Tuesday, January 13, 2015

सद्यःस्थितीत वातावरणात होत असलेला बदल आणि केळी बागांची विशेष काळजी....

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:

सद्यःस्थितीत तापमानात होत असलेला बदल, तसेच वारा वेग बेताचाच आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण केळी पिकास योग्य असेच असले, तरी केळीच्या विविध अवस्थांनुसार या सर्व अवस्थेतील केळी बागांची विशेष काळजी घेणे अगत्याचे ठरते.

1) सध्या अनेक ठिकाणी तापमानात 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. या कालावधीत केळी पिकाच्या मुळ्यांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्रिया मंदावते. झाडांना अन्नद्रव्यांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. परिणामी, केळी झाडे पिवळी पडू लागतात. ते टाळण्यासाठी थंडीच्या काळात शेतकऱ्यांनी 19-19-19 या विद्राव्य खताची 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
2) बागेतील तणाचे प्रमाण तुलनात्मकरीत्या कमी असले, तरी बागा निंदणी, कुळवणी करून स्वच्छ ठेवाव्यात.
3) मुख्य खोडालगत येणारी पिल्ले धारदार विळीने जमिनीलगत दर 2-3 आठवड्यांनी कापावीत.
4) मृगबागेत टिचणी करून जमिनीवरील तडे बुजवावेत. झाडांना माती लावून आधार द्यावा.
5) नवीन कांदेबागेत "इर्विनिया रॉट' या जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास, 200 लिटर पाण्यात 600 मि.लि. क्‍लोरपायरिफॉस अधिक 600 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड अधिक 20 ग्रॅम स्ट्रेप्टोमायसिन (----इथे स्टार टाकावा----) या द्रावणाची प्रतिझाड 250-400 मि.लि. या प्रमाणात आळवणी करावी.
6) पीक अवस्थेनुसार व जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणीपुरवठा करावा. शक्‍यतो रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे.
7) सध्याची हवामान परिस्थिती करपा रोग वाढीस अनुकूल आहे. ढगाळ हवामान, अनियमित पाऊस, हवेतील आर्द्रता व तापमान हे घटक केळी करपा वाढीसाठी पूरक आहेत. नवीन लागवड, कांदेबाग लागवड व मृग कापणीवरील मृगबाग यांमध्ये करपा रोगाचे प्रमाण वाढलेले आहे. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी -

- सर्व बागेतली "करपा' रोगग्रस्त पाने किंवा पानांचा रोगग्रस्त भाग काढून बागेबाहेर नेऊन नष्ट करावा.
- करपा रोग निर्मूलनासाठी कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम किंवा प्रॉपिकोनॅझोल 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी अधिक स्टिकरचा वापर करावा.
- किंवा 5 मि.लि. प्रॉपिकोनॅझोल किंवा 5 ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक 100 मि.लि. मिनरल ऑईल प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी घ्यावी. पुढील फवारण्या गरजेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्याव्यात.

9) बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सजीव कुंपण करावे. सजीव कुंपण नसल्यास बागेभोवती ज्वारी किंवा बाजरी किंवा मका किंवा कडबा यांच्या झापा करून किमान पश्‍चिम व उत्तरेकडील बाजूस लावावेत.
10) तापमान 10 अंश से.च्या खाली गेल्यास भल्या पहाटे बागेत ओला काडीकचरा जाळून धूर करावा.
11) निंबोळी ढेप प्रतिझाड 200 ग्रॅम (नवीन कांदेबागेस), तर मृग बागेस प्रतिझाड 500 ग्रॅम द्यावी.
12) मृगबागेस लागवडीनंतर 210 दिवसांनी घ्यावयाची खतमात्रा (प्रतिझाड 36 ग्रॅम युरिया) आणून ठेवावे व खते देण्यासंबंधी नियोजन करावे. नवीन कांदेबाग लागवडीस खताचा दुसरा हप्ता (प्रतिझाड 82 ग्रॅम युरिया) लागवडीनंतर 75 दिवसांनी द्यावा.
13) जुन्या कांदेबागेमधील फळवाढीच्या अवस्थेतील घड हे कोरड्या केळी पानांनी किंवा 2 ते 6 टक्के सच्छिद्रतेच्या 100 गेज जाडीच्या पांढऱ्या प्लॅस्टिक पिशवींनी झाकावेत.
14) फळवाढीच्या किंवा कापणी अवस्थेतील जुन्या कांदेबागेत "जळकाचिरूट' सिगारएंड रॉट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त केळी काढून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत. घडावर मॅन्कोझेब - प्रति 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम घेऊन घडावर फवारणी करावी.
अशा पद्धतीने केळी पिकांची काळजी घेतल्यास केळीच्या वाढीवर, उत्पादकता व गुणवत्तेवर विपरीत परिणाम होणार नाही.

~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.