Search here..

Wednesday, January 13, 2016

केळी

जमीन 
केळी साठी मध्यम ते भारी, भरपुर सेंद्रिय पदार्थ असनारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते. जमीनीचा आकार ६.५ ते ८.० च्या दरम्यान असावा.क्षारयुक्त चोपन जमिनीत केळीची लागवड करु नये.

लागवड हंगामा 
मृग बाग (जुन/जुलै लागवड),
कांदे बाग (आक्टोबर/नोव्हेंबर लागवड)

लागवड 
मृगबाग 
- नवीन मृगबागेची आडवी-उभी मशागत करावी. यासाठी लाकडी कुळव किंवा छोट्या ट्रॅक्‍टरचा वापर करावा. 
- रोपाभोवती खुरपीने निंदणी करून मोकळ्या झालेल्या मातीने खोडांना आधार द्यावा. पावसाचा खंड पडल्यास रोपांना पाणी द्यावे. 
- लागवडीनंतर 75 दिवसांनी प्रतिझाड 82 ग्रॅम युरिया द्यावा. तसेच नत्र व पालाशची मात्रा दर आठवड्याला फर्टिगेशनद्वारे द्यावयाची असेल तर हजार झाडामागे 6.5 किलो युरिया व 3.00 किलो म्युरेट ऑफ पोटॅश लागवडीनंतर 16 आठवड्यापर्यंत देणे चालू ठेवावे.

डिसेंबरमध्ये मृगबाग केळीचे व्यवस्थापन
मृगबागेच्या लागवडीच्या केळी सध्या मुख्य वाढीच्या अवस्थेत आहेत. यांची काळजी अशी घ्या.
* मृगबागेत स्वच्छता ठेवावी, शेत तणमुक्त ठेवावे. 
* मुख्य खोडालगत येणारी पिले धारदार विळ्याने नियमित कापावीत. 
* बागेमध्ये बनाना स्ट्रीक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत, तसेच करपाग्रस्त व पिवळी पडलेली पाने कापून नष्ट करावीत. 
* मृगबाग लागवडीच्या केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रॉपिकोनॅझोल १० मि.लि. प्रति १९ लिटर पाण्यात मिसळून फवारावे. दुसरी फवारणी १० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून करावी. 
* मृगबाग लागवडीच्या वेळी खतमात्रा दिलेली असेलच. आता रासायनिक खताचा हप्ता साधारणपणे केळी लागवडीनंतर १६५ दिवसांनी द्यावयाचा असतो. त्यामध्ये ८२ ग्रॅम युरिया व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रतिझाड या प्रमाणे बांगडी पद्धतीने देऊन लगेच मातीने झाकून द्यावे. 
* ठिबकाद्वारा खत घ्यावयाचे असल्यास केळी पिकास ७१ ते १४६ दिवसांच्या दरम्यान प्रति एकरी १९:१९:१९ हे खत ७५ किलो आणि युरिया १५० किलो ही विद्राव्य खते टप्प्याटप्प्याने द्यावीत. तसेच कॅलशियम नायट्रेट १० किलो प्रति एकरी घ्यावे. हा हप्ता पाच किलो याप्रमाणे दोन वेळा विभागून द्यावा. 
* केळी पीक पाण्यासाठी फार संवेदनशील आहे. हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात पिकाच्या गरजेप्रमाणे पाण्याचे योग्य नियोजन करावे. हिवाळ्यात केळी पिकास ६ ते ७लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिवस याप्रमाणे द्यावे. 
* या महिन्यात गारपीट होण्याची दाट शक्यता असते, त्या पासून बाग संरक्षण करा
* काल दिलेल्या संदेशाचे अवलोकन करा.
* पाण्याचा वापर योग्य करा.

कांदेबाग - 
- कांदेबाग केळीस लागवडीनंतर 30 दिवसांनी प्रतिझाड 36 ग्रॅम युरिया अधिक 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. 
- नत्र व पालाशाची मात्रा दर आठवड्याला फर्टिगेशनद्वारे द्यावयाची असेल तर हजार झाडामागे 5.5 किलो युरिया व 7 किलो म्युरेट ऑफ पोटॅश लागवडीनंतर 12 आठवड्यांपर्यंत देणे चालू ठेवावे. 
- झाडांना पॉलीप्रोपीलीन पट्ट्याच्या साहाय्याने आधार द्यावा.

केळीबागेतील उपाययोजना -
- बागेत स्वच्छता राखावी. बागेतील तणाचे प्रमाण तुलनात्मकरीत्या कमी असले तरी बागा निंदणी, कुळवणी करून स्वच्छ ठेवाव्यात. 
- मुख्य खोडालगत येणारी पिल्ले धारदार विळीने जमिनीलगत दर 2-3 आठवड्यांनी कापावीत. 
- मृगबागेत टिचणी करून जमिनीवरील तडे बुजवावेत. झाडांना माती लावून आधार द्यावा. 
- नियमितपणे ठिबक संचाची पाहणी करावी. गरज भासल्यास दुरुस्ती करावी. 
- सर्व बागेची पाहणी करून विषाणूग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत. 
- नवीन बागेत "इर्विनिया रॉट' या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव आढळल्यास, क्‍लोरपायरीफॉस 600 मि.ली. अधिक कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 600 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* 30 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून घ्यावे. या द्रावणाची प्रति झाड 250-400 मिली या प्रमाणात आळवणी करावी. 
- पिकाच्या अवस्थेनुसार शिफारशीप्रमाणे पाणीपुरवठा करावा. शक्‍यतो रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. 
- बागेतील करपा रोगग्रस्त पाने बागेबाहेर नष्ट करावीत. 
- करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझॉल 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिनरल ऑइल उपलब्ध असल्यास 100 मि.ली. मिनरल ऑइल अधिक प्रोपिकोनॅझॉल 5 मि.ली. किंवा 5 ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रति 10 लिटर प्रमाणे फवारणी करावी. 
- फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी निसवणीच्या अवस्थेत असलेल्या बागांमध्ये शेवटचे पान बाहेर निघतेवेळी किंवा केळफुल बाहेर पडतेवेळी फिप्रोनील (5 एससी) 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन पानांच्या बेचक्‍यातील केळफुलावर फवारणी करावी.

जाती : 
१) बसराई : बसराई ही जात पनामा विल्ट (Panama Wilt) मुळे होणार्‍या बंची टॉंप रोगास (Buchy top Diasease) प्रतिकारक असून बुटकी आहे. मोठ्या आकाराचे घड असतात. कल्पतरू सेंद्रिय खतास चांगला प्रतिसाद देत असून उत्पादनात वाढ होते. हिवाळ्यामध्ये पक्क केळी पिवळ्या रंगाच्या होतात तर उन्हाळ्यामध्ये हिरव्या रंगाचीच राहतात. या जातीच्या केळी लवकर खराब होतात. या जातीच्या फळांना बाक असतो. वेलची सारखी एकदम सलळ येत नाही.

२) श्रीमंती : 
लांब आकाराची केळी असून महाराष्ट्रामध्ये खानदेश भागातील या केळींचा मोठ्या प्रमाणात मागणी असते. इतर भागातील केळीपेक्षा या भागातील केळी सरस ठरतात. बहुधा तो माती आणि हवामानाचा गुणधर्म असावा. केळी उच्च दर्जाची,फळ देखणे व व्यवस्थित असते. चवीत फारसा फरक नसतो. मराठवाडा भागामध्ये या जातीच्या केळी चिवट वाटतात. गोडीला कमी असतात. एका झाडाच्या घडास साधारणपणे १० फण्या असतात. एका फणीमध्ये १८ केळी असतात. हिरवी साल गोल असते. फण्यामधील अंतर जास्त असून खालच्या फण्या चांगल्या पोसलेल्या असतात.

३) वेलची :
या जातीची केळी एकदम सरळ येतात. आकार लहान असून साल पातळ असते. केळी वजनाला कमी असतात. परंतु भाव चांगला मिळतो. कर्नाटक भागातील या जातीच्या केळींना एप्रिल, मे महिन्यामध्ये जादा आवक असलेल्या केळीस ८००० रू. टनाप्रमाणे दर मिळतो. फळाचा रंग लाल असतो. पावसाळा सुरू झाल्यावर लागवड करतात.

४) सोनकेळी :
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागामध्ये या जातीची लागवड दिसून येते. या जातीच्या केळी वेलचीच्या आकारासारख्या येतात.

५) लालकेळी :
या जातीस येरा, आरती, चंद्राबाले, चेन कटली, चेन वाझई अशीही नावे आहेत. आकर्षक लाल जांभळट रंगाची फळे अधिक पैसे मिळवून देणारी जात आहे. घडाचा दांडा, पानाचा देठ आणि झाडाचा बुंधा लालसर रंगाचा असतो. झाडे ७ ते ८ फुट उंचीची असतात. घडात ५ ते ८ फण्या असून प्रत्येक फणीत साधारण १२ ते १४ केळी असतात. केळी थोडीशी वक्राकार असून जाड सालीची, गर गोड , नारंगी पिवळसर रंगाचा असतो.

६) ग्रॅन्ड नैन : 
कॅव्हेन्डीशी या बुटक्या जातीतल्या केळीत ग्रॅन्ड नैनचा समावेश होतो. कॅव्हेन्डीशी या वर्गातील ही सर्वात बुटकी जात. केळीचे प्रचंड उत्पादन व निर्यात करणार्‍या मध्य व दक्षिण अमेरिकन देशात या जातीने आता प्रवेश केला आहे. बुटकेपपणामुळे ही जात जोमदार वार्‍याला यशस्वीपणे तोंड देऊ शकते. कॅव्हेन्डीशीच्या इतर जातींपेक्षा ही जात ३० टक्के अधिक उत्पादन देते. या जातीत पिले देण्याचे प्रमाण जास्त आहे. बुटकेपणामुळे पानांचा पसारा २० टक्के कमी असल्यामुळे एकरी जास्त झाडांची संख्या बसवता येते. मात्र ही जात पाण्याची कमतरता व पाणी साचून राहणे या परिस्थितीला तोंड देऊ शकते नाही. कमी तापमानाला इतर ठेंगण्या कॅव्हेन्डीशीपेक्षा ही जात जास्त यशस्वीपणे तोंड देऊ शकते.

महाराष्ट्राबाहेरील केळीच्या जाती :
१) चक्रकेळी : 
दक्षिण भारतातील आंध्र राज्यातील गोदावरी जिल्ह्यात ही जात लावतात. झाड आठ फुटापर्यंत उंच वाढते. फळाचा आकार मोठा असतो. गर गोड व मधुर असतो.

२) कुन्नन : 
केरळ राज्यातील ही जात उंचीने मध्यम असते. केळीची साल पातळ असून गर चवदार असतो. या जातीचे फळ सुपारीच्या आकारासारखे असते. पिकण्यापुर्वी, वाळवलेल्या केळ्यांचा गर लहान मुलांना अन्न म्हणून देतात.

३) अमृतसागर : 
पश्चिम बंगालमध्ये ह्या जातीची लागवड करण्यात येते. या जातीची गुणवत्ता उत्कृष्ट असली तरी घडाचे वजन कमी व झाड नाजूक असल्यामुळे याची लागवड मोठ्या प्रमाणात तिकडे कुणी करीत नाही. फळाचा आकार मध्यम, साल मध्यम जाड, गर चवदार व पिठूळ असतो.

४) बोंथा : 
ही आंध्र प्रदेशातील केळीची जात अवर्षण परिस्थितीला तोंड देणारी आहे. दक्षिण भारतात परसदारी (घराशेजारी) या जातीची लागवड मोठ्ये प्रमाणात करतात. झाड उंच व खोड फिकट हिरव्या रंगाचे असते. घडाचे सरासरी वजन १० ते १५ किलो भरते. प्रत्येक घडता फळांची संख्या ६० पर्यंत असते. फळाची साल जाड व हिरवी असते. दक्षिणेत लग्नसमारंभ शोभेकरता या घडाचा वापर करतात. म्हणून आंध्रच्या काही भागात या जातीला 'कल्याणवझाई ' म्हणून संबोधतात. कच्च्या फळांचे काप करून तळून खातात. 

५) जायंट गव्हर्नर : 
ही जात बसराईचाच उपप्रकार आहे. पश्चिम बंगालमध्ये अगदी अलीकडेच लोकप्रिय व्हायला लागली आहे. झाड मध्यम उंचीचे, केळीचा आकार मोठा, केळीच्या सालीचा रंग हिरवा व पिवळसर, गर घट्ट व गोड असतो. घडाचे सरासरी वजन १५ किलोपर्यंत असते. ही जात पानांच्या करपा रोगाला बळी पडणारी आहे.

६) विरूपाक्षी : 
ही एक डोंगरी केळीची जात आहे. ही जात तामिळनाडू राज्यातील ३०० -४०० फूट उंचीवरच्या पलानी टेकड्यांच्या भागात कायमस्वरूपी लागवडी (Pereninal) खाली आहे. या केळीची चव व टिकाऊपणामुळे ती तिकडे लोकप्रिय आहे. आंध्रराज्यातील देवळांतील पंचामृताकरता ही जात वापरतात. सपाट, मैदानी भागात हिची लागवड यशस्वी होत नाही. या जातीवर पर्णगुच्छ रोगाचा जास्त प्रादुर्भाव होती.

संकरित केळीच्या जाती: 
१) बोडलमस अल्टाफोर्ट : 
जागतिक स्तरावर तयार केलेली पहिली केळीची संकरित जात. ग्रोमिशेल या प्रसिद्ध जातीवर पानामा रोगाचा प्रादुर्भाव होऊन प्रचंड नुकसान झाले. तेव्हा ग्रोमिशेल x पिसांग लिलीन या जातींचा संकर करून १९६२ साली जमेकात ही जात निर्माण करण्यात आली. ही जात उंच असल्यामुळे जास्त वार्‍याला बळी पडते म्हणून हिचा प्रसार झाला नाही.
२) सी. ओ. १ : 
तामिळनाडू राज्यात विरूपाक्षी या डोंगरी केळीच्या जातीशी संकर करून ही नवीन संकरित जात निर्माण करण्यात आली आहे. ही जात लाडेन x मुसा बाल्वीझियामा या संकराला कदाली या नराशी संयोग करून सी. ओ. १ ही जात निर्मात करण्यात आली आहे. विरूपाक्षी ही डोंगरी केळीची जात मैदानी भागात लावली असताना तिची चव व स्वाद कमी होतो. परंतु सी. ओ. १ जात मैदानी सपाटीक्षेत्रावरसुद्धा विरूपाक्षीसारखीच चव व स्वाद देते. विरूपाक्षी जातीचा घड तयार व्हायला १७ महिने लागतात तर सी. ओ. १ जातीला १४ ते १४।। महिने लागतात.

जमीन : 
भारी कसदार, भुसभुशीत, पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थयुक्त गाळाची सुपीक जमीन केळीस मानवते. केळीची मुळे फार खोलवर जात नसल्याने मध्यम ते कमी खोलीच्या जमिनीत देखील लागवड करता येते. मात्र हे पीक खादाड असल्याने कमी खोलीच्या जमिनीतूनही चांगले उत्पादन घेण्यासाठी अन्नद्रव्याचा भरपूर पुरवठा करणे गरजेचे असते, त्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. सेंद्रिय खतामुळे जमिनीत ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. खडकाळ किंवा जांभ्या खडकाच्या जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असल्याने अशा जमिनीत लागवड केली जात नाही किंवा कमी प्रतिच्या मानल्या जातात. खारवट जमिनी केळीला चालत नाहीत. क्षारांचे शेकडा प्रमाण ८.०५ च्या वर गेलेल्या जमिनी केली लागवडीस अयोग्य आहेत. जमिनीतील थोड्या प्रमाणातील चुनखडी केळीला उपयुक्त ठरते. सामू (pH) थोडा अल्कलीयुक्त असल्यास चालतो.

विभागवार केलीबाबत जमिनीची निवड सांगायचेच झाल्यास जळगाव जिल्ह्यात तापी खोर्‍यातल्या मध्यम खोलीच्या काळ्या जमिनीत लागवड मोठ्या प्रमाणात करता येते. कोकण भागातील जांभ्या जमिनी केळीसाठी योग्य समजतात. ठाणे जिल्ह्यात समुद्र काठाची रेताड जमीन दख्खनमध्ये आढळणार्‍या खोल व तळाशी मुरमाड जमिनी मध्यम काळ्या नरम तांबड्या जमिनी तसेच गुजरातच्या खोल परंतु हलक्या गालाच्या जमिनीत केली यशस्वीरित्या येते.

हवामान : 
केळी हे उष्ण कटिबंधातील फळपीक असून त्यास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. केळीच्या पानांच्या चांगल्या वाढीसाठी २३ डी. ते २८ डी. सेंटीग्रेड तापमान आणि केळीच्या घडाच्या वाढीला थोडे अधिक २९ डी ते ३० डी. सेंटीग्रेड तापमान अधिक फायदेशीर ठरते.

उष्ण कटिबंधात उंच जातीच्या फॅव्हेन्डिशी केळीच्या पानांची वाढ १६ डी. सेंटीग्रेड तापमानाखाली थांबते. आपल्याकडील हिवाळ्यातील तापमान १२ डी. सेंटीग्रेडपेक्षा कमी किंवा उन्हाळ्यातील तापमान ४० डी. सें.ग्रे. पेक्षा अधिक असल्यास पिकाच्या वाढीवर व घडाच्या वाढीवर विपरित परिणाम घडून येतो.

२९ डी. ते २२ डी. सें.ग्रे. पेक्षा कमी तापमानात लोह सोडून सर्वच अन्नद्रव्याचे ग्रहण करण्याचे प्रमाण कमी होते. अधिक तापमानात केळीच्या मुळ्या बोरॉन हे १० पटीने जास्त ग्रहण करतात. पालाश, सोडियम, चुना, लोह आणि जस्त ३ ते ४ वेळा जास्त ग्रहण करतात. नत्र, स्फुरद, मॅग्नेशियाम, मँगनीज, तांबे जास्त ग्रहण झाले तर थंड हवामान केली तयार होण्याचा कालावधी वाढतो. शिवाय कायम स्वरूपी केळीचे पीक घेतले जाते त्या भागात पिले बाहेर पडणे महत्त्वाचे असते. परंतु त्या ठिकाणी पिले कमी बाहेर पडतात.

लागवडीचा हंगाम : 
हवामानाचा केळीच्या वाढीवर, घड येण्याच्या कालावधीवर व घड तयार होण्याच्या कालावधीवर परिणाम होत असतो. त्यामुळे हवामानानुसार केळी लागवडीचा मोसम हा बदलत असतो. जळगाव -खानदेश भागात दोन वेळेला केळीची लागवड करतात. त्या दोन हंगामांना मृगबाग व कांदेबाग म्हणतात. मृग बागेची लागवड मुख्यत: जून महिन्यात करतात. 

जून नंतर अशिराने लागवड केल्यास हिवाळ्यात पडणार्‍या थंडीमुळे झाडाची वाढ खुंटते व फळधारणेचा काळ लांबतो. त्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा पाण्याची सोय असल्यास मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरावड्यात लागवड करावी. त्यामुळे पुढे थंडी पडण्याच्या अगोदर वाढीस जास्त अनुकूल काळ मिळतो. त्यामुळे बाग लवकर तयार होऊन उत्पादनातही वाढ होते.

कांदेबाग लागवडीचा कालावधी हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चालू होतो ते डिसेंबरपर्यंत चालतो. लागवडीनंतर तर १२ महिन्यांच्या आत केळीचे घड कापणीस येतात. ती कापणी २ -३ महिने चालते. कांदेबाग (ऑक्टोबर ) लागवडीची वाढ ही सावकाश होत असली तरी ती पुर्ण होते.

जून लागवडीचे पीक झपाट्याने वाढते. मात्र त्याच्या फळाचा दर्जा व गुणवत्ता कमी असते. शिवाय जून लागवडीपेक्षा ऑक्टोबर लागवडीच्या फळाचा टिकाऊपणा अधिक असतो. शिवाय ऑक्टोबर लावणी ही बिगर हंगामात येत असल्यामुळे मजुर स्वस्त मिळतात. त्यामुळे खुंट काढण्याचा व गड्डे लावणीचा खर्च कमी येतो. नेहमी ऑगस्ट ते ऑक्टोबर हा केळीचा हंगाम असतो. मात्र कांदेबाग लागवडीची केळी फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये बाजारात येत असल्याने आर्थिक फायदा जास्त होतो.

जळगाव जिल्ह्यातील चिनावल, कुंभारखेड या भागात ठिबक सिंचनाने पाण्याची सोय करून रामनवमी किंवा हनुमान जयंतीच्या वेळेस मार्च - एप्रिल नवीनच लागवड होऊ लागली आहे. ह्या काळात लावलेली केळी एैन उन्हाळ्यात दुसरी फळे नसताना येते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.

बेण्यांची निवड : 
केळीची अभिवृद्धी बेणे, मुनवे (गड्डे) पीपर्स यापासून करतात. मुनवे म्हणजे पानासकट गड्ड्याचा वापर करतात. त्यामध्ये तलवारीसारख्या अरुंद व रुंद पानांचे दोन प्रकार असतात. दमट हवामानाच्या भागात अभिवृद्धीसाठी मुनाव्यांचा वापर करतात. कोरड्या व उष्ण हवामानाच्या भागात मुनव्याची पाने कापून राहिलेले गड्डे वापरतात.
गड्डे निवडताना तलवारीसारख्या अरुंद पानांच्या मुनव्यांचे गड्डे वापरावेत. मुनव्यांचे गड्डे शेंड्याकडे निमुळते असावेत. गड्ड्यांसाठी निवडलेल्या मातृवृक्षाच्या घडांना कमीत कमी आठ ते दहा फण्या असाव्यात.
खुंट कापल्यानंतर त्यापासून फुटलेले असे चांगले वाढलेले, जोमदार तलवारीसारख्या पात्यासारखी पाने असलेले गड्डे खोडापासून हळूवारपणे अलग करून घ्यावे. मुळ्यांची शेंडे छाटणी करावी. फुटलेला कोंब सुमारे ३० सेंमी लांबीचा ठेवून शेंडे छाटणी करावी. साधारण नारळाच्या आकाराचे अर्धा ते एक किलो वजनाचे गड्डे लागणीसाठी वापरावे. म्हणजे त्याची वाढ जोमाने होऊन उत्पन्नही वाढते.

लागवडीतील अंतर :
लागवडीतील अंतर हे केळीच्या जातीच्या वाढीवर व जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून असते. लागवडीतील अंतर जास्त असल्यास झाडांची वाढ चांगली होते तसेच घड लवकर लागून मोठे येतात. फळांची प्रतही चांगली राहते. पण अंतर कमी असल्यास झाडांची संख्या वाढून एकूण उत्पादन वाढते. मात्र फळांचा आकार व प्रत बिघडते. घड तयार होण्यास जास्त काळ लागतो. पदेशात केळी निर्यात करावयाची असल्यास केळीच्या घडाचा आकार व प्रत याला जास्त महत्त्व असते. अशावेळी दोन झाडांतील अंतर जास्त ठेवतात. साधारणपणे केळीची लागवड १.८ x १.८ मी. अंतरावर करतात. जळगाव भागामध्ये दाट अंतर असते. ज्या फण्यातील अंतर (सांधा) अधिक असते. त्या फण्यातील केळी अधिक पोसल्या जातात. १०' x १०' अंतर ठेवून ४-४ खोडे (१६ खोडे ) लागतात. नंतर ३ तोडतात व या खोडांचे खत तयार करतात. जातीनुसार केळी लागवडीतील अंतराचा तक्ता खाली दिला आहे.

क्र.   केळीची जात   विभाग   लागवडीचे अंतर फुट
१  लाल केळी        कोकण किनारा   १० x १०   
२   हरीसाल, लाल वेलची, सफेद वेलची     कोकण किनारा   ८ x ८   
३   बसराई            कोकण किनारा   ६ x ६   
४   बसराई         जळगाव   ४.५ x ४.५   
५   वामन केळ      दक्षिण भारत   ८ x ८ किंवा १० x १० 

लागण बहुतांशी चौरस पद्धतीने करतात ३० x ३० x ३० सेंमी. आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये पूर्ण कुजलेले शेणखत, पालापाचोळा आणि कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम व प्रोटेक्टंट आयुर्वेदिक औषध २५ ग्रॅम टाकून खोड लावल्यास वाढ लवकर होते.

मुणवे लागवड : 
केळीच्या लागवडीसाठी अर्ध्या ते एक किलो वजनाचे मुनवे (Suckers) २ ते ३ महिने जुनी निवडावेत. थंडीच्या काळामध्ये वाढ लवकर होत नाही. तेव्हा लागवड करतेवेळी जर्मिनेटर व प्रोटेक्टंटमध्ये खोड संपुर्णपणे बुडवून लावल्यास वाढ लवकर व व्यवस्थित होते. (प्रमाण -१ लि. जर्मिनेटर + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १०० लि. पाणी.) 

खते : 
रासायनिक खते अजिबात वापरू नयेत. नैसर्गिक सेंद्रिय खते (शेणखत, कंपोस्ट खत ), कल्पतरू सेंद्रिय खत वापरल्याने केळी चांगली पोसली जातातच शिवाय जमिनीची भौतिक व जैविक सुपिकता सुधारण्यास मदत होते. त्यासाठी लागवडीच्या वेळी प्रत्येक खड्ड्यात २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत शेणखताबरोबर द्यावे. नंतर २ ते २।। महिन्यांनी साधारण झाडे २ ते ३ फुट उंचीची झाल्यावर प्रत्येकी २५० ग्रॅम कल्पतरू खत द्यावे. नंतर केळकमळ निघतेवेळी ५०० ग्रॅम आणि त्यानंतर १ महिन्याने ५०० ते ७५० ग्रॅम कल्पतरू खत ठिबक जवळ किंवा बांगडी पद्धतीने द्यावे. चौफुलीवर लागवड असल्यास हुंडीभोवती द्यावे. 

पाणी : 
हिवाळ्यामध्ये १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळ्यामध्ये ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देणे आवश्यक आहे. ठिबक सिंचन केल्यास उत्पन्न चांगले येते. वेळेवर पिकाची भूक भागते. पाणी कमी असलेल्या ठिकाणी कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्यास घड चांगला होतो. कल्पतरू हवेतील बाष्पशोषून घेत असल्याने अशा ठिकाणी वरदान ठरते व त्याचा फायद खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातील अति उन्हाळ्यातील अति उष्ण ३८ ते ४४ डी. सें.ग्रे. या तापमानातही कल्पतरू वरदान ठरते. 

किडी : केळीच्या झाडावर किडींचा किरकोळ उपद्रव होतो. विशेषत: मावा, पाने खाणार्‍या अळ्या, मुळ्यावरील सोंडे, फुलकीड, सुत्रकृमी या किडींचा प्रादुर्भाव केळीच्या झाडावर होतो. 

१) मावा : 
मावा ही कीड केळीच्या पानाच्या खालच्या बाजूस आढळते. पर्णगुच्छ (बंची टॉंप) या रोगाचा प्रसार या किडीमुळे होतो. 

उपाय : 
या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट आणि मोनोक्रोटोफॉस या किटकनाशकांची फवारणी करावी. 

२) सोंडे कीड :
भुरकट, काळसर रंगाची कीड असून जमिनीत असणार्‍या कंदात (खोडात) शिरून अंडी घालते. अंडी उबविल्यानंतर अळी कंदावर उपजिवीका करते. अळी कंदातील गर खात खात जात असल्याने तेथील भाग कुजतो, कमकुवत होत जातो आणि शेवटी झाड कोलमडते. 

प्रतिबंधात्मक उपाय : 
१) कीड मुक्त बागेतून बेणे निवडावे.
२) धारधार विळ्याने तासणे.
३) बेणे जर्मिनेटर व बुरशीनाशकाचे द्रावणात बुडवून लावावे.
४) प्रत्येक खोडास २० ते २५ ग्रॅम प्रोटेक्टंटचे द्रावण सोडणे.
५) बागेत स्वच्छता ठेवावी. खोडवा घेणे शक्यतो टाळावे.

३) फुलकिडे : 
केळकमळ बाहेर पडल्यानंतर निसवण्यास सुरुवात होताना त्याच्या खालच्या बाजूला फुल किड्याची अळी अंडी घालते. त्यामुळे फळावर टाचणी तोचल्यासारखे तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. फळ पिकल्यावर ते ठिपके मोठे होतात. परिणामी फळाची प्रत कमी होऊन बाजारभाव कमी मिळतो.

४) खोडकीड : 
जुन्या खोडात व दलदलीच्या ठिकाणी या किडीचा उपद्रव जास्त दिसून येतो. या किडीची अळी खोड पोखरते. त्यामुळे झाड निस्तेज होऊन वाढ खुंटते. छिद्राभोवती तपकिरी रंगाचे वलय निर्माण झाल्याचे दिसल्यावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते.

५) केळीवरील सुत्रकृमी : 
केळीचे उत्पादनात घट येण्यामागचे सुत्रकृमीचा प्रादुर्भाव हे एक मुख्य कारण आहे. सुत्रकृमी हा लांब धाग्याचा (०.२ ते ०.५ मिमी ) प्राणी असून त्याला जगण्यासाठी ओलावा व पिकांच्या मुळ्यांची आवश्यकता असते. केळी पिकावर महाराष्ट्रामध्ये एकूण ११ प्रकारचे सुत्रकृमी आढळून आले आहेत.
त्यापैकी पुढील चार सुत्रकृमीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून यतो. 
१) हेलिकोटामळ कस मल्टीसिक्टस, 
२) होप्लालॅमस इंडिकास, 
३) रोटीनेलक्स रनिकॉर्मिस, 
४) टायलेकोरकिस

ह्या सुत्रकृमींचे अस्तित्व जमिनीत खोडाच्या कंदाच्या मुळ्यात असते. मुळाबाहेर राहून त्यातील रस व गर शोषतात. प्रथम अळी मुळामध्ये घुसून आपली उपजिवीका करून तेथेच अंडी घालते. त्यामुळे पाने पिवळी पडतात, झाडाची वाढ खुंटते, पुर्ण वाढ झालेले झाड कोलमडते. काही प्रसंगी थोड्याप्रमाणात फळगळसुद्धा होते. त्यामुळे जवळजवळ १० ते १५ टनापर्यंत उत्पन्नात घट येते. 

उपाय : 
१) प्रत्येक केळी पिकानंतर मका, ज्वारी, गहू, ऊस अशा पिकांची लागवड करावी. 
२) झेंडूसारखे मिश्रपीक घ्यावे किंवा झेंडूचे आंतरपीक घ्यावे. कारण झेंडूच्या मुळांतून अल्फार्थोनाईल रसायन बाहेर येते ते सुत्रकृमीनाशक असते. 
३) लागवडीपुर्वी २ -३ आठवडे अगोदर एकरी ६०० ते ८०० किलो निंबोळीपेंड जमिनीत मिसळून पाणी द्यावे. ती पेंड कुजवून त्यातून फिनॉल रसायन सल्फर -डाय - ऑक्साईड व कार्बन -डाय - ऑक्साईड वायू बाहेर निघतो. त्यामुळे सुत्रकृमींचे चांगले नियंत्रण होते. 
४) मोहरी, ताग, तीळ अशी मिश्रपिके घेऊन ती ५०% फुलोर्‍यात असतानाचा गाडून हिरवळीचे खत तयार करावे. 

केळीवरील रोग : 
केळीवर मर (पनामा), शेंडे झुपका (बंची टॉंप) तसेच अलिकडच्या काळात सिगाटोका (करपा) हे रोग प्रामुख्याने आढळतात. 

१) मर (पनामा) गोर : 
जमिनीतील कवकामुळे हा रोग होतो. खुंटावरील साल पिवळी होऊन सुकते. पाने कडेला पिवळी होऊन सुकतात. रोगट खुंटाच्या कंदात काळ्या रेषा दिसतात. फळे खराब होतात. पाण्याचा निचरा न झाल्याने किंवा आम्लयुक्त भारी जमिनीत हा रोग होतो.

उपाय : 
बसराई, लालकेळ, हरीसाल या जातीच्या केळी मर रोगास प्रतिकारक आहेत. ५०० मिली जर्मिनेटर आणि २५० ग्रॅम कॉपरऑझीक्लोराईडचे १०० लिटर पाण्यात द्रावण तयार करून ५०० मिली ते १ लिटर द्रावण झाडाचे खोडावरून गोलाकार ओतणे. ८ दिवसांचे अंतराने २ ते ३ वेळा करावे.

२) शेंडे झुपका / पर्णगुच्छ (बंचीटॉंप) : 
हा रोग विषाणूमुळे होतो. मावा किडीमुळे ह्या रोगाचा प्रसार होतो. शेंड्यावर लहान पानांचा झुपका / गुच्छ तयार होतो. झाडांची वाढ खुंटते.

उपाय : 
निरोगी कंद व मुनवे वापरावेत. रोग प्रतिकारक बसराई जातीची केली लावावी. रोगट झाडे काढून टाकावीत. माव्याचे नियंत्रणासाठी प्रोटेक्टंटचे प्रमाण फवारणीपत्रकापेक्षा १ ते २ ग्रॅम / लि. पाण्यासाठी वाढवून घेणे. माव्याचे प्रमाण वाढलेले असल्यास मोनोक्रोटोफॉस २५ मिली १० लि. पाण्यातून फवारावे.

३) पिवळा सिगाटोका (करपा) : 
हा रोग बुरशीमुळे होतो. सतत पाऊस व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळी रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. प्रथम पानावर लहान पिवळसर डाग दिसून येतात. नंतर हे ठिपके ३ ते ४ मि. मी. लांब व १ मि. मी. रुंद होतात. काही दिवसांनी हे ठिपके तपकिरी रंगाचे होऊन आकाराने लांबट, गोलाकार वाढत जाऊन १२ ते १५ मि. मी. लांब व २.५ ते ३ मि.मी. रुंद होतात. ठिपक्याभोवती पिवळे वलय तयार होऊन ठिपके राखाडी होत जाऊन पाने फाटतात. करपल्यासारखी दिसतात व देठापासून मोडून लोंबकळतात. रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यावर केळी पुर्णपणे भरत नाहीत. फळांचा आकार लहान राहतो. अल्पकालावधीत पक्क होऊन घडातून केळी गळू लागतात. फळाचा गर पिवळसर होऊन त्यास दुर्गंध येतो.

उपाय : 
१) लागवडीसाठी कंद शंकु आकाराचे ७५० ग्रॅम ते १ किलो वजनाचे, ३ ते ४ महिने वयाचे, निरोगी बागेतील निवडावे.
२) नत्रयुक्त खतांचा अधिक वापर टाळावा व ६ महिन्यानंतर नत्रयुक्त खतांचा वापर करू नये.
३) बागेस पाणी दुपारच्या वेळेत द्यावे. पाणी देताना आवश्यकतेनुसार देणे.

मुनवे लागवडीच्या वेळी : 
मर, पर्णगुच्छ (Bunchy Top) होऊ नये म्हणून - जर्मिनेटर १०० मिली + ५० ग्रॅम प्रोटेक्टंट + कार्बेनडेझीन १० ते १५ ग्रॅम + १० लिटर पाणी या द्रावणात मुणवे पुर्ण बुडवून लागवड करावी.

मुळकुज होऊ नये व वाढ निरोगी होण्यासाठी आळवणी : 
जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + १०० लि. पाणी हे द्रावण तयार करून प्रत्येक मुणव्याचे भोवती खोडावरून १०० मिली, १५० मिली, २०० मिली या प्रमाणात ३ वेळा आळवणी करणे.

फवारणी :
१) पहिली फवारणी : लागवडीनंतर १ महिन्याने : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ राईपनर १०० मिली. + प्रोटेक्टंट १५० ते २०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : लागवडीनंतर २।। ते ३ महिन्यांनी (पिकाच्या निरोगी, जोमदार वाढीसाठी) : जर्मिनेटर ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ३०० ते ४०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : लागवडीनंतर ४ ते ५ महिन्यांनी (पिकाच्या निरोगी, जोमदार वाढीसाठी) : जर्मिनेटर ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ३०० ते ४०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांनी (रोग प्रतिकार शक्ती वाढून जोमदार वाढ व कमळ लागण्यासाठी ):जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ न्युट्राटोन ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

५) पाचवी फावणी : लागवडीनंतर ७ ते ८ महिन्यांनी : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

६) सहावी फवारणी : लागवडीनंतर ९ महिन्यांनी (केळी पोसण्यासाठी) :थ्राईवर १ लि . + क्रॉंपशाईनर १ ते १।। लि .+ राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम ते १ किलो + न्युट्राटोन १।। लि. + हार्मोनी ४०० ते ५०० मिली.+ २०० ते २५० लि.पाणी. 

घडांची काढणी : 
लोंगर येण्याचा काळ हा निरनिराळ्या जातीनुसार व लागणीच्या हंगामानुसार वेगवेगळा असतो. काही वेळेस एकाच जातीच्या झाडास लोंगर बाहेर येण्यास कमी जास्त वेळ लागतो. बुटक्या जातींना १२ ते १४ आणि उंच जातींना १४ ते १६ महिन्याचा कालावधी लागतो. लोंगर बाहेर आल्यानंतर ९० ते १४० दिवसात घड तयार होतो. बसराई केळीचे लोंगर ८ ते १२ महिन्यात बाहेर पडतात. लाल वेलची, सफेद वेलची व मुठेळी जातीचे लोंगर बाहेर पडण्यास ९ ते १३ महिन्याचा कालावधी लागतो. 

घडातील सर्व फण्या बाहेर पडल्यावर त्याच्या टोकाला असलेल्या वांझ फण्या कापून घ्याव्यात हे केळफुल कापल्याने घडातील केळी चांगली पोसून वजन वाढते. 

घडाचा गर्द हिरवा रंग फिक्कट हिरवा होऊन फळावरील शिरा जाऊन फळांना गोलाई येते. फळावर टिचकी मारल्यावर धातूवर टिचकी मारल्यासारखा आवाज येतो. तेव्हा घड कापणीस आला असे समजावे. चांगल्याप्रकारे तयार झालेला घड काढल्यावर ४ -५ दिवसांनी पिकतो. मात्र लांबच्या बाजारपेठेत माल पाठवायचा असल्यास ७५% पक्क झाल्यावर म्हणजे घड पक्क होण्यासाठी १० ते १५ दिवस वेळ असतानाच काढणी करावी. म्हणजे वाहतुकीच्या काळात घड न पिकता कठीण राहतो. घड काढताना लांब दांडा ठेवून काढावा. म्हणजे वाहतुकीत सोईचे होते. घड काढल्यानंतर मात्र झाड बुंध्यापासून कापून टाकावे. काही भागात खोड ३ -४ महिने तसेच ठेवतात किंवा अर्धे कापतात. त्या मागचा हेतू हाच की, पील बाग ठेवायचा (धरायचा) असल्यास खोडातील अन्नद्रव्ये पिले बागेला मिळावीत. घड डोक्यावरून वाहताना खरचटणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण साल खरचटल्याने केळ पिकल्यावर काळे पडते. घड काढल्यानंतर ट्रक वॅगनमध्ये भरण्यापुर्वी ऊन, पावसापासून बचाव होण्यासाठी सावलीत ठेवावेत. 

निर्यातीसाठी पाठवायच्या केळीची काढणी :
* केळीचे घड काढण्यापुर्वी बागेला आठवडाभर अगोदर पाणी देणे बंद करावे. त्यामुळे घडांची काढणी आणि शेतातून वाहतूक करणे सोईचे होते. 
* बागेमध्ये तात्पुरता निवारा उभारून तेथे घडाच्या फण्या वेगळ्या कराव्यात. घडावर मेणाचा किंवा बुरशीनाशकाचा वापर करणे सोईचे होते.
*  बागेमेध्ये तात्पुरता निवारा उभारून तेथे घडाच्या फण्या वेगळ्या कराव्यात. घडावर मेणाचा किंवा बुरशीनाशकाचा वापर करणे सोईचे होते.
*  निर्यातीसाठी केळी ७५% पक्क असावी आणि केळाला खरचटणे किंवा डाग असलेली वेडीवाकडी केळी काढून टाकावी.
*  केळीवरील धारा जाऊन गोल आकार आला की केळी ७५% पक्क झाली असे समजावे.
*   बसराई केळीचा घड ७५% तयार झाल्यावर केळातील गर व केळावरील साल यांचे प्रमाण ३५:१ किंवा ४०:१ असते.

काढणीच्या वेळी वरच्या फणीपासून २० ते २५ सेमी लांबीचा दांडा ठेवून घड कापावा आणि तो केळीच्या पानांवर जमिनीवर ठेवावा. घडातील शेवटच्या (खालच्या) फणीतील केळी जर लहान असेल तर ती कापून काढावी.
निर्यातीसाठी केळी ही मोठी, आकर्षक असणे आवश्यक असते. तर काही वेळेस घडातील फणीमधील काही केळी लहान राहते. त्यासाठी वेळीच सप्तामृत औषधांच्या फवारण्या केल्या तर पुर्ण घडातील सर्व फण्यांचा व केळीचा आकार मोठा, एकसारखा, आकर्षक मिळतो. त्यामुळे काढणीच्या ८ - १० दिवस अगोदर लहान केळीच्या विरळण्याचा खर्च कमी होतो. शिवाय ही लहान केळीदेखील पुर्ण पोसल्यामुळे उत्पादनात वाढ होते.

साठवण : 
घड काढणीनंतर १० ते १५ मिनिटे पाण्यात बुडवून ठेवावेत, म्हणजे घडाचे तापमान कमी होऊन जीव रासायनिक प्रक्रिया मंदावते, तसेच घडावरील जीवाणू पाण्यामुळे धुवून जातात. त्यामुळे साठवणुकीचा (टिकाऊक्षमतेचा) काळ वाढतो.
घडाची काढणी करताना कापलेल्या दांड्याला पॅरेफिन मेण किंवा व्हॅसली लावतात. वाहतुकीत किंवा साठवणूकीत बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे बुरशीमुळे केळी सडण्याला प्रतिबंध होतो. शिवाय केळी आकर्षक दिसून जास्त दिवस टिकतात. या प्रक्रियेसाठी १०० घडांना अर्धा किलो मेण पुरेसे होतो.
केळी साठवणुकीसाठी साधारणत: १३ ते १५ डी. सेल्सिअस तापमान व ८० ते ८५% आर्द्रता असल्यास १८ ते २२ दिवड टिकाऊपणा वाढतो. १३ डी. सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यास केळी काळ्या

केळीसाठी फर्टिगेशन : 
ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबतच विद्राव्य खते देण्याच्या पद्धतीस फर्टिगेशन असे म्हणतात. टिश्यूकल्चर केळी लागवड हे आधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे त्यास सर्व आधुनिक तत्वांची जोड देणे गरजेचे आहे. टिश्यूकल्चर केळी रोपांजवळ कुठल्याही प्रकारचे अन्नद्रव्य साठविलेले नसल्याने लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी त्वरीत फर्टिगेशन सुरू करणे गरजेचे आहे. आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून पारंपारिक खतांचा वापर करण्यात येत आहे. परंतु या खतांची उपलब्धता अत्यंत कमी असल्यामुळे आणि ती पूर्णपाने पाण्यात विरघळणारी नसल्याने विद्राव्य खते वापरणे हिताचे आहे. त्याचप्रमाणे पारंपारिक खतांची कार्यक्षमता ३० ते ५० % असून विद्राव्य खतांची कार्यक्षमता ८० ते ९० % आहे. त्याचाप्रमाणे विद्राव्य खते ही आम्लधर्मीय असल्याने क्षारता की करण्यास मदत करतात. विद्राव्य स्वरूपातील खते वापरावयाची झाल्यास १० ते २० टक्के अन्नद्रव्याची बचत होवू शकते.

फर्टिगेशन खतांची मात्रा व वेळापत्रक : 
नत्र २०० ग्रॅम, स्फुरद : ६० ग्रॅम , पालाश : २८० ग्रॅम प्रति झाड. या खतांच्या मात्र फक्त मार्गदर्शनासाठी असून मातीपरीक्षण अहवालानुसार व प्रत्यक्ष अनुभवानुसार त्यात बदल करावेत.

आंतर मशागत व तण नियंत्रण : 
केळी लागवडीनंतर शेत भुसभुशीत रहावे म्हणून तीन महिन्यापर्यंत कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. मुळांना इज होणार नाही अशाप्रकारे आंतरमशागत करावी. माती भुसभुशीत करून झाडाला भर लावावी. तन महिन्यानंतर आंतर मशागत करू नये. वेळोवेळी तणांचा बंदोबस्त करावा. लागवड पावसाळयानंतरची असल्यास जास्त वेळा आंतर मशागत करायची गरज नाही.

पिल कापणे :
 केळी रोपे लागवडीपासून तिसऱ्या महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात मुख्य खोडाच्या बाजूला पिलांची निर्मिती होते. ही पिले वेळोवेळी कापली नाहीत तर मुख्य पिकला स्पर्धा करतात व अन्नद्रव्याचा ऱ्हास करतात. त्यासाठी अशी पिले विळ्याच्या सहाय्याने कापत रहावीत. यासाठी कुठल्याही तणनाशकाचा उपयोग करू नये. त्यामुळे केळीच्या कंदाला इजा होऊन रोग व किडींना आमंत्रण मिळते.

पाने व केळफूल कापणे : 
जसजशी झाडाची वाढ जोमाने होते तसे नवीन पाने येण्याचे प्रमाण वाढते. सर्वसाधारणपणे दर महिन्याला ४ ते ५ नवीन पाने येतात. तेव्हा जुनी व खालची पाने पिवळी होऊन सुकतात. ती पिवळी किंवा सुकलेली पाने कापून शेताच्या बाहेर नेउन टाकावीत किंवा कंपोष्ट खड्ड्यात घालावीत. परंतु कुठलेही हिरवे पान कापू नये. केळफूल बाहेर पडायच्या आधी झाडवर कमीत कमी १५ ते १६ कार्यक्षम पाने असावीत. केळी वाढीच्या काळात कमीत कमी १० ते १२ पाने झाडावर असावीत याची काळजी घ्यावी.

केळफूल बाहेर पडल्यानंतर जेव्हा सर्व कळ्या मोकळ्या होतात. त्यानंतर लहान फुलफणी निघतात अशा दोन फुलफण्या बाहेर पडल्यानंतर केळफूल कापावे. त्यात विलंब झाल्यास घडाच्या भरणीवर विपरीत परिणाम होतो.

झाडाला आधार देणे : 
टिश्यू कल्चर केळीची घडाचे सरासरी वजन २५ ते ३५ किलोच्या दरम्यान असल्याने वजनाने झाडे झुकतात किंवा सोयाट्याचा वारा आल्यानंतर मोडतात. म्हणून झाडाला बांबूचा आधार द्यावा.

केळी घड झाकणे : 
केळीचा घड बाहेर पडल्यानंतर घडाच्या दांड्याचे उष्ण सुर्यप्रकाशापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी केळीच्या वाळलेल्या पानांचे पेंढी करून ते घडांच्या दांड्यावर पानांमध्ये अडकवून दांडा आणि घडांचे उष्ण तापमान हवामानापासून संरक्षण होईल. अन्यथा दांड्यावर प्रखर उन्हामुळे काळा डाग पडतो व दांडा सडून घड गळून पडतो.

केळी निर्यात करायची असल्यास किंवा ज्या परिसरात बनाना रेड ईस्ट थ्रीप्स या किडीचा प्रादुर्भाव असल्यास ५ मायक्रॉन गेजच्या बॅगेला क्षेत्राच्या १० % हिस्सा होईल अशा प्रकारे ४ ते ५ मी. मी. आकाराचे छिद्र पाडावे व ती बॅग घडावर घालून संरक्षण करावे.

खोडव्यांसाठी पिलाची निवड करणे : 
सर्व साधारणपणे ७५ ते ८० % केळफूल बाहेर पडल्यानंतर किंवा पहिली कापणी सुरू झाल्यानंतर घडाच्या विरुद्ध दिशेने, नवीन आलेला, न कापलेला व तलवारीसारखी पाने असलेला आणि खोडाच्या सर्वांत जवळ असलेला एक पील निवडावा व त्याला खोडवा पीक म्हणून त्वरित अन्नद्रव्याची मात्रा द्यायला सुरुवात करवी.

अशाच पद्धतीने निदव्याची पद्धत पण करावी. या पद्धतीने आपणास १२ महिन्यात पहिले पीक आणि २० ते २१ महिन्यात दुसरेपीक आणि २८ ते ३० महिन्यात तिसरे पीक असे एकूण ३० महिन्यात तीन पिके मिळतात.

केळी खोडापासून धागा निर्मिती

कृषी विज्ञान केंद्र, पाल, ता. रावेर, जि. जळगाव.
महाराष्ट्रात अंदाजे ७२,००० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. केळी घड / लोंगर काढल्यानंतर केळी खोड निरूपयोगी म्हणून बाहेर फेकले जाते आणि जाळले जाते. काही शेतकरी थोड्याप्रमाणात त्याचा उपयोग कंपोस्ट खत करण्यासाठी करतात. केळी लागवड बहुतांशी १.५ x १.५ मिटर (५ x ५ फूट) अंतरावर केली जात असल्याने हेक्टरी ४,४४० झाडे किंवा एकरी १,७४० झाडे असतात. केळी घड काढल्यानंतर पाने, खोड, घडाचा दांडा आणि जमिनीखालील खोड / कंद शिल्लक राहतात. या शिल्लक अवशेषाचा उपयोग खालीलप्रमाणे होतो.

अ) कंद : पिल्लांपासून नवीन लागवडीसाठी बियाणे. मुख्य कंद गुरांसाठी खाद्य किंवा सरपण/ इंधन म्हणून उपयोग.
ब) खोड : वरील ८ ते १० पापुद्यांपासून धागा निर्मिती आतील पांढऱ्या गाभ्यापासून गोड किंवा खारट कँडी.
क) पाने: मध्यशिरेपासून धागा निर्मिती. पानापासून द्रोण, लहान डिश आणि पत्रावळी तयार करणेबाबत कृषी विज्ञान केंद्र पाल येथे प्रयत्न चालू नयेत.
ड ) घडांच दांडा : केळी घड काढल्यानंतर झाडावर शिल्लक राहिलेल्या दांड्यापासून धागा निर्मिती.

महाराष्ट्राचा विचार केल्यास केळीबाबत …
केळी धागा उद्योग : 
१) कमी गुंतवणूकीत हा स्वयंरोजगार सुरू करता येतो. धागा काढण्याच्या मशिनची किंमत रू. २२,००० / - असल्याने भांडवल गुंतवणूक कमी आहे. तसेच किंमतीवर महाराष्ट्रा शासनाच्या कृषी विभागार्फत २५% किंवा जास्तीत जास्त रू. ५००० / - पर्यंत अनुदान दिले जाते.
२) केली धागा काढण्याच्या मशिनवर एका दिवसात ८० ते १०० खोडापासून १५ ते २० किलो धागा निघतो.
३) एक मशिनवर केळी धागा निर्मिती उद्योगात दररोज तीन युवक / मजुरांना रोजगार उपलब्ध होतो.
४) धागा काढत असताना खोडातील पाणी (सॅप) आणि चोथा शिल्लक राहतो.

पाण्यापासून नैसर्गिक रंग तयार करता येती किंवा या पाण्याला गाळून / फिल्टर करून पॉटॅश पुरवठ्यासाठी केळी बागेत उपयोग करता येतो.

चौथ्यापासून स्टार्च वेगळा करून स्टार्च उद्योग सुरू करता येईल. स्टार्च काढल्यानंतर राहिलेल्या शिल्लक मालापासून कंपोस्टखत / गांडूळ खत तयार करता येते.

क) केळी धागा निर्मितीमुळे संभाव्य परिणाम :

१) बेरोजगार युवकांन त्यांच्या गावातच स्वयंरोजगार उपलब्ध होईल.
२) केळी खोड / कच्चामाल गावातच उपलब्ध असल्याने टंचाई आणि वाहतूक खर्च या समस्या नाहीत.
३) शेतकऱ्याने धागा काढल्यास त्याला हेक्टरी ६५० ते ७५० किलो धागा मिळून त्यापासून हेक्टरी रू. १५,००० / - ते रू. २०,००० / - पर्यंत निव्वळ नफा मिळेल.
४) केळी धाग्यापासून रोजच्या वापरातील वस्तू किंवा शोभेच्या वस्तू करून महिला बचत गटांना आर्थिक लाभ होईल. 
५) केळी धाग्यापासून हातकागद बनविण्याचे उधोग महाराष्ट्रात केळी उत्पादक भागात उभारून रोजगार तसेच आर्थिक लाभ वाढविता येईल.
६) केळी धाग्यापासून हेदलूम / पावरलूमवर कापड / साडी करता येत असल्याने कापड निर्मिती हा स्वतंत्र उधोग उभारला जाऊ शकतो.

कालांतराने केळी धागा निर्मिती आणि त्यावर आधारित उधोग हा ग्रामीण भागातील एक रोजगार आणि उत्पन्न देणारा 'कुटिरोद्योग' होऊ शकतो. 'कचर्‍यापासून सोने निर्मिती' हे दृश्य स्वरूपात नजिकच्या भविष्यात शक्य आहे. अशाप्रकारे केळीच्या सर्व भागांचा विविध प्रकारे उपयोग शेतकऱ्यांना होत आहे आणि म्हणूनच केळी शेतकऱ्यांसाठी 'कल्पतरू' आहे.

केळी खोडापासून धागा काढण्याची मशीन :
'कृषी विज्ञान केंद्र राजमंद्री, आंध्रप्रदेश' यांनी विकसित केली असून या मशिनची निर्मिती 'आंध्रप्रदेश स्टेट अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कापॉरेशन लि. ' हे करतात. या मशिनची किंमत रू. २२,००० / - आहे. या मशिनद्वारे सुरवातीस रोज ८ ते १० किलो धागा आणि अनुभवाअंती १५ ते २० किलो धागा प्रतिदिनी निघतो. प्रति हेक्टरी ६५० ते ७५० किलो धागा मिळतो. सरासरी एक किलो धागा काढण्यासाठी रू १५ पर्यंत खर्च येतो. एका खोडापासून सरासरी २०० ग्रॅम धागा निघतो. म्हणजेच ५ खोडांपासून १ किलो धागा निघतो. खर्च वजा जात प्रति हेक्टरी रू. १५ ते २० हजार निव्वळ नफा मिळू शकतो.

धाग्याचा उपयोग : 
या धाग्याचा उपयोग बारीक दोरी, दोर, शोभेच्या वस्तू, पिशवी, हात कागद, क्रॉप्ट पेपर, टिश्यू पेपर, फिल्टर पेपर, नोटांसाठी कागद, कापड, पृष्ठ, फाईलसाठी जाड कागद, सुटकेसेस, बुटांचे सोल इ. मध्ये केला जातो. धाग्याची लांबी ७५ सेमी ते १ मीटर पाहिजे.

धाग्याचा भाव :
१) पांढरा शुभ्र धागा : रू. ६ ०ते ८० प्रति किलो.
२) सिल्व्हर शाइन धागा : रू. ४० ते ६० प्रति किलो.
३) पिगमेंटयुक्त धागा : रू २५ ते ४० प्रति किलो.

केळी धागा काढण्यासाठी लागणारा प्रतिदिनी खर्च 

तपशिल  खर्च / दिनी (रू.)  १) केळी धागा मशिनवरील घसारा    १०.०० २) बागेतून खोड बाहेर काढणे व खोडाच्या 
७.५ ते १० सेंमी रुंद पट्ट्या करणे आणि धागा 
काढणे ( रू. ५० x तीन मजूर)  १५०.०० ३) किरकोळ खर्च (मशिन वाहतूक, दुरुस्ती इ.)   ५०.००  ४) विजेचा खर्च ( ६ युनिट x २.५ रू.)    १५.००   ----------  एकूण खर्च  २२५.००  

एका दिवसात (८ तास) सरासरी १५ किलो धागा निघतो. महणजे प्रतिकिलो रू. १५ खर्च येतो. एका किलोचा सरासरी भाव रू. ४५ प्रति किलो मिळाल्यास रू. ३० निव्वळ नफा मिळतो. हेक्टरी ४३५० केळीची झाडे असतात, पैकी धागा निर्मितीसाठी ४००० झाडे उपलब्ध झाल्यास ७०० किलो धागा मिळेल. रू. ४५ प्रति किलो भावानुसार रू. ३१,५०० / - उत्पन्न मिळेल. प्रति किलो घाग्याचा खर्च रू. १५ प्रमाणे ७०० किलो धाग्याचा खर्च रू.१०,५०० येऊन रू. २१,००० / - निव्वळ नफा हेक्टरी राहतो.

केळी उत्पन्नाव्यतिरिक्त धागा निर्मितीमुळे शेतकऱ्यांना अधिक/ बोनस उत्पन्न मिळते. बऱ्याच वेळी नैसर्गिक आपत्ती, केळीची कमी भाव, केळी माल वेळेत बाजारपेठेमध्ये व गेल्याने होणारे नुकासन इत्यादी कारणामुळे शेतकऱ्याला फार मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत खोडापासून धागा काढल्यास आर्थिक नुकसान कमी करता येते. यंत्राद्वारे केळी खोडाव्यतिरिक्त केळी घडाचा दांडा, पानाची मध्यशिर, घायपात / केतकी इत्यादीचा धागा काढता येतो.

धागा काढण्याच्या यंत्राची तांत्रिक माहिती:

१) ह्या यंत्रास एक अश्वशक्ती, सिंगल फेज, २२० व्होल्टस विद्युत मोटार पासून शक्ती मिळते.
२) यंत्राची लोखंडी फ्रेम मजबूत असून त्यावर विद्युतमोटर, बेल्ट - पुली व त्यावर जाळीचा पिंजरा तसेच फिरत्या लोखंडी पट्ट्याचा ड्रम व त्यावर अर्धगोलाकार झाकण बसविलेले असल्याने हे यंत्र सुरक्षित आहे.
३) ड्रमवर आडव्या जाड पट्ट्या बसविलेल्या आहेत.
४) केळी खोडाच्या पट्ट्या यंत्रामध्ये जाण्यासाठी मार्गदर्शक रूळ बसविलेले आहेत. त्याआधी तांब्याच्या तारांचे दोन ब्रश धागा साफ करण्यासाठी आहेत.

संपर्क पत्ते :
यंत्र खरेदी : जनरल मॅनेजर, आंध्रप्रदेश स्टेट अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लि., अॅडव्होकेटस कॉलनी . ए. सी. गार्डस, हैद्राबाद - ५००००४ 
फोन नं - (०४०) २३३९४२३४ 

नैसर्गिक रंग निर्मिती : स्कूल ऑफ लाईप सायन्सेस
उत्तम महाराष्ट्र विद्यापीठ, पोस्ट बॉक्स ८०, जळगाव - ४२५००१
फोन नं. (०२५७) २२५८४१७ 

केली धागा निर्मिती आणि गांडूळ खतप्रशिक्षण
प्रमुख शास्त्रज्ञम कृषी विज्ञान केंद्र, पाल ता. रावेर, जि. जळगाव - ४२५५०४
फोन नं. (०२५८४) २८८४३९ / २८८५२५ 

केळी धागा विक्री :
१) मे. नेशनल हँडमेड पेपर इंडस्ट्रीज इंडस्ट्रीयल एरिया, रामसिंगपुरा, शिकेरपुर रोड, संगनीर, जयपूर ३०३९०२. (राजस्थान) 

२) मे. जैन इंडस्ट्री, ६४५, गंगौरी बजार, जयपूर - ३०२००२.(राजस्थान)

३) मे. सुरेशकुमार, इकासिल हँडमेड पेपर, १.१० - ११०६, ज्योती नगर, जि. करीमनगर.

४) सलिम पेपर प्रा. लि. , ई - १४२ / १४३, सितापुर इंडस्ट्रीअल एरिया, टॅक रोड, जयपूर - ३०२०२२

No comments:

Post a Comment