Search here..

Wednesday, January 13, 2016

अंजीर

अंजीर
जमीन 
अगदी हलक्‍या माळरानापासून मध्‍यम काळया व तांबडया जमिनीपर्यंत अंजीर लागवड शक्‍य आहे. भरपूर चुनखडी असलेल्‍या तांबूस काळया जमिनीत अंजीर उत्‍तम वाढते. चांगला निचरा असलेली एक मीटर पर्यंत खोल असलेली कसदार जमीन अंजीरासाठी उत्‍तम होय. मात्र या जमिनीत चुन्‍याचे प्रमाण असावे. खूप काळया मातीची जमिन या फळझाडाला अयोग्‍य असते.

लागवड
जाती 
पुणे अंजीर, दिनकर

अभिवृध्‍दी :
अंजिराची अभिवृध्‍दी फाटे कलमाने केली जाते. खात्रीच्‍या बागायतदाराच्‍या रोगमुक्‍त बागेतील जोमदार वाढीची झाडे निवडून नंतर त्‍यातून उत्‍महाराष्‍ट्रम व दर्जेदार फळे देणारी झाडे निवडावीत व अशा झाडावरील १.२५ सेमी जाडीच्‍या आठ ते बारा महिने फांदया कलमासाठी निवडतात. लावण्‍यासाठी फाटेकरताना फांदीच्‍या तळाचा भाग व शेंडयाकडील कोवळा भाग छाटून टाकावा व मधला भाग रोपे तयार करण्‍यासाठी वापरावा. फाटे कलम तीस ते चाळीस सेमी लांब असावेत. त्‍यावर किमान चार ते सहा फूगीर व निरोगी डोळे असावेत. कलमांचा तळाचा काप डाहेळयाच्‍या काही खाली घ्‍यावा. आणि वरचा काप डोळयाच्‍या वर अर्धा सेमी जागा सोडून घ्‍यावा. दोन्‍ही काप गोलाकार घ्‍यावेत. फाटे कलम गादी वाफयावर ३० × ३० सेमी वर किंवा दोन डोळे मातीत जातील अशी लावावीत. कलमे किंचीत तिरिपी करावीत. लावण्‍यापूर्वी कलमाच्‍या बुडांना आय.बी.जे. किंवा सिरेडिक्‍स यासारखे एखादे मूळ फोडणारे संजीवक लावले तर मुळया लवकर फूटतात.

लागवड : 
अंजिराच्या लागवडीसाठी निवडलेली जमीन उन्हाळ्यात तयार करावी. ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सेंमी आकाराचे खड्डे तयार करावेत. प्रत्येक खड्ड्यात १ किलो सुपर फॉस्फेट आणि २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत टाकून खड्डे १:२ या प्रमाणात शेणखत व पोयट्याची माती यांच्या मिश्रणाने पावसाळ्यापूर्वी भरावेत. लागवड जून - जुलै महिन्यात तयार कलमे लावून करावी. लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांच्या अंतराने कलमांना पाणी द्यावे. कलमांना बांबुंचा आधार द्यावा. कलमांना जर्मिनेटर ५ मिली/लि. पाणी या प्रमाणे द्रावण तयार करून २५० मिली द्रावणाची आळवणी (ड्रेंचिंग) करावे. म्हणजे पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे कलमांची वाढ लवकर जोमदार होते. 
अंजिराची लागवड जून - जुलै ते सप्टेंबर - ऑक्टोबर या महिन्यात करावी. लागवडीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ६ x ६ किंवा ५ x ५ मीटर अंतर ठेवावे.

वळण आणि छाटणी : 
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या फांद्यांची योग्य रितीने छाटणी करावी. छाटणी करताना फांदीचा जोर पाहून ती शेंड्याकडील भागाकडून छाटावी. झाडाची हलकी छाटणी केल्यास छाटणी केलेल्या भागाच्या खालच्या भागावर २ ते ३ डोळे फुटून नवीन वाढीवर भरपूर फळे लागतात. छाटणीनंतर अंजिराच्या झाडावर जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ५० मिलीची १० लि. पाण्यातून फवारणी केल्यास अधिक डोळे फुटून भरपूर फुटवे मिळतात.

फांद्यांना खाचा पाडणे (नॉचिंग) : 
अंजिराच्या फांदीवरील डोळ्याच्या वर २.५ सेंमी लांब आणि १ सेंमी. रुंद तिरकस काप घेऊन खाचा पाडतात. फांदीवर खाच पाडताना साल आणि अल्प प्रमाणात खोडाचा भाग काढला जातो. साधारणपणे ८ - ९ महिने वयाच्या फांदीवर जुलै महिन्यात खाचा पाडतात. त्यामुळे फांदीवरील सुप्त डोळे जागृत होऊन नवीन फुटव्यांची संख्या वाढते. एका फांदीवरील छाटलेल्या भागाखालील तीन - चार डोळे सोडून खाचा पाडाव्यात. 

खते :
एक वर्षाच्‍या झाडाला साधारणपणे १ घमेले शेणखत व १०० ते १५० ग्रॅम अमोनियम सल्‍फेट पुरेसे होते. दरवर्षी हे प्रमाण वाढवीत नेऊन 5 वर्षे वयाच्‍या झाडांना 50 ते 60 किलो शेण खत व १ किलो अमोनियम सल्फेट द्यावे. लहान झाडांना खते नेहमी पावसाळयाच्‍या सुरुवातीला घालावीत नंतर मात्र मोठया झाडांना खते विश्रांततीचा काळ संपताना म्‍हणजे सप्‍टेबर महीन्‍याच्‍या अखेरीस द्यावीत. ५ ते ६ वर्षे वयाच्‍या झाडास ६०० ग्रॅम नत्र २५० ग्रॅम स्‍फूरद व २५० ग्रॅम पालाश दिल्‍याने फळे चांगल्‍या प्रतीची मिळतात.

पाणी :
झाड फळावर आल्‍यावर ऑक्‍टोबर ते मे महिन्‍यात नियमित पाणी द्यावे. जूलै व ऑगस्‍ट हा काळ झाडाच्‍या विश्रांतीचा असतो. फळे लागून वाढत असताना पाण्‍यात हयगय होऊ देऊ नये.
कारण त्‍यामुळे फळांच्‍या आकारावर अनिष्‍ठ परिणाम होतो. फळे पिकू लागल्‍यावर मात्र पाणी अतिशय कमी म्‍हणून आळी नुसती ओली होतील एवढे द्यावे. कारण अधिक पाण्‍याने फळाची गोडी कमी होते. फळे तोडणे पूर्ण झाल्‍यावर झाडाचे पाणी बंद करावे.

बहार धरणे : 
अंजिराच्या झाडाला वर्षातून दोन वेळा पावसाळ्यात 'खट्टा' बहार आणि उन्हाळ्यात 'मीठा' बहार येतो. खट्टा बहाराची फळे जुलै - ऑगस्टमध्ये तयार होतात. परंतु ही फळे चांगल्या प्रतीची नसतात. मीठा बहाराची फळे मार्च - एप्रिलमध्ये तयार होतात. या फळांचा दर्जा व उत्पादन चांगले असल्यामुळे प्रामुख्याने मीठा बहार घेतला जातो. मीठा बहार घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये हलकी मशागत करून पाणी न देत झाडांना ताण द्यावा. नंतर छाटणी करून खताची मात्रा द्यावी. वाफे बांधून बागेस पाणी देणे सुरू करावे. यामुळे झाडे सुप्तावस्थेतून बाहेर पडून ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या काळात झाडावर नवीन फुटीसह फळे येतात.

किडी  व रोग व्यवस्थापन :
अंजिरावर तुडतुडे, खवले कीड, कोळी. पिठ्याकीड, साल व बुंधा पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी, मावा, फळे पोखरणारी अळी, इ. किडिंचा प्रादुर्भाव दिसून येतो.
खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी छिद्रातील आळ्यांचा नाश करून डायक्लोरोफॉस प्रति लीटर 25 मिली मिसळून इंजेक्शनद्वारे सोडावे आणि छिद्र चिखलाने बंद करावे. 

तर तांबेरा रोग आढळतो. नियंत्रणासाठी क्लोरोथालोनिल 2 ग्रॅम + कारबेंडिज़म 1 ग्रॅम प्रति लीटर पाण्यात 10 दिवसाचे अंतराने 8 वेळा फवारावे. वाळलेली पाने जाळून नष्ट करावित.

No comments:

Post a Comment