Search here..

Friday, December 26, 2014

दररोज तीनशे लिटर दुधापासून तयार होतात प्रक्रिया पदार्थ

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:

दररोज तीनशे लिटर दुधापासून तयार होतात प्रक्रिया पदार्थ
- संकलन शुभम ठाकरे, नाशिक

कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्ली (ता. करवीर) येथील सदाशिव चौगुले व त्यांच्या कुटुंबीयांनी विविध दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन व विक्री व्यवसायात प्रगती केली आहे. धडपड, संपूर्ण कुटुंबाची मेहनत, पदार्थांचा दर्जा, योग्य सेवेमुळे हा व्यवसाय चांगला बहरू लागला आहे. दररोज पन्नास लिटर दूध संकलनापासून सुरू झालेला हा उद्योग आता तीनशे लिटरपर्यंत विस्तारला आहे. 
राजकुमार चौगुले 

कोल्हापूर शहरापासून सुमारे दहा किलोमीटवर गोकूळ शिरगाव औद्योगिक वसाहतीनजीक नेर्ली गाव आहे. या गावातील सदाशिव चौगुले यांनी दुग्धजन्य पदार्थनिर्मितीत आपला ठसा तयार केला आहे. त्यांची अडीच एकर शेती आहे. सुरवातीला जनावरांचे संगोपन केले. काही काळ सेंटरिंगचे, तसेच पतसंस्थेत क्‍लार्क म्हणून काम केले. त्यानंतर स्वतःकडील 20 ते 25 लिटर दूध व शेजारील पाच गावांतून दूध संकलित करून ते कोल्हापूर येथे दुग्धप्रक्रिया उद्योजकांना पुरवू लागले. अशा प्रकारे दररोज पाचशे लिटर दूध पुरवण्याचा व्यवसाय दहा वर्षे चालला. त्यात कधी प्रक्रियादारांकडून दुधाची मागणी कमी असायची. त्यामुळे दूध शिल्लक राहायचे. हे दूध संघाकडे दिले तरी दर कमी मिळायचा. ही आर्थिक कोंडी फोडण्यासाठी स्वतःच प्रक्रिया उद्योजक व्हायचे ठरवले. 

सुरवात 50 लिटर दुधापासून 
चौगुले यांनी उद्योगाला पन्नास लिटर दुधापासून सुरवात केली. एक लाख रुपये खर्च करून खवा तयार करणारी यंत्रणा आणली. पण दररोज खव्याची विक्री होत नव्हती. मग हळूहळू दही, लस्सी, चक्का, क्रीम, पनीर, खवा, पेढे श्रीखंड, आम्रखंड बासुंदी तयार करायला सुरवात केली. 

बॅंकांचे अर्थसाह्य 
कमी जागेत व्यवसाय सुरू केला आहे. सुरवातीला बॅंकांनी सहकार्य केले नाही. मात्र सहा महिने पाठपुरावा केल्यानंतर बॅंक ऑफ इंडिया व एनकेजीएसबी बॅंकेमार्फत दहा लाख रुपयांचे अर्थसाह्य झाले. यातून विविध यंत्रे आणणे शक्‍य झाले. सुरवातीला उद्योगातील तांत्रिक माहिती नव्हती. एका तज्ज्ञाला उद्योगस्थळी बोलावून त्याच्यामार्फत दोन-तीन महिने प्रशिक्षण घेतले. घरातील अन्य सदस्यांना याबाबतची माहिती दिली. सध्या चौगुले यांच्यासह पत्नी सौ. वसुंधरा, आई गुणवंती, पृथ्वीराज, ऋतुराज ही मुले, असे सर्व कुटुंब या व्यवसायात गुंतले आहे. याशिवाय तीन कर्मचारी आहेत. सध्या खव्यासह श्रीखंड मशिन, क्रीम सेपरेटर, चिलर, तीन फ्रिज, लस्सी मशिन, पॅकिंग मशिन आदी यंत्रसामग्री आहे. 

असा आहे दिनक्रम 
दररोज नजीकच्या सांगवडे व सुळकूड गावातील दूध संस्थांमधून गरजेनुसार अडीचशे ते तीनशे लिटर दूध घेतले जाते. सहकारी संघापेक्षा या संस्थांना लिटरमागे चार ते साडेचार रुपये जास्त दिले जातात. दूध संकलनासाठी स्वतःची स्वतंत्र गाडी आहे. सकाळी लवकर दूध संकलन केल्यानंतर नऊ ते साडेनऊ वाजता प्रक्रिया सुरू होते. 

दही - दररोज शंभर ते एकशेवीस लिटर दुधाचे दही लावले जाते. संध्याकाळी ते तयार होते. रात्री नऊच्या दरम्यान प्लॅस्टिक कपांत (150 ग्रॅम) पॅकिंग करून ते चिलिंगसाठी ठेवले जाते. 

पनीर - सुमारे ऐंशी लिटर दुधापासून पंधरा ते सोळा किलो पनीर दररोज केले जाते. एक किलोचे भाग विक्रीसाठी तयार केले जातात. 

लस्सी - दररोज साठ लिटर दुधापासून साखर, वेलची, केशर अर्क घालून लस्सी बनविली जाते. यासाठी आठ फॅटचे दूध वापरले जाते. मलईयुक्त दह्याचा वापर त्यासाठी होतो. 

श्रीखंड - यासाठी चाळीस ते पन्नास लिटर दुधाचा वापर केला जातो. मलई दही, मलई चक्का वापरला जातो. वीस किलो चक्‍क्‍यात वीस किलो साखर घालून दररोज सरासरी चाळीस किलो श्रीखंड तयार होते. मागणीनुसार आम्रखंड, पेढे, खवा व बासुंदीही तयार केली जाते. सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत अखंडपणे काम सुरू असते. 

तयार केले मार्केट, नियमित ग्राहक 
चौगुले यांनी किरकोळ दुकानदार व हॉटेल असे सुमारे सत्तर ग्राहक तयार केले आहेत. गावाशेजारीच औद्योगिक वसाहत असल्याने त्याचा फायदा दुग्धजन्य पदार्थ विकण्यासाठी झाला आहे. विक्रीसाठी स्वत:ची गाडी आहे. दूध संकलनापासून ते मार्केटिंगपर्यंत सर्व जबाबदाऱ्या ते लीलया सांभाळतात. 
विक्रीसाठी आठवड्याचे काही वार ठरलेले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलांत, कागलसह शेजारील गावांमध्ये पदार्थांची विक्री केली जाते. अशा पदार्थांच्या विक्रीवर मोठ्या दूध संघाचे वर्चस्व असले तरी दर्जा ठेवल्याने आम्ही आमचे खास ग्राहक तयार केले असून, त्यांच्याकडून मागणी होत असल्याचे चौगुले यांनी सांगितले. सर्व व्यवहार रोखीने चालतो. यामुळे थकबाकीचा प्रश्‍न येत नाही. पूर्वी कोल्हापूर शहरात दूध विक्री करीत असताना परतीच्या वेळी अनेक दुकानदारांचे सामान ते बाजारातून घेऊन येत. त्यातून दुकानदारांच्या ओळखी वाढल्या. त्याचा उपयोग पुढे पदार्थ विक्रीसाठी झाला. 

किफायतशीर उद्योग - 

- दररोजचे दूध संकलन - 250 ते 300 लिटर 

दररोजचे उत्पादन 
शंभर लिटर दही प्रति 150 ग्रॅम पॅकिंगला 10 रुपये
पंधरा किलो पनीर 220 रुपये प्रति किलो 
पंधरा किलो श्रीखंड- आम्रखंड - 120 रुपये प्रति किलो 
नव्वद लिटर लस्सी - प्रति 200 ग्रॅमला 10 रुपये 

(मागणी व हंगामानुसार यात बदल होतो. पेढे, बासुंदी किंवा काही पदार्थ दररोज तयार न करता मागणीनुसार बनवले जातात. याशिवाय मोठ्या समारंभासाठी आर्डर्स घेतल्या जातात.) 

- प्रति लिटर दुधावर प्रक्रिया करून त्यातून 15 ते 20 रुपये उत्पन्न मिळते. त्यातून प्रक्रिया, मार्केटिंग व अन्य खर्च वजा जाता नफा शिल्लक राहतो.) 

चौगुले यांच्या व्यवसायाची वैशिष्ट्‌ये 
- दर्जेदार उत्पादन हाच महत्त्वाचा मुद्दा मानून व्यवसाय सुरू केला. 
-वसुंधरा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्‍ट्‌स या फर्मच्या माध्यमातून "पृथ्वी' ब्रॅंडने पदार्थांची विक्री 
- या संस्थेचा परवाना 
* केवळ म्हशींचे दूध वापरून पदार्थ तयार केले जातात. 
* दररोज दूध आणून ताजे पदार्थ तयार केले जातात. यामुळे दर्जा चांगला राहतो. 
* स्वत: विक्री केल्यामुळे पदार्थाच्या दर्जाबाबत ग्राहकांकडून माहिती मिळते. 
* दही व लस्सीला वर्षभर मागणी. औद्योगिक वसाहत नजीक असल्याने अनेक हॉटेलमध्ये दररोज मागणी. 
* प्रतिकूल परिस्थितीतून उभा केला व्यवसाय. 
* व्यवसायात आधुनिकीकरण आणण्यासाठी प्रशिक्षण घेण्याची तयारी. 
* मोठ्या संघांच्या स्पर्धेतही टिकून. 

सदाशिव चौगुले - 9881981154 
~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444