Search here..

Wednesday, December 30, 2015

एक शेतकरी आणि ग्रामीण भागात तुमच्या पासून दूर राहणारा नागरिक म्हणून विनंती मागणी ...

(एक सुज्ञ आणि जागृत नागरिक म्हणून या मेसेजला शक्य तितकी प्रसिद्धी द्या. याबाबत काही शंका किंवा अडचण असेल तर 09975740444 या नंबरवर संपर्क करा.)

प्रति,
महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक परिक्षेत्रात राहणारे,
तुम्ही सर्वजण, नागरिक, शासन, प्रशासन, मीडिया,
हे आणि यांच्याशी संबंधित सर्व जिवंत घटक

यांना नम्र निवेदन,

कृपया, तुमच्या स्तरावरून आम्हास शक्य तितके सहकार्य करावे, कारण हा असा प्रश्न आहे कि तो तुमच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणार नाही.

* शासनाचे हजारो कोटी खर्च करून गुणवत्ता का मिळत नाही?
* समाजात बदल का होत नाही?
* नेहमी विकासासाठी अमुक इतका निधी खर्च केला असे बोलले जाते.... खर्च केला म्हणजे विकास झाला असे कसे म्हणता येईल.
* पैसा शासनाचा, गुणवत्ता तपासणारे शासन, अहवाल करणारे शासन, नियम बनवणार शासन..... कोणाचा कोणाला मेळ नाही.

शासनाचा प्रत्येक अधिकारी एका महत्वाच्या कामात व्यस्त आहे, ते म्हणजे "हे काम माझे नाही, हे काम माझ्या विभागाचे नाही, हे काम माझ्या टेबलवर येत नाही." मग या लोकांना शासन पगार कश्यासाठी देतेय. प्रत्येक कामात चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही. खूप वैतागून जनतेने सत्ताबदल केला आणि बहुमत दिले, तर भारताचे कैवारी परदेशी दौऱ्यात व्यस्त आहेत तर महाराष्ट्राचे कैवारी महत्वाच्या कामात व्यस्त आहेत.

असो, एक शेतकरी आणि ग्रामीण भागात तुमच्या पासून दूर राहणारा नागरिक म्हणून विनंती मागणी एवढीच आहे कि,

१. शेती पिको अगर न पिको, माझीशेती तुम्ही चालवायला घ्या.
२. शेतीसाठी तुम्हाला जमतील तश्या मुलभूत सुविधा द्या अगर न द्या, मला माझ्या जमिनीच्या क्षेत्राप्रमाणे कसण्याचा मासिक मोबदला द्या.
३. माझ्या पोरांना ५० किमी अंतरावर हरतर्हेचे शिक्षण मिळायला पाहिजे.
४. माझ्या पोरांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी शासकीय द्या अगर कंत्राटी द्या पण कायम (किमान वयाच्या ६० वर्षेपर्यंत) भाकरी मिळेल याची शाश्वती द्या.
५. माझ्या घरच्या बायका-पोरींना रात्री-बेरात्री बाहेरून घरी परत सुरक्षित पोहचण्याची हमी द्या.
६. माझ्या पोराबाळांना स्वच्छ पाणी आणि चांगल्या आरोग्याची हमी द्या.
७. माझ्या जाती-धर्मामध्ये आरक्षणाच्या नावाखाली लुडबुड करू नका. हा माझ्या श्रद्धेचा भाग आहे. तुम्हाला आरक्षण द्यायचेच असेल तर आर्थिक निकषांवर द्या.

मला हे पण माहित आहे कि माझ्या वरच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे आणि तुम्ही हे वर्षानुवर्षे करताय असे लेखी सांगाल पण पुन्हा तुमचा सरकारी बाबु आडवा येतोय. तो अगदी गोड, मधुर आणि स्वच्छ वाणीने पटवून देतो कि तो कामात व्यस्त आहे. आता यांचे काम परत सांगावे असे वाटत नाही कारण त्याचा वर उल्लेख केलेलाच आहे.

हे सहज शक्य झाले तर तुमच्यावरील आमचा विश्वास द्विगुणित होईल पण जर याबाबत कुचराई झाली तर अखंड महाराष्ट्रातून जन आंदोलन उभे राहील. याची कृपया नोंद घ्यावी.

____MAHESHBORGE (अध्यक्ष)
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान, सावळज (सांगली) महाराष्ट्र राज्य
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटना, सावळज (सांगली) महाराष्ट्र राज्य
संपर्क - ९९७५७४०४४४, maheshborge@gmail.com

Sunday, November 29, 2015

ढबु / शिमला मिरची



** जमीन
चांगली कसदार व सुपीक लागते. मध्‍यम ते भारी काळी पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन या पिकास योग्‍य आहे. नदीकाठच्‍या पोयटयाच्‍या सुपिक जमिनी लागवडीस योग्‍य आहेत. जमिनीचा सामु 6 ते 7 च्‍या दरम्‍यान असावा.


** लागवड
रोपे तयार करण्‍यास निवडलली रोपवाटीकेची जागा चांगली नांगरून कुळवून तयार करावी. त्‍यानंतर तीन मीटर लागवडीसाठी लांब 1 मीटर रूंद व 15 सेमी उंचीचे गादी वाफे तयार करून वाफयावर चांगले कुजलेले शेणखत घालावे. वाफयांच्‍या रूंदीला समांतर अशा 2 सेमी खोलीच्‍या रेघा ओढून त्‍यांत फोरेट 10 जी हे किटकनाशक 10 ग्रॅम प्रत्‍येक वाफयात टाकून बी पेरावे व ते मातीने झाकून टाकावे व बियाण्‍यांची चांगली उगवण व्‍हावी म्‍हणून वाफयांना झारीने हलकेसे पाणी दयावे. बी 6 ते 8 आठवडयाने लागवडीस तयार होते.

पुर्नलागवड करण्‍यासाठी 60 सेमी अंतराने स-या काढाव्‍यात. रोपे सरीच्‍या दोनही बाजूस सरीच्‍या बगलेत 30 सेमी अंतरावर एका ठिकाणी एक रोप लावून करावे. पूर्नलागवड शक्‍यतो दुपारी 4.00 नंतर करावी. व रोपांना लगेच पाणी द्यावे.

**बियाणे 
लागवडीसाठी अर्का गौरव, अर्का मोहिनी, कॅलिफोर्निया वंडर, यलो वंडर या जातींची शिफारस करण्यात आली आहे. दर हेक्‍टरी 3 किलो बियाणे लागतील. एक किलो बियाण्‍यास पेरणी करण्‍यापूर्वी 2 ग्रॅम थायरम चोळावे.

रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा स्वच्छ असावी. जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करून तीन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि 15 सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादी वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे. वाफ्यावर दोन सें.मी. खोलीच्या दहा सें.मी. अंतरावर रुंदीला समांतर रेघा ओढून घ्याव्यात.नंतर बी पेरणी करावी. प्रति वाफा दहा ग्रॅम बियाणे वापरावे. एक हेक्‍टर ढोबळी मिरची लागवड करण्यासाठी सुमारे 400 ते 500 ग्रॅम बियाण्याची गरज असते. जातीनुसार बियाण्याची गरज बदलू शकते.

** खत व्यवस्थापन
शेणखत - हेक्‍टरी 15 ते 20 गाड्या चांगले कुजलेले 
नत्र - 150 किलो नत्र, 
स्फुरद - 150 किलो  आणि 
पालाश - 200 किलो

संपूर्ण पालाश, स्फुरद आणि शेणखत तसेच अर्धी नत्राची मात्रा लागवड करताना द्यावी. उर्वरित अर्धे नत्र दोन समान हप्त्यांत द्यावे. एक लागवडीनंतर एक महिना व पन्नास दिवसांच्या अंतराने विभागून द्यावे. रासायनिक मिश्रखतांचा उपयोग केल्यास फायदा अधिक होतो. 

** पाणी व्‍यवस्‍थापन
ढोबळी मिरचीला लागवडीपासून सुरुवातीच्‍या वाढीसाठी भरपूर व नियमित पाण्‍याची आवश्‍यकता असते. फूले व फळे लागताना नियमित पाणी दयावे. सर्वसाधारपणे एक आठवडयाचे अंतराने पाणी दयावे.


**रोग व किड व्यवस्थापन 
पीक संरक्षण : (संदर्भ : बावस्कर टेक्नोलॉजी)

१) मर : रोप बाल्यावस्थेमध्ये असताना उन्हाळ्यामध्ये मर होत असते. उगवण व्यवस्थित होऊन रोपातील मर टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून वरील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. लागवडीस तयार झालेली रोपे नंतर पुर्णपणे जर्मिनेटरमध्ये बुडवून लावावीत. त्यामुळे रोपांची मर होत नाही.

२) करपा : रोपे लहान असताना पहिल्या अवस्थेत पाने जाड हिरव्या रंगाची होतात. दुसर्‍या अवस्थेत पाने वाळू लागतात. तिसर्‍या अवस्थेत जुन्या पानांच्या खालील भागावर पिवळे ठिपके पडून करड्या रंगाची अनियमित छटा चकल्यासारखी दिसते. पानाचा तो भाग जळाल्यासारखा दिसतो. या डागांचे प्रमाण वाढत जाऊन पाने जळतात व झाड निकामी होते. काही वेळा रोगाची लागण रोपाच्या बाल्ल्यावस्थेत झाल्यास झाडांचा शेंडा पिवळसर होऊन खालच्या बाजूने पांढर्‍या रंगाची बुरशीही दिसू लागते.

३) चुराडा -मुरडा (बोकड्या ) : या विकृतीचा प्रादुर्भाव फुलकिडे, मावा, तुडतुडे, पांढी माशी आणि विषाणूंमुळे होतो. प्रादुर्भाव झालेल्या झाडावरील पाने आकसतात. त्यातील अन्नरस कमी होतो आणि झाडांची वाढ खुंटते. नवीन पालवी येत नाही. 

ढोबळी मिरचीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत, हार्मोनी फवारण्याची वेळ व प्रमाण -

फवारणी (रोपांवर ) - बी उगवल्यानंतर ८ -८ दिवसांनी - (३० दिवसांत तीन वेळा) जर्मिनेटर २० मिली.+ थ्राईवर २५ मिली + क्रॉंपशाईनर २५ मिली. + प्रोटेक्टंट १ चमचा + प्रिझम २० मिली.+ १० लि.पाणी 

रोपांची लागवड करताना : २५० मिली जर्मिनेटर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १० लि.पाणी या प्रमाणात घेऊन रोपे त्यामध्ये संपूर्ण बुडवून सुकवून लावावीत.

पुन : लागवडीनंतरच्या फवारण्य :

१) पहिली फवारणी :(रोप लावल्यानंतर १५ ते २० दिवसांनी) : जर्मिनेटर ३० मिली.+ थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली. + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + प्रिझम ३० मिली. + हार्मोनी १५ मिली + १५ लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (रोप लावल्यानंतर ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ४० मिली.+ थ्राईवर ४० मिली + क्रॉंपशाईनर ४० मिली. + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + प्रिझम ३० मिली. + न्युट्राटोन २० मिली + हार्मोनी १५ मिली + १५ लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (रोप लावल्यानंतर ४५ दिवसांनी) : थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली. + राईपनर ३० ते ४० मिली + प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + प्रिझम ४० मिली. + न्युट्राटोन ३० ते ४० मिली + हार्मोनी २० मिली + १० लि.पाणी.

४) फळे काढणीच्या सुमारास व नंतर मिरची संपेपर्यंत (७ महिने ) वरील फवारणीनंतर दर ८ ते १५ दिवसांनी : थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली. + राईपनर ४० ते ५० मिली + प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + प्रिझम ४० मिली. + न्युट्राटोन ५० मिली + हार्मोनी २० ते २५ मिली + १५ लि.पाणी.


** काढणी व उत्‍पादन
फळे हिरवीगार व संपूर्ण वाळलेली असल्‍यास फळांची काढणी करावी. त्‍यासाठी फळांच्‍या टोकांच्‍या वाळलेल्‍या स्‍त्री केसरांचा भाग गळून पडलेला असावा. फळे झाडावर जास्‍त काळ ठेवल्‍यास ती पिकतात. काही देशात लाल फळांना जास्‍त मागणी असते. परंतु यामुळे पुढील फळांच्‍या वाढीवर अनिष्‍ट परिणाम होतो व उत्‍पादन कमी मिळते. फळे झाडावरून देठासहीत काढावीत. साधारणपणे दर 8 दिवसांनी फळांची काढणी करावी. अशा 4 ते 5 काढणीत सर्वर पिक निघते.

प्रति हेक्‍टरी ढोबळया मिरचीचे 17 ते 20 टनापर्यंत सरासरी उत्‍पादन मिळते.

Friday, November 27, 2015

माझीशेती: हवामान

माझीशेती: हवामान
(२७ नोव्हेंबर ते ०७ डिसेंबर २०१५)

सोमवार, ३० नोव्हेंबर २०१५ दुपारपर्यंत वातावरण कोरडे राहील. नंतर आकाशात ढग वाढून बुधवार ०२ ऑक्टोबर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता राहील. ०३ ऑक्टोबर नंतर हवामान पुन्हा कोरडे होईल.

तापमान : रात्रीचे किमान तापमान १७℃ आणि दिवसाचे कमाल तापमान ३५℃ दरम्यान राहील.

वारा : पुर्वेकडुन ०३ ते ०९ किमी/ तास वेगाने वाहिल.

आद्रता : सरासरी ५६-६८%

हवादाब : १०१२ hPa

(जास्तीत जास्त शेतकरी या चळवळीत सामावून घ्या. त्यांच्या मोबाईल वरुन खालील प्रमाणे whats app मेसेज करायला सांगा)

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
-----------------------------------
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444

कृषि विस्तारात बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर - इरफान शेख

कृषि विस्तारात बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर

महाराष्ट्राची विशेषतः मराठवाड्याची शेती अविकसित असण्याच्या अनेक कारणा पैकीच एक सर्वात मोठ कारण म्हणजे कृषि तंत्रज्ञानाचा अल्प विस्तार होय. अशी हजारो संशोधन आहेत जी लोकोपयोगी,शेतीतीत अल्प खर्चीक तंत्र आहेत पण दुर्दैवाने ती अद्याप सामान्य शेतकर्‍यांत रूजली, पोचली नाहीत. कृषि विस्ताराच मूलतत्व “ Learning by Doing” ( प्रात्यक्षिकातून शिकणे) हे होय. हे न होण्या मागचा मोठा अडथळा हा कुशल मनुष्य बळाचा अभाव होय.हा प्रश्न आत्ता काही अंशी सुटत असला तरी सुधारनेस आणखीन प्रचंड वाव आहे.सुधारणेचा वेगही कमीच आहे. 
दरम्यानच्या कालावधीत तंत्रज्ञान विशेषतः माहिती तंत्रज्ञानाची प्रगती अतिशय वेगाने होताना दिसते आहे.जादूची कांडी फिरवण्या इतका आयटी क्षेत्राचा वेग वाढतोय. “सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तंत्रज्ञानात शोधणं कदाचीत चूक ठरेलही पण या क्षेत्राचा वापर न करता निव्वळ दुर्लक्ष करन मात्र नक्कीच चूक ठरेल”.
शासकीय पातळीवर कृषि क्षेत्रात माहिती तंत्राचा वापर करण्याचा वेग गरजेपेक्षा कमी आहे पण याला नजुमानता खूप सारी खाजगी मंडळी आता या कृषि क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत, वेगाने आकर्षित होत आहेत. यातल्या मुख्य मुद्द्यावर येण्यापूर्वी आणखीन एक महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी. माझ्या महितीतील एका कृषि मंडळात ३२ गाव आहेत आणि मागच्या साधारणपणे ३ वर्षाहून अधिक कालावधी पासून ४-६ कृषि कर्मचारी/अधिकारी या गावांचे अतिरिक्त वा नियमित काम पहात आहेत. एका कृषि सहाय्यकास २५०० हे. क्षेत्रावर काम करणे अपेक्षित असते पण इथे क्षमतेपेक्षा ४ ते ५ पट अधिक प्रभार आहे. असे अनेक ठिकाणी आहे. असे असताना मग ग्रामस्तरावरील कृषि कर्मचारी प्रतेक शेतकर्‍यां पर्यन्त पोचणे कसे शक्य होईल?
कृषि तंत्रज्ञान प्रसारातील आयटी वापरासाठी शासकीय पातळीच्या प्रयत्नांपुढे जाऊन खालील काही मंडळी काम करत आहेत.

१) भारत४इंडिया.कॉम- वेब चॅनल आणि मोबाईल अॅपद्वारे (व्हीडीओबेस) कृषी क्षेत्रातील घडामोडी, कृषी संस्कृती, संशोधन, यशोगाथा, नवीन प्रयोग, मार्केट तंत्र. शेतकरी आणि ग्राहक यांना जोडणार नवीन माध्यम या बाबत माहिती इथे दिली जात आहे.
२) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस- M Krishi- शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे कृषी सल्ला. ग्राफ, Pictureचा वापर करून कृषि तंत्रज्ञान प्रसारित करण्यात येत आहे.. 
३) थॉमसन रॉयटर्स- रॉयटर्स मार्केट लाईट (myRML): मोबाईल SMSद्वारे शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती, स्पीड, अॅक्युरसी आणि फ्रीडम फ्रॉम बायस या तत्त्वांचं पालन. या सेवेचा भारतभर स्थानिक भाषेत प्रसार हवामान, आणि एप्प्लीकेशनच्या माध्यमातून हवामान अंदाज, नियमीत बाजारभाव,प्रमुख पीक निहाय शेती सल्ला दिला जात आहे.
४) इफको-एअरटेल- IKCL: मोबाईलद्वारे शेतीविषयक माहिती. व्हॉईस मेसेजद्वारे सेवा दिली जात आहे ज्यामुळे अशिक्षित शेतकऱ्यांनाही फायदा मिळतोय.
५) आय.आय.टी., मुंबई- अॅग्रोकॉम: वेबसाईटद्वारे शेतीविषयक माहिती, तज्ज्ञांचं मोठं जाळे आणि युवा शेतकरी मोठ्या प्रमाणात जोडला गेलाय.
६) मायक्रोसॉफ्ट- डिजीटल ग्रीन- व्हीडिओ डॉक्युमेंटरीद्वारे इंडिजीनस कृषी ज्ञानाचा प्रसार. शेतकऱ्यांच्या इनॉव्हेटिव्ह प्रयोगाच्या प्रसारावर भर दिला जात आहे. छोट्याच पण उपयुक्त विडिओ क्लिप्सच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान प्रसार केला जात आहे.
७) नोकिया- नोकिया लाईफ- मोबाईलवरून शेती, शिक्षण, मंनोरंजनविषयक माहिती दिली जात आहे. कृषी क्षेत्रात इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा (ICT) म्हणजेच नवीन माध्यमांचा (वेब, डिजीटल, मोबाईल, सोशल) वापर दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फायदा प्रगतशील युवा शेतकऱ्यांना शेतमालाचं गुणवत्ताक्षम अधिक उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचं प्रभावी मार्केटिंग करण्यासाठी होत आहे. म्हणूच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) युगातील तळागाळातील आपला शेतकरी खऱ्या अर्थानं `ग्लोबल` (Global+Local) बनत आहे.

८) व्हाटसप्प सोशल मीडियाचा कृषि क्षेत्रात वापर: कृषि-उन्नती,माझी शेती फाउंडेशन,आम्ही शेतकरी ग्रुप,श्री. संजीव माने, आष्टा, इत्यादि मार्फत नियमित कृषि  संबंधी मोफत शेतकरी सल्ला दिला जातोय. याची दखल तर मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी अमेरिकेत जाऊन सांगितली. या माध्यमातून कृषि क्षेत्रातील ऑडिओ,विडियो, मोठ्या प्रमान्त टेक्स्ट,या माध्यमातून वेगवेगल्या कृषि प्रश्नां संबंधी मागच्या दीड ते दोन वर्षा पासून जागृती कार्य सुरू आहे.
९) अप्प्स: गूगल प्ले स्टोर ला कृषि संबंधी  अॅग्रिकल्चर इन्फॉर्मेशन अप्प, क्रॉप इन्फो अप्प, योजनांची माहिती देणारे अप्प, कृषि निविष्ठांची माहिती देणारे अप्प, मार्केट लिंकेज देणारे अप्प असे अनेक एप्प्लीकेशन इत्यादीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना नियमित माहिती मिळते आहे.
१०) फेसबूक: या सामाजिक माध्यमाने तर जगभर क्रांती घडवणारी आंदोलने,उठाव निर्माण करण्यास वापर झाला आहे. मग याला शेती क्षेत्र तरी कसा अपवाद ठरेल. कृषि संबंधी माहिती चर्चीले जाणारे अनेक फेसबूक पेजेस आहेत. ज्यावर कृषि संबंधी अनेक बाबींची चर्चा होताना, यशोगाथा शेअर करताना, प्रशोणोत्तर चर्चा करताना दिसतात.या अश्या एकना अनेक तंत्रज्ञान टूल्सचा आलेख देता येईल. 

इंटरनेट व सामाजिक माध्यम आता आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक बनले आहेत. मोबाइलच्या माध्यमातून सामाजिक माध्यमांनी आज जगभरात क्रांती घडवली आहे. या सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या हातात आणून ठेवलंय. कुठल्याही क्षणी, कुठल्याही गोष्टीवर आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपले मत व्यक्त करण्याच स्वातंत्र्य सोशल मीडियानं आपल्याला दिलं आहे. चांगल्या गोष्टी, विनोद, आपले आनंदाचे क्षण, आपल्या मनातील भावना सहज दुसऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यात त्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी हे सोशल मीडियाचं व्यासपीठ चांगलं आहे. या माध्यमांचा वापर करून प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा अगदी जवळच्या आणि सातासमुद्र पार असणाऱ्या आपल्या मित्राशी, मैत्रिणीशी,  नातेवाईकांशी, सहकाऱ्यांशी  सामाजिक माध्यमांच्या मदतीने बोलता येते. जगभरात सामाजिक माध्यमांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे.
फेसबुक, ट्वीटर, व्हाट्सअप, किवा स्वतःचा ब्लॉग या सामाजिक माध्यमांचा वापर करून आज जगातील करोडो लोक एकमेकांच्या संपर्कात आहेत. सामाजिक माध्यमांच्या मदतीने आपण समाजाच्या संपर्कात राहू शकतो. कधीही, कुठेही कितीही लांब असून सुद्धा एकमेकांच्या संपर्कात राहता येते त्याचबरोबर समाजात घडणाऱ्या घडामोडी काही सेकॅंदाच्या आत आपल्याला कळतात व त्यावर आपली प्रतिक्रियाही नोंदविता येते हे याचे फायदे आहेत.  त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ज्ञान मिळवणे सोपे झाले. आता तरुणांपासून ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा या माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. सोशल मीडिया हे नक्कीच सर्वात दर्जेदार शस्त्र आहे पण त्याचा शासकीय पातळीवरही कृषि विस्तार क्षेत्रात वापर करायला हवा.
कृषी संशोधन आणि योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत रुजवण्याचं काम, नवीन माध्यमं (ICT Tools) अतिशय प्रभावीपणे करू शकतात. मल्टीमीडिया, कम्युनिकेशन क्रांती, माहिती तंत्रज्ञान आणि नवीन माध्यमाच्या या युगात शेतीविषयक माहिती, संशोधन, तंत्रज्ञान, इनॉव्हेटिव्ह प्रयोग ग्रासरूट लेव्हलपर्यंत प्रभावीपणं पोहोचवण्यासाठी अजूनही प्रचंड स्कोप आहे. या कामामध्ये नवीन माध्यम वेब चॅनल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आगामी काळात कृषी विस्तार, आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रसारामध्ये व शेतकऱ्यांमध्ये नवीन संशोधन रुजवण्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा (आय.टी.) वापर अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळंच शेती आणि ग्रामीण क्षेत्रात नवनवीन माध्यमं जोमानं पुढं येत आहेत. आजच्या युगात इन्फॉर्मेशन ही `पॉवर` आहे. यातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून ज्ञानकेंद्रित समाज निर्माण होतो. अण्ड्रोइड मोबाइल हे गावागावात पोचलेल साधन झाल आहे. माझ्या महितीतील एका गावचा गुरेराखी ( जनावरे सांभाळणारा) सुधा अण्ड्रोइड मोबाइल वापरतो, व्हाटसएप्प,फेसबूक वर चॅट करतो. असे एकना अनेकजन आता दिसत आहेत. अतिशय ढोबळमनाने पकडली तरीही महाराष्ट्रा साठी हा आकडा सहा लाखाहून अधिक आहे. महाराष्ट्रची एकूण लोकसंख्या ११ कोटी यातील ५५% लोकसंख्या शेतीवर अवलंबून असणारी म्हणजे जवळपास सहा कोटी लोकसंख्या शेतकर्‍यांची आहे. यातली ५०% तरुण म्हणजे ३कोटी तरुण शेतकरी आहेत. याच्या किमान २% जरी अण्ड्रोइड वापरकर्ते पकडले तरी हा आकडा ६ लाखांचा मिळतो. प्रत्यक्षात याहून खूप मोठा आकडा आहे आणि पुडच्या २ वर्षात हा आकडा १० पट वाढणार आहे. 
Entrepreneur dot com च्या एका सर्वे अनुसार २०१७ पर्यन्त एप्प्लीकेशन डेवलपमेंट मार्केट सतेहत्तरशे कोटीहून अधिकचा व्यवसाय क्षेत्र असेल. याच्या १०% जरी एप्लीकेशन कृषि संबंधी असल्या तरी तो खरेच खूप मोठा बदल कृषि विस्तार क्षेत्रात अनू शकेल.
शेतीच्या निविष्ठा ऑनलाइन खरेदी, कृषि उत्पादन तंत्रासाठी एका तज्ञाशी अनेकजन सहज जोडणे,उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचे तंत्र प्रसारित करणे, थेट माल-थेट भाजीपाला उत्पादक ते ग्राहक पोचवणे, हे सर्व आणि असे बरेच काही अल्पखर्चीक, सहज शेतकर्‍यांना उपलब्ध होवू शकेल. 
गावच्या सार्वजनिक चौकात,ओट्यावर आजही गप्पा रंगतात. या गप्पांमध्ये एका अण्ड्रोइड वापरणार्‍याने आसपासच्या १० जणांना जरी ही तंत्र चर्चा केली तरी सुधा हा बदल शेती,समाज व्यवस्थेला पुढच्या टप्प्यावर नेवू शकेल.गरज आहे ती धोरणकर्त्यांनी या कडे लक्ष देण्याची व सर्वकश प्रयत्न करण्याची.

-इरफान शेख, केज,बीड ०९०२१४४०२८२
(लोकछत्र या दिवाळी अंक २०१५ मधील माझा लेख)

Tuesday, November 24, 2015

हिरवी मिरची

जमीन 

पाण्‍याचा उत्तम निचरा होणा-या ते मध्‍यम भारी जमिनीत मिरचीचे पिक चांगले येते. हलक्‍या जमिनीत योग्‍य प्रमाणात सेंद्रीय खते वापरल्‍यास मिरचीचे पिक चांगले येते. पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्‍यम काळी आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्‍हाळयात मध्‍यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्‍या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.

लागवड
खरीप पिकाची लागवड जून, जूलै महिन्‍यात आणि उन्‍हाळी पिकाची लागवड जानेवारी फेब्रूवारी महिन्‍यात करावी.


** वाण
पुसा ज्‍वाला -
ही जात हिरव्‍या मिरचीसाठी चांगली असून या जातीची झाडे बुटकी व भरपूर फांद्या असलेली असतात. फळे साधारणपणे 10 ते 12 सेमी लांब असून फळांवर आडव्‍या सुरकुत्‍या असतात. फळ वजनदार व खुप तिखट असते. पिकलेली फळे लाल रंगाची असतात.

पंत सी – 
हिरव्‍या व लाल (वाळलेल्‍या ) मिरचीच्‍या उत्‍पादनाला ही जात चांगली आहे. या जातीची फळे उलटी असतात. मिरची पिकल्‍यावर फळांचा आकर्षक लाल रंग येतो. फळे 8 ते 10 सेमी लांब असून साल जाड असते. फळांतील बियांचे प्रमाण अधिक प्रमाणात असून बोकडया रोगास प्रतिकारक आहे.

संकेश्‍वरी 32 – 
या जातीची झाडे उंच असतात. मिरची 20 ते 25 सेमी लांब असून पातळ सालीची असतात. सालीवर सुरकुत्‍या असतात. वाळलेल्‍या मरचीचा रंग गर्द लाल असतो.

जी – 2, जी – 3, जी – 4, जी – 5 या जातीची झाडे बुटकी असतात. या मिरचीच्‍या अधिक उत्‍पादन देणा-या चांगल्‍या जाती आहेत. फळाची लांबी 5 ते 8 सेमी असून फळांना रंग गर्द तांबडा असतो.
मुसाळवाडी – 
या जातीची झाडे उंच वाढतात. खरीप हंगामासाठी ही जात चांगली असून बोकडया, भूरी आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.

पुसा सदाबहार – 
या जातीची झाडे उंच असून पाने इतर जातीपेक्षा रूंद असतात. पिकलेली मिरची तेजस्‍वी लाल रंगाची असते. या जाती हिरव्‍या मिरचीचे सरासरी उत्‍पादन साडेसात ते दहा टन व वाळलेल्‍या मिरचीचे दीड ते दोन टन उत्‍पादन मिळते. ही जात मावा कोळी या किडींना तसेच डायबॅक आाणि विषाणूंजन्‍य रोगांना प्रतिकारक आहे.

या शिवाय विद्यापीठांनी विकसीत केलेंडर अग्निरेखा, परभणी टॉल , फूले ज्‍योती, कोकणक्रांती, फूले मुक्‍ता फूले सुर्यमुखी, एनपी- 46 या सारख्‍या अधिक उत्‍पादन देणा-या जाती लागवडी योग्‍य आहेत.

** बियाणाचे प्रमाण
हेक्‍टरी 1 ते दीड किलो बियाणे वापरावे.


** पूर्वमशागत
एप्रिल मे महिन्‍यात जमिन पुरेशी नांगरून वखरून तयार करावी. हेक्‍टरी 9 ते 10 टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.


** लागवड
जिरायती पिकासाठी सपाट वाफयावर रोपे तयार करतात. तर बागायती पिकासाठी गादी वाफयावर रोपे तयार केले  जातात. गादी वाफे तयार करण्‍यासाठी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. जमिनीत दर हेक्‍टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर 25 फूट लांब 4 फूट रूंद 10 सेमी उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्‍येक गादी वाफयावर 30 किलो चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो सुफला मिसळावे.


बी पेरण्‍यासाठी 8 ते 10 सेमी अंतरावर वाफयाच्‍या रूंदीला समांतर ओळी हतयार करून त्‍यामध्‍ये 10 टक्‍के फोरेट दाणेदार 15 ग्रॅम दर वाफयाला टाकून मातीने झाकून घ्‍यावे. त्‍यानंतर या ओळीमध्‍ये दोन सेमी ओळीवर बियांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकून टाकावे. बियाण्‍यांची उगवण होईपर्यंत वाफयांना दररोज झारीने पाणी द्यावे.  बी पेरल्‍यानंतर 30 ते 40 दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.

उंच आणि पसरट वाढणा-या जातींची लागवड 60 बाय 60 सेमी अंतरावर आणि बुटक्‍या जातींची लागवड 60 बाय 45 सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड 45 बाय 45 सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्‍दतीवर लागवड करावी. रोपे गादीवाफयातून काढल्‍यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे 10 लिटर पाण्‍यात 15 मिली मोनोक्रोफॉस 36 टक्‍के प्रवाही अधिक 25 ग्रॅम डायथेनम 45 अधिक 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक 80 टक्‍के मिसळलेल्‍या द्रावणात बुडवून लावावेत.

** खत व्‍यवस्‍थापन
वेळेवर वरखते दिल्‍यामुळे मिरची पिकाची जोमदार वाढ होते. मिरचीच्‍या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्‍टरी 50 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि ओलिताच्‍या पिकासाठी दर हेक्‍टरी 100 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे. यापैकी स्‍फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीच्‍या वेळी द्यावीत. नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पध्‍दतीने द्यावी.


** पाणी व्‍यवस्‍थापन
मिरची बागायती पिकाला जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.  प्रमाणापेक्षा जास्‍त किंवा कमी पाणी देऊ नये. झाडे फूलावर आणि फळावर असताना झाडांना पाण्‍याचा ताण देऊन रोपे लावणीनंतर 10 दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात 1 दिवसाआड पाणी दयावे. त्‍यानंतर 5 दिवसांच्‍या किंवा एक आठवडयाच्‍या अंतराने पाणी दयावे. साधारणतः हिवाळयात 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने तर उन्‍हाळयात 6 ते 8 दिवसांच्‍या अंतराने   पिकाला पाणी दयावे.


** आंतरमशागत
मिरचीच्‍या रोपांच्‍या लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी त्‍यानंतर तणांच्‍या तीव्रतेनुसार खुरपण्‍या करून शेत तणविरहीत ठेवावे. खरीप मिरचीला लागवडी नंतर 2 ते 3 आठवडयांनी रोपांना माीची भर दयावी. बागायती पिकांच्‍या बाबतीत रोपांच्‍या लागवडीनंतर 2 महिन्‍यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्‍या ओळीच्‍या दोन्‍ही बाजूंनी मातीची भर द्यावी.


** रोग व्यवस्थापन
मर : हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. लागण झालेली रोपे निस्‍तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्‍यामुळे रोप कोलमडते.
उपाय : 10 लिटर पाण्‍यात 30 ग्रॅम कॉपरऑक्‍झीक्‍लोराईड 50 टक्‍के मिसळून हेक्‍टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्‍या मुळा भोवती ओतावे.


फळे कुजणे आणि फांद्या वाळणे (फ्रूट रॉट अँड डायबॅक/ ऍन्थ्रॅक्‍नोज)
* कारण - हा रोग कॉलेक्‍टोट्रिकम कॅपसिसी या बुरशीमुळे होतो. सकाळी धुके व दव पडत असलेल्या ठिकाणी दमट वातावरण राहते. अशा ठिकाणी बुरशींचे बिजाणू वेगाने वाढतात.
* लक्षणे - या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट काळी कडा असलेले डाग दिसतात. फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे सुकतात, कुजतात आणि गळून पडतात. (Like our page - www.fb.com/agriindia) बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात, तसेच पानांवर आणि फांद्यावर काळे ठिपके दिसतात.
* प्रसार - या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे तसेच हवेद्वारे होतो.
* नियंत्रण - हा रोग बियाण्यापासून होत असल्यामुळे रोगमुक्त बियाण्याचाच वापर करावा.
- पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास थायरम किंवा कार्बेन्डाझिमची ३ ग्रॅमप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
- या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रोगग्रस्त फांद्या गोळा करून जाळून नष्ट कराव्यात.
- रोगाची लक्षणे दिसताच कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड (५० टक्के डब्ल्यू.पी.) किंवा मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यू.पी.) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (Message by MAZISHETI FOUNDATION) आवश्‍यकतेनुसार पुढील फवारणी १० ते १५ दिवसांनी सल्ल्यानुसार घ्यावी.


२) भुरी (पावडरी मिल्ड्यू)
* कारण - हा रोग लव्हेलुला टावरिका या बुरशीमुळे होतो.
* लक्षणे - साधारणतः मिरची पिकामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान दिसून येतो. या रोगामुळे पानाच्या खालील बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. नंतर ती पानाच्या पृष्ठभागावर पसरते. याची सुरवात जुन्या पानापासून होते. रोगाचे प्रमाण वाढल्यास पाने पिवळी होऊन गळून पडतात. प्रादुर्भाव वाढल्यास फुलांच्या निर्मितीवर विपरीत परिणाम होतो.
* प्रसार - या रोगाचा प्रसार हवेद्वारे व रोगट पालापाचोळ्यातून होतो.
* नियंत्रण
- रोगट पालापाचोळ्यावर रोगाच्या बुरशीचे बिजाणू असतात. शेतातील जुने पीक अवशेष नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे.
- रोगाची लक्षणे दिसताच, गंधक (८० टक्के डब्ल्यू.पी.) ३० ग्रॅम किंवा डिनोकॅप (४८ टक्के ई.सी.) १० ग्रॅम किंवा ट्रायडेमाॅर्फ १० मिली किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) १० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के प्रवाही) ५ मि.लि. किंवा मायक्लोब्युटॅनील १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी ८ ते १० दिवसांनी बुरशीनाशक बदलून घ्यावी.


** किड व्यवस्थापन
फूलकिडे : हेक्‍टरी किटक आकाराने अतिशय लहान म्‍हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्‍यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वरच्‍या बाजूला चुरडलेल्‍या दिसतात. हेक्‍टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्‍यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
उपाय : रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

मावा : हेक्‍टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्‍यामुळे नविन पालवी येणे बंद होते.
उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.


विषाणूजन्य रोग
१) चुरडा-मुरडा (बोकड्या) -
कारण - हा रोग टोबॅको लिफकर्ल व्हायरस या विषाणूमुळे होतो.
* प्रसार - या विषाणूचा प्रसार पांढरी माशीमार्फत होतो.
* लक्षणे - या रोगामुळे पाने बारीक, वाकडीतिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात. पाने मध्य शिरेकडे मुरडतात. पानांच्या शिरा सुजून जाड होतात. पानाचा रंग फिक्कट हिरवा पिवळसर, निस्तेज होऊन झाडाची वाढ खुंटते.

२) मोझॅक -
* कारण - हा रोग काकडी मोझॅक विषाणू, बटाटा विषाणू व तंबाखू मोझॅक विषाणू या विषाणूमुळे होतो.
* प्रसार - या विषाणूचा प्रसार मावा किडीमार्फत होतो.
* लक्षणे - या रोगामुळे पाने फिक्कट हिरवी होतात. पाने बारीक राहून त्यामध्ये हिरवट - पिवळसर डाग दिसतात. झाडाची वाढ खुंटते, फुले-फळे फार कमी प्रमाणात लागतात.

** विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन -
- विषाणू रोगाचा प्रादुर्भाव हा पांढरी माशी, मावा या रसशोषण करणाऱ्या किडींद्वारे किंवा बियाण्यामार्फत होतो. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
- या रोगाचा प्रादुर्भाव रोपवाटिकेपासून पिकाच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यात होतो. विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे अवघड जाते. म्हणून रोगमुक्त बियाण्यांचा वापर आणि रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत किडींचा प्रादुर्भाव टाळण्यावर लक्ष द्यावे.
- रोगट झाडे दिसताच ती उपटून योग्य प्रकारे नायनाट करावा.
- शेतातील तणे नष्ट करावीत.
- पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर फोरेट २५ ग्रॅम प्रति ३ x १ मीटर आकाराच्या गादीवाफ्यात मिसळावे.
- रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी झाल्यानंतर गादीवाफ्यावर ४० मेश नायलॉन नेट २ मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे टाकावे. त्यामुळे रोगप्रसार करणाऱ्या किडीपासून रोपांचे संरक्षण होईल.
- रोपांची पुनर्लागवड करताना रोपे इमिडाक्‍लोप्रिड (१७.८ ई.सी.) ४ मि.लि. प्रति १० लिटर पाणी प्रमाणे तयार केलेल्या द्रावणामध्ये रोपाचा शेंड्याकडील भाग बुडवून नंतर रोपांची लागवड करावी.
- पिवळे चिकट सापळे १२ प्रतिहेक्‍टर वापरावेत.
- मिरची पिकाच्या चहूबाजूला २-३ ओळी मका किंवा ज्वारीच्या पेराव्यात.
- लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने डायमेथोएट (३० टक्के ई.सी.) १० मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रिड (७० टक्के डब्ल्यू.डी.जी.) २० ग्रॅम किंवा फिप्रोनिल (५० टक्के एस.सी.) १० ग्रॅम किंवा ॲसीफेट (७५ टक्के एसपी) १५ ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस (४० टक्के ई.सी.) २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. आवश्यकतेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून फवारणी घ्यावी.
- दोन फवारण्यांमध्ये कडुनिंबावर आधारित ॲझाडिरेक्टीन (३००० पीपीएम) २५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- यानंतरही रोग नियंत्रणात येत नसल्यास, सायॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) १८ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.


** काढणी व उत्‍पादन
हिरव्‍या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडिच महिन्‍यांनी सुरु होते. पुर्ण वाढलेल्‍या व सालीवर चमक असलेल्‍या हिरव्‍यसा फळांची तोडणी देठासह 10 दिवसांच्‍या अंतराने करावी. साधारपणपणे हिरव्‍या मिरच्‍यांची तोडणी सुरु झाल्‍यानंतर 3 महिने तोंडे सुरू राहातात. अशा प्रकारे 8 ते 10 तोडे सहज होतात. वाळलेल्‍या मिरच्‍यांसाठी त्‍या पूर्ण पिकून लाल झाल्‍यावरच त्‍यांची तोडणी करावी.
जातीपरत्‍वे ( बागायती) हिरव्‍या मिरच्‍यांचे हेक्‍टरी 80 ते 100 क्विंटल उत्‍पादन मिळते. वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन 9 ते 10 क्विंटल निघते. व कोरडवाहू मिरचीचे उत्‍पादन 6 ते 7 क्विंटल येते.