Search here..

Wednesday, January 13, 2016

हलक्या व माळरानांच्या जमिनीत सुध्दा हळदीचे पीक घेता येईल, फक्त लावण्यापूर्वी हे वाचा..

हवामान :
हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊससमान हे पीक काही वेळ सहज सहन करू शकते, परंतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानिकारक आहे. तसेच कडक हिवाळा या पिकास मानवत नाही. सरासरी ५०० ते ७५० मिलीमीटर असणार्‍या निमशुष्क वातावरणात हळदीचे पीक चांगले येते.

थंडीमुळे हळदीची पानेवाढ काही अंशी थांबते व जमिनीतील कंदांची (फण्यांची) वाढ होते. कोरडे व थंड हवामान कंद पोषणास अनुकूल असते.

जमीन :
या पिकास मध्यम प्रतीची तसेच चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. भारी काळ्या चिकन, क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही म्हणून हळद लागवडीसाठी शक्यतो अशा जमिनीची निवड करू नये. चांगल्या उत्पादनासाठी मध्यम, काळी, पोयट्याची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी.

हलक्या व माळरानांच्या जमिनीत सुध्दा हळदीचे पीक घेता येईल. मात्र सरासरी उत्पादन मिळविण्यासाठी त्या जमिनीची सुपिकता वाढवणे, पोत सुधारणे, सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे आणि जमिनीची चांगली मशागत करणे इ. गोष्टी केल्यास माळरानावर सुध्दा हे पीक फायद्याचे ठरू शकते.

सुधारित जाती :
१) फुले स्वरूप : 
ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे. सरळ वाढीची सवय असून पानांचा रंग हिरवा असून क्रियाशील पानांची संख्या ६ ते ७ असते. या जातीचा पक्क्तेचा काळ हा ८.५ महिन्याचा असून फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रति झाड असते. या जातीचे जेठे गड्डे मध्यम आकाराचे असून वजनाचे ५० ते ५५ ग्रॅम असतात. हळकुंडे ३५ ते ४० ग्रॅम वजनाची असून प्रत्येक कंदात ७ ते ८ हळकुंडे असतात. त्यांनंतर त्यावर उपहळकुंडाची वाढ होत असते. मुख्य हळकुंडाची लांबी ७ ते ८ सें.मी. असते. बियाणे व उत्पादनाचे प्रमाण १:५ असे आहे. हळकुंडे सरळ लांब वाढतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग गर्द पिवळसर असा आहे. या जातीमध्ये पिवळेपणाचे प्रमाण सध्या प्रसारीत असलेल्या जातीपेक्षा जास्त म्हणजे ५.१९% इतके असून उतार २२% इतका मिळतो. या जातीने सरासरी ओल्या हळदीचे उत्पादन ३५८.३० क्विं./हे. दिल्याचे दिसून आले असून वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७८.८२ क्विं./हे. हिल्याची नोंद आहे. या जातींमध्ये पानावरील करपा रोगास तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुण असल्याचे दिसून आले आहे.

२) सेलम : 

या जातींची पाने रुंद हिरवी असतात. पिकाच्या एकूण वाढीच्या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. झाडास सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. हळकुंडे व उपहळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग केशरी पिवळसर असतो. हळकुंडावरील पेर्‍यांची संख्या ८ ते ९ असते. कच्च्या हळदीचे उत्पादन ३५० ते ४०० क्विंटल प्रती हेक्टरी मिळते. या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४.५ टक्के असते. वाळलेल्या हळदीचे ७० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. ही जात पक्क होण्यास ८.५ ते ९ महिने लागतात. चांगल्या कसदार पोताच्या जमिनीत या जातीच्या झाडांची उंची जवळजवळ ५ फुटांपर्यंत वाढते आणि ३ ते ४ फुटवे येतात. सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यामध्ये लागवड करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी या जातीची शिफारस केली आहे.

३) कृष्णा (कडाप्पा ) : 

या जातीची हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा पांढरट पिवळा असतो. दोन पर्‍यामधील अंतर इतर जातीच्या तुलनेने जास्त असते. पेर्‍यांची संख्या ८ ते ९ असून झासांची पाने रुंद आणि सपाट असतात. एकून पिकाच्या कालावधीमध्ये १० ते १२ पाने येतात. पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) या रोगास ही जात अल्प प्रमाणत बळी पडते. वाळलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात. वाळल्यानंतर मुख्य हळकुंडाची लांबी जवळ जवळ ६ ते ७ सें.मी. असते. या जातीच्या वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७५ ते ८० क्विंटल प्रती हेक्टरी येते. ही जात हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथून सन १९८४ साली कडाप्पा जातीमधून निवड पद्धतीने काढण्यात येऊन शेतकर्‍यांना लागवडीसाठी प्रसारित केली आहे.

४) राजापुरी :

या जातीची पाने रुंद, फिकट हिरवी व सपाट असतात. पिकाच्या वाढीच्या एकूण कालावधीमध्ये १० ते १८ पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात. हळकुंडे व उपहळकुंडे आखूड व जाड ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गड्ड्यांचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. शिजवल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा १८ ते २० टक्के पडतो व प्रती हेक्टरी कच्च्या हळदीचे उत्पादन ५५ ते ५८ क्विंटल मिळते. ही जात करपा रोगास बळी पडते. पक्क होण्यास ८ ते ९ महिने लागतात. या जातीला स्थानिक बाजारपेठेत तसेच गुजरात व राजस्थान राज्यांतून चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो. बर्‍याच वेळा हळदीच्या वायदे बाजारातील भाव या जातीवरून ठरला जातो. महणून ही जात कमी उत्पादन देणारी असली, तरी लागवडीसाठी प्राधान्याने शेतकरी या जातीला पसंती देतात.

५) खाण्याची हळद (Curcuma Longa ) : 

ही बहुवर्षीय जात असून ६० ते ९० सें.मी. उंच वाढते. पानांना खमंग वास असून फळे तीनधारी असतात. बोंड, कंद आखूड व जाड असतो. पातळ पाने ६० ते ९० सें.मी. लांब असून कंदापासून ६ ते १० पोपटी हिरव्या रंगाची पाने वाढतात. फुले पिवळसर पांढरी असतात, मात्र लागवडीच्या पिकात फळे धरत नाहीत, कारण ती नपुंसक असतात. या जातीची ९६% लागवड भारतात होते.

६) कस्तुरी किंवा रानहळद ( Cucuma Caesia) :
ही जात वार्षिक असून महाबळेश्वर, कोकण विभाग आणि आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
कंद मोठे गोलाकार, फिकट पिवळे (आत नारिंगी लाल) असून कापराचा वास असतो. प्रक्रियेनंतरच्या (हळकुंडास) गोड वास असतो. ६.१% हिरवट तपकिरी तेल, कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाने लांब - वर्तुळाकर व आल्यासारखी टोकदार, मध्यशीरा उठावदार असतात, फुले सुवासिक, औषधासाठी उपयोग.

७) इस्ट इंडियन अॅरोरूट (East Indian Aroroot) :

मध्यभारत, बंगाल, महाराष्ट्रा, तामिळनाडुच्या डोंगराळ भागात व हिमालयात या जातीची लागवड आढळते. कंदातील स्टार्च १२.५ % असून त्याचा उपयोग खर्‍या अॅरोरूटला पर्याय म्हणून तसेच मुलांना व आजारी माणसांना मिल्क पुडिंग करून देतात.

८) आंबेहळद (Curcuma Amada) :

कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबे हळद म्हणतात. कोकण, बंगाल, तामिळनाडू व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते. कंद बारीक व आतील गार पांढरा असून कंदाचे लोणचे करतात. बहूवार्षिक जात असून पाने लांब वर्तुळाकार, आल्यासारखी व पानांचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शीर उठावदार असते. फुले हिरवट - पांढरी असून बोंड तीनधारी असते.

औषधी उपयोग : कातडी मऊ होण्यासाठी अंगाला चोळतात. मुरगळल्यावर व सुजेवर उगाळून लावतात. चामडीची खाज घालविते. थंड, पाचक व रक्तशुद्धीकरता, जंतुनाशक म्हणून उपयुक्त आहे.

९) काळी हळद (Curcuma Caesia) : 

बंगालमध्ये आढळते. ताजे कंद फिकट पिवळे, सुवासिक, सौंदर्यप्रसाधनात वापरतात. कंदामध्ये ९.७६% सुवासिक तेल असते.

१०) कचोर (Curcuma Zedoria) : 

वार्षिक जात असून कोकणात सर्वत या जातींची लागवड आढळते. औषधाकरिता ताजे मूळ व गड्डे रक्त शुद्धीकरणासाठी वापरतात. पानांचा रस महारोगांवर उपयुक्त ठरतो.

हळद वाढीकडे लक्ष द्या
  • हळदीची उंची 5 ते 5।। फूट, 3 ते 7 फुटवे, 2 ते 15 पानांची संख्या असल्यास  पिकाची वाढ उत्तम झाली आहे असे समजावे. हळदीची उंची 5 ते 5।। फुटापेटांपेक्षा जास्त होऊ देऊ नये. त्यामुळे हळद काडावर जाणार नाही. कंदाची पोसवण चांगली होईल.
  • हळदीच्या पानांमध्ये साठवलेले अन्नद्रव्य साधारणतः याच महिन्यापासून कंदामध्ये उतरण्यास सुरवात होते. त्यामुळे कंदातील पाण्याचा अंश कमी होऊन कंदामध्ये कर्बोदके, प्रथिने यांसारख्या घन पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे कंदास वजन प्राप्त होते. 
  • या कालावधीमध्ये हळदीला फुले येतात. बऱ्याच लोकांचा फुले काढून टाकण्याकडे कल असतो. परंतु फुले काढण्याची कोणतीही गरज नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून साधारणतः हळदीची शाखीय वाढ संपून कंदाच्या वाढीची सुरवात झाल्याचे ते लक्षण आहे. फुले काढत असताना रोपाला इजा होण्याची शक्‍यता असते. त्याच्यामधून दुय्यम बुरशीचा शिरकाव होऊन कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. 
  • हळकुंडे उघडी पडत असल्यास त्यावर माती टाकून ती झाकावीत, अन्यथा ती सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येऊन हिरवी पडतात, त्यांची वाढ थांबते. त्यामुळे उत्पादनामध्ये घट येते. 
  • फर्टिगेशन करत असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबकमधून फक्त पोटॅशयुक्त खतांचा वापर सुरू ठेवावा. त्यामुळे कंदाची फुगवण चांगली होऊन वजन चांगले मिळते. पाटपाणी देत असलेल्या हळद पिकास पोटॅशची कमतरता असेल तर एकरी 50 किलो याप्रमाणे पांढरा पोटॅशची मात्रा द्यावी. 
  • ढगाळ वातावरण आणि धुके यामुळे पानांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असते. नियंत्रणासाठी एक मिलि ऍझॉक्‍झिस्ट्रोबिन (23.1 टक्के) प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • हळदीची उंची वाढल्यामुळे पिकामध्ये आत जाता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये कंदकुजीचा प्रादुर्भाव बाहेरूनच ओळखावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने शेवटच्या फुटव्याचे पान पिवळे पडून शेंड्याकडून करपते. कंद काढून पाहिल्यास तो सडण्यास सुरवात झालेली असते, पुढे संपूर्ण कंद कुजून जाण्याची शक्‍यता असते. कंदकुजीच्या नियंत्रणासाठी कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा अळवणीसाठी वापर करावा. यासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड (3 ते 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी) किंवा 1 टक्का बोर्डो मिश्रणाचा वापर करावा.
  • जमिनीच्या प्रकारानुसार सात महिन्यांपासून पाण्याचे प्रमाण कमी करत जावे. भारी जमिनीत पिकास आठ महिने पूर्ण झाल्यानंतर, तर मध्यम ते हलक्‍या जमिनीत साडेआठ महिने पूर्ण झाल्यानंतर पाणी पूर्णतः बंद करावे. यामुळे हळदीच्या पानामधील अन्नद्रव्य कंदामध्ये उतरण्यास मदत होते. 
  • कोणत्याही परिस्थितीमध्ये हळदीस नऊ महिने पूर्ण झाल्याशिवाय हळदीचा पाला काढू नये. पाला काढल्याने हळदीच्या उताऱ्यामध्ये घट येते, प्रक्रिया केल्यानंतर हळदीची प्रत खालावते.

हळद प्रक्रियेतून वाढवा नफा

हळद पावडरीच्या बरोबरीने हळदीपासून संप्लवनशील तेल, रंग , लोणचे तयार करता येते. या उत्पादनांना प्रक्रिया उद्योग तसेच बाजारपेठेत चांगली मागणी आहे. बचत गटांना हळद प्रक्रिया उद्योगामध्ये चांगली संधी आहे.  

हळदपूड/ भुकटी/ पावडर - 
१) यंत्राद्वारे हळकुंडाचे लहान तुकडे करून नंतर चक्कीमध्ये दळतात. पल्वरायझरमध्ये संपूर्ण हळकुंडे टाकून भुकटी तयार होते. त्यानंतर ३०० मेश चाळणीतून चाळून घेतात. भुकटीमध्ये १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास ती लवकर खराब होते व कीड लागते. 
२) हळदीच्या भुकटीचे पॅकिंग ३०० एम.एस.ए.टी. सेलोफेन किंवा ग्लासिनच्या पिशवीत भरून ती पिशवी २५० गेजच्या एलडीपीई पिशवीत टाकावी. सध्या पॉलिथीनच्या पिशवी वापरल्यास ६० टक्के सुगंधी तेल उडून जाते. 
३) हळद पावडर तयार करण्यासाठी इम्पॅक्‍ट पल्वरायजरचा वापर करतात. या यंत्रात हळद फोडण्यासाठी हॅमरचा वापर करतात. तसेच ब्लोअरचासुद्धा वापरला जातो. या यंत्राचे वैशिष्ट्ये असे, की यात हळकुंडापासून थेट हळद तयार होते. चाळणी करण्याची आवश्‍यकता नाही. सदरील यंत्र तीन प्रकारच्या क्षमतेत उपलब्ध आहे. 

यंत्र क्षमता (कि. ग्रॅ./ तास)मोटार (एचपी)
507
25030
50050 x

हळदीचे संप्लवनशील तेल - 
हळदीमध्ये ३.५ टक्के संप्लवनशील तेल असते. हे तेल पिवळ्या रंगाचे असून, हे वेगळे काढण्यासाठी उर्ध्वपातन पद्धतीचा वापर करतात. 

ओलीओरेझीन - 
हळदीच्या पावडरपासून सॉलव्हट एक्‍स्ट्रॅक्‍शन पद्धतीने ओलीओरेझीन वेगळे काढतात. यात हळदीतील मुख्य रंगघटक कुरकुमीन असून, या घटकांच्या प्रमाणात ओलीओरेझीनची गुणवत्ता अवलंबून असते. हे ओलीओरेझीन लोणचे, विविध पेये, बटर पीस आणि आइस्क्रीममध्ये वापरतात. 

रंग - 
कुरकुमीनमध्ये अँटीऑक्‍सिडंट, आगरोधक, अँटीम्युॅरजेनी, जखम भरून आणणारे, जंतुनाशक गुणधर्म आहेत. म्हणून हळदीचा वापर पुरातन काळापासून निरनिराळ्या व्याधींवर उपचार करण्यासाठी करतात. 

हळदीचे लोणचे - 
ओल्या हळदीपासून उच्चप्रतीचे हळदीचे लोणचे तयार करता येते. यासाठी ६ ते ८ महिन्यांच्या हळदीचा वापर करतात. लोणचे तयार करण्यासाठी कच्ची हळद स्वच्छ धुऊन घेतली जाते. त्यानंतर त्याची साल काढून घेऊन त्याच्या ५ ते ६ सें.मी. जाडीच्या चकत्या केल्या जातात. लोणच्यासाठी लागणारे मसाले तळून घेऊन त्या फोडीमध्ये व्यवस्थित मिसळून घेऊन एकत्रित मिश्रणाला ५ ते १० मिनिटे शिजवून घेतले जाते. शिजवल्यानंतर थंड मिश्रणात लिंबाचा रस आणि मीठ मिसळून स्वच्छ काचेच्या बरणीत भरून साठविले जाते. हे लोणचे अत्यंत रुचकर व स्वादिष्ट लागते. 

हळदीच्या पानाचे तेल - 
हळदीच्या पानापासून सुगंधी तेल काढण्यासाठी हळदीची पाने ६ ते ७ महिन्यांची असताना पाने कापून त्यापासून तेल काढतात. याचा वापर सौंदर्य, प्रसाधनामध्ये केला जातो. 

No comments:

Post a Comment