील विहिरी पुनर्भरणासाठी उत्तम ठरतात, त्यातील जलस्तर साठवणुकीसाठी योग्य असतात.