Search here..

Friday, January 22, 2016

कलिंगड

जमीन : हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणार्‍या सोडियम, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. बारामती, फलटण भागातून येणार्‍या कलिंगडावरती अशा प्रकारचे डाग नेहमी मोठ्या प्रमाणात दिसतात. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम - काळ्या ते करड्या रंगाची, पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे.

हवामान : उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड केली जाते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होत नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.

जाती : शुगरबेबी, असाहीयामाटो, मधू, अर्कामाणिक, अर्काज्योती, मिलन, तुप्ती, मोहिनी, अमृत इ.
१) शुगरबेबी : फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्तासारखे पट्टे असतात. गोडी जास्त असते. गर भडक लाल रंगाचा रवाळ व गोड असतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
२) असाहीयामाटो : फिकट हिरव्या रंगाची साल असून फळे मोठी असली तरी गोडी कमी असते व चवीस थोडेसे पांचट असते. त्यामुळे मागील वीस वर्षापासून ही जात पडद्याआड गेली.
३) मधु : या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या दशकात या जातीची मागणी बर्‍यापैकी होती.
४) अर्कामाणिक : या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साला गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते.
५) मिलन : लवकर तयार होणारी संकरित जात असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे वजन ६ ते ७ किलो भरते.
६) अमृत : महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असून ५ ते ७ किलो वजनाची असतात. फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी कमी असते.

संकरित कलिंगड :
१) सुपर ड्रॅगन : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन ८ -१० किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर लाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
२) ऑगस्टा : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन ६ -१० किलो आहे. फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे.दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
३) शुगर किंग : अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. ही जात मर रोगास (फ्युजॅरियम) प्रतिकारक आहे. फळाचे सरासरी वजन ८-१० किलो आहे.
४) बादशाह : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळ लांबट गोल आकाराचे, गर्द हिरवे पट्टे असलेले फिक्कट हिरव्या सालीचे असून त्याचे सरासरी वजन ८ ते १० किलो असते. फळातील गर अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून, चवीला गोड आहे. दूरच्या बाजारपेठत पाठविण्यास योग्य आहे.

लागवडीचा हंगाम : लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी. म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो.

पाणी : पाच ते सहा दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. थंडीमध्ये दुपारी ११ ते ४ ह्या वेळेत व उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे. पाण्याच्या पाळ्या अनियमित दिल्यास फळे तडकण्याचा किंवा त्यांचा आकार बदलण्याचा संभव असतो.

पीक संरक्षण : (कीड व रोग)

कीड : नागअळी, भुंगेरे, फळमाशी (फळे सडतात) इत्यादी किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो.
१) नागआळी (लीफ मायनर) : ही आळी वेलीचे पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे फळांचे पोषण होत नाही.
२) लाल भुंगेरे : हे किडे रंगाने लाल असून कलिंगडाची पाने व फुले कुरतडतात.
३) फळमाशी : या किडीची मादी फळाच्या सालीवर छिद्र पाडून फळात शिरते व तेथे अंडी घालते. त्यामुळे आतून पुर्ण फळ सडण्यास सुरुवात होते.

रोग :
१) करपा : वेलवर्गीय फळपीक असल्यामुळे पानांवर लव अधिक असून वेळ जमिनीवर पसरल्याने दमट हवामानामध्ये करपा रोगाचे प्रमाण वाढल्यास सर्व पाने गळून पडतात.
२) भुरी : पानांवर दोन्ही बाजूंनी पांढरी बुरशी वाढून पाने भुरकट होऊन गळतात.
३) मर : बुरशीजन्य रोग असून वेली संपूर्ण जळून जातात. 

फळे काढणीस तयार झाली, हे कसे ओळखावे ?

१) फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो.
२) फळांच्या देठावरील लव फळ पक्क होण्याच्या वेळी नाहीशी होते.
३) पूर्ण पक्क झालेल्या फळांचा जमिनीवर टेकलेला भाग पांढरट - पिवळसर रंगाचा दिसतो.
उत्पादन : साधारण एकरी २० ते ४५ टन उत्पादन मिळू शकते.