प्रस्तावना
सध्या बाजारपेठेत प्रामुख्याने तूप, लोणी, दूध पावडर, दही, लस्सी, पनीर, खवा हे दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध आहेत. केवळ दूध विकण्यापेक्षा दुग्धजन्य पदार्थांतून अधिक नफा मिळतो. घरगुती स्तरावर दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी लहान क्षमतेची यंत्रे उपलब्ध आहेत. त्यांचा वापर निश्चितपणे फायदेशीर ठरतो.
दूध शीत करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्र :
दुधामध्ये स्निग्धांश, प्रथिने, मेद, जीवनसतत्त्वे आणि पाणी यांचे प्रमाण मुबलक असल्याने सूक्ष्मजीवांची वाढ दुधात लगेच होते. पर्यायाने दूध लवकर नासते किंवा खराब होते म्हणजेच दूध जास्त काळ टिकवायचे असल्यास दुधातील सूक्ष्मजीवांची वाढ आणि संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी दूध तापवणे, थंड करणे किंवा इतर तत्सम प्रभावी प्रक्रिया करणे क्रमप्राप्त ठरते. यापैकी बहुतांशी प्रक्रियाने दुधाच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात बदल होण्याची शक्यता असते. त्यासाठी दुधास थंड तापमानास ठेवून दूध अधिक काळापर्यंत टिकवणे सोयीचे व किफायतशीर ठरते. त्यासाठी खालील उपकरणांचा उपयोग करावा.
फ्रिज :
- फ्रिजमध्ये एक लिटरपासून ते २० लिटरपर्यंत दूध ५ ते १० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवता येते.
- बाजारात १५० लिटर ते ५०० लिटर क्षमतेचे फ्रिज उपलब्ध अाहेत. त्यांची सर्वसाधारण किंमत १०,००० रुपये व त्यापेक्षा जास्तची आहे. फ्रिज वापरण्यास सुरक्षित आहे.
बल्क कुलर :
- ज्या दूध उत्पादकांकडे १०० ते १००० लिटरपर्यंतचे दूध संकलन आहे, अशांसाठी बल्क कुलर फायदेशीर आहे. बल्क कुलर चौकोनी, आयताकृती आणि अंडाकृती आकारात उपलब्ध आहेत. हे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असते.
- यामध्ये दुधाचे तापमान ५ ते १० अंश सेल्सिअस राखता येत असल्याने दुधाची टिकवण क्षमता वाढते. दोन वेळचे दूध संकलन एकाच वेळी करणे शक्य होते.
- बल्क कुलर हे दुहेरी पत्र्याने बनवतात. आतील-बाहेरील पत्र्यांमध्ये थर्माकोल, ग्लासवुल किंवा इतर उष्णतारोधक पदार्थाचा लेप दिलेला असतो, त्यामुळे बल्क कुलरमधील दुधाच्या तापमानावर बाहेरील वातावरणातील तापमानाचा परिणाम होत नाही.
- बल्क कुलरमधील दूध थंड करण्यासाठी कॉम्प्रेसरची जोडणी केलेली असते. हे विद्युत अथवा जनरेटरवर चालवता येते. या उपकरणाच्या वरील बाजूस एक झाकणी असून, एक ढवळणीसुद्धा जोडलेली असते. या ढवळणीमुळे दुधाचे तापमान सर्व ठिकाणी समान राखले जाते. दुधावर साय येत नाही.
- बहुतांश दूध शीतकरण केंद्रावर बल्क कुलर उपलब्ध आहेत. याची किंमत अंदाजे १ ते १० लाखांपर्यंत आहे.
- राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व काही दूध प्रक्रिया केंद्रामार्फत दूध उत्पादकास किंवा दूध संकलकास बल्क कुलर वितरित करण्यात येते.
डीप फ्रिजर :
- याचा वापर आइस्क्रीम, पनीर, श्रीखंड व इतर दुग्धजन्य पदार्थ अधिक काळास साठवण्यासाठी केला जातो.
- यामध्ये ० अंश सेल्सिअस ते -२८ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान राखले जाते. याची क्षमता १०० ते १००० लिटर किंवा अधिक असते. हे विजेवर चालते.
- डीप फ्रिजर हे स्टेनलेस स्टील किंवा फायबरमध्ये तयार केलेले असतात. याचा उपयोग दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी होतो.
दूध तापवण्यासाठीची उपकरणे :
- दुधाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी दूध निर्जंतुक करणे आवश्यक असते. त्यासाठीची प्रभावशील प्रक्रिया म्हणजे दुधाचे पाश्चरायझेशन किंवा दूध तापवणे.
- या प्रक्रियेत दूध ७२ अंश सेल्सिअस तापमानावर १५ सेकंदांसाठी किंवा ६३ अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटे तापवून थंड करण्यात येते. असे दूध पिण्यास सुरक्षित असते.
- दूध तापवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बॅच पाश्चरायझर (एलटीएलटी) किंवा प्लेट पाश्चरायझर (एचटीएसटी) चा वापर सर्वत्र होताना दिसून येतो.
- बॅच पाश्चरायझर हे उपकरण लहान स्तरावर दूध प्रक्रिया करणाऱ्या दूध उत्पादकास अत्यंत फायदेशीर आहे. या उपकरणात दूध ६३ अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटांसाठी तापवून निर्जंतुक करता येते. उपकरणाची क्षमता ५० ते ५०० लिटर असून, यातील दूध गॅस किंवा वाफेच्या ऊर्जेवर तापवले जाते.
- बॅच पाश्चरायझर हे उपकरण गोलाकार आकारात उपलब्ध आहे. हे स्टेनलेस स्टीलच्या दुहेरी पत्र्याचे बनलेले आहे. दोन पत्र्यादरम्यान गरम पाणी किंवा वाफ फिरवली जाऊन आतील दूध अप्रत्यक्षरीत्या गरम होते. यामुळे दुधाची करपण्याची किंवा दूध लागण्याची शक्यता कमी असते. तापलेले दूध याच उपकरणातून थंडदेखील करता येते.
- उपकरण वापरण्यास सोपे व सुरक्षित असून दही, आइस्क्रीम, पनीर व तत्सम पदार्थ करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. उपकरणातील दूध एकसमान तापवण्यासाठी उपकरणात एक ढवळणीदेखील पुरवलेली असते.
- याची किंमत अंदाजे ८०,००० रुपये आहे. क्षमतेनुसार किंमत वाढत जाते.
डॉ. ज्ञानेश्वर पतंगे
डॉ. डी. के. कांबळे
(लेखक कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत)