Search here..

Friday, November 4, 2016

माझीशेतीमार्फत शेतीची दशा आणि दिशा बदलण्यासाठी “ग्रामीण शाश्वत विकासाची” पायाभरणी वाफगावमध्ये सुरु.

(राजगुरुनगर/जिल्हा:पुणे)

शेतमाल व उत्पादनांना उत्तम व खात्रीशीर बाजारपेठ मिळवून देण्याच्या अनुषंगाने माझीशेती संस्थेद्वारे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा शाश्वत विकास करण्यासाठी “ग्रामीण शाश्वत विकास (RSD) उपक्रम राबाविला जात आहे. याच वाटचालीत दि.०२/११/२०१६ रोजी वाफगाव (ता.राजगुरुनगर) येथे माझीशेती संस्थेमार्फत ग्रामीण शाश्वत शेती उपक्रमाचा उद्देश सांगितला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावचे सरपंच मा.श्री.अजय भागवत यांना या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आश्वासन दिले. 
ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची सुरुवात करताना वाफगाव ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्यासोबत माझीशेती  RSD  प्रकल्पातील सर्व सदस्य उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना श्री.अजय भागवत उपसरपंच म्हणाले की,शेतकऱ्यांना फक्त माझे ‘शेतकरी बांधव’न म्हणता, त्यांच्या शेतीमालाला सुयोग्य भाव आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवून देण्याचे प्रयत्न करायला पाहिजे.यासाठी गावातील तरुण युवक व प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माझीशेतीच्या सहकार्याने काम करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. श्री. शैलेश मांदळे यांनी गावातील तरुण शेतकऱ्यांना भौगोलिक बंधने विसरून उज्वल भविष्याला गवसणी घालण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर करून प्रगत शेती करण्याची गरज आहे असे सांगितले. तांत्रिकदृष्ट्या सक्षम तरुणांना उद्देशून बोलताना तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करून शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन केले.
जुईली गांधी यांनी ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची माहिती देताना गावातील अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर दिला. प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रयोगांना प्रसिद्धी देऊन इतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह शेती करण्यासाठी माझीशेतीच्या RSD प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. RSD प्रकल्पाच्या माध्यमातून शेती मार्गदर्शन, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण, बांधावरील बैठक या अश्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करणे आणि तयार झालेला शेतीमाल विक्रीसाठी हमी भाव देण्यासाठी प्रयत्न करणे असे माझीशेतीचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. 

डाळिंब पिकातील उत्पादनाच्या दृष्टीने मधमाश्यांचे योगदान…. (१६११०४)

डाळिंब पिकातील उत्पादनाच्या दृष्टीने मधमाश्यांचे योगदान…. (१६११०४)
संकलन - जुईली गांधी 

डाळिंब पिकातील जास्तीत जास्त उत्पादनाच्या दृष्टीकोनातुन अत्यंत महत्वाच्या असणा-या परागीभवनाच्या क्रियेत मधमाश्या मह्तवाचे योगदान देत असतात. परंतु डाळिंब पिकावर होत असलेल्या विविध किटकनाशकांच्या फवारणीतुन मधमाश्या वाचत नाही, त्यामुळे मधमाश्यांचे संगोपन करुन त्यांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी मधुमक्षिका पालन करणे गरजेचे आहे.


मधमाशा व पिके एकमेकांना पूरक
भारत अन्नधान्याच्या उत्पादनात जगात पाचव्या स्थानी आहे. मात्र महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची स्थिती फारशी चांगली नाही. अल्पभूधारक शेतकरी आजही शेतीला योग्य पूरक व्यवसायाच्या शोधात आहे. ‘मधुमक्षिका’ पालन हा त्याच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो़ पृथ्वीवरील जीवांच्या उत्क्रांती प्रक्रियेत प्राणी जीवन निर्माण होण्यापूर्वी फुलणाऱ्या वनस्पतीवर खाद्यासाठी पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या मधमाश्यांचा जन्म झाला. शेतातील पिके, वनस्पती व मधमाशा हे एकमेकांना पूरक आहेत. शेतपिकापैकी गळिताची धान्ये, कडधान्ये, चाऱ्याची पिके, मसाल्यांची पिके, बियाण्याची पिके व फळफळावळ यासारखी पिके परागभवनासाठी मधमाशांसारख्या किटकावर अवलंबून असतात. मधमाशांना परागफलन केल्याने या पिकांची प्रत वाढत असल्याचे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत. मधमाश्यांअभावी चांगले उत्पादन होऊ शकत नाही असा निष्कर्षही या संशोधकांनी काढला आहे. इतर कोणत्याही कीटकांपेक्षा पराग फलनासाठी मधमाशा कार्यक्षम आहेत.
मधमाशी पालनातील अडचणी
मधमाश्यांच्या एका वसाहतीत सुमारे ५ ते १० हजार मधमाशा असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात परागसिंचन करण्याची क्षमता दुसऱ्या कोणत्याही किटकांत नसते. या मधमाशा फुलातील मकरंद गोळा करून मधाची निर्मिती करतात. त्यांचे हे कार्य निरंतर सुरू असते. पाळीव मधमाश्यांच्या वसाहतीच्या माध्यमातून हमखास परागफलन करता येते. महाराष्ट्रात सुमारे २१० लाख हेक्टर क्षेत्र निरनिराळ्या पिकांच्या लागवडीखाली आहे. तृणधान्य व भुईमूग वगळता सर्वच गळितांच्या पिकांच्या फुलोऱ्यापासून मधनिर्मिती केली जाते. मात्र मधमाशी पालनात काही अडचणी आहेत. खरीप व रबी हंगाम वगळता अन्य हंगामात त्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. कीटकनाशकांचा अती वापर हा मधमाशांसाठी हानीकारक ठरला आहे.
स्वयंरोजगार प्रदान करणारा व्यवसाय
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी शासनाने डॉ. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यांनी आपल्या अहवालात शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी अशी शिफारस केली आहे. मधमाशी पालनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असा निष्कर्ष डॉ.घुगल व डॉ. राहिले यांनीही आपल्या अभ्यासात नोंदविला आहे. मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना एकरी पिक वाढीस मदत मिळू शकते. फुलात सुकून वाया जाणारा मकरंद व पराग मधमाशांच्या माध्यमातून गोळा करून कोट्यवधी रुपये किमतीच्या मधाची व मेनाची निर्मिती केली जाऊ शकते. मधमाशी पालन हा व्यवसाय स्वयंरोजगार प्रदान करणारा ठरू शकतो. यासोबतच या व्यवसायाला लागणारे पूरक व्यवसाय देखील गावांत निर्मित केले जाऊ शकतात. एका शेतकऱ्याने ८ ते १० वसाहती पाळल्यास त्याला चांगला मोबदला मिळू शकतो.

संदर्भ - दैनिक लोकमत

Sunday, October 30, 2016

तुमचा लॅपटॉप / डेस्कटॉप आम्हाला द्याल का?? - महेश बोरगे

तुमच्या किंवा तुमच्याशी संबंधित असलेल्या मित्र-मैत्रिणीं, सहकारी, कुटुंबे, नातेवाईकांमध्ये सुस्थितीत असलेले लॅपटॉप / डेस्कटॉप आम्हाला द्याल का??? 



आधुनिक शेती किंवा नाविन्यपुर्ण व्यावसायिक शेती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे क्रमप्राप्त आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आजही संगणक वापरताना मागे हटतो परिणामी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आणि सहकार्यापासुन शेतकरी दुर राहतात. माझीशेतीच्या प्रशिक्षण विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणातून असे पुढे आले आहे. यामध्ये प्रामुख्याने संगणक वापरता येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संगणक प्रणाली घेणे टाळतो. माझीशेतीकडून याविषयावर सविस्तर चर्चा करून व्यावसायिक शेती अभ्यासक्रम सुरू करणेत आला आहे. परंतु शेतकऱ्यांची उत्पादकता कमी असल्यामुळे शेतकरी संगणक घेणे आवश्यक बाब समजत नाही. यामुळेच माझीशेतीकडून व्यावसायिक शेतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या गरजू शेतकऱ्यांना लॅपटॉप / डेस्कटॉप देण्याचे ठरविले आहे. 

आपण दिपावलीच्या मंगल प्रसंगी लॅपटॉप, डेस्कटॉप, आधुनिक मोबाईल खरेदी करतो, तुम्हीही केला असेलच. अश्यावेळी जुना लॅपटॉप / डेस्कटॉप घरी पडून असेल तर तो कृपया आम्हाला द्या. डिजिटल इंडिया मध्ये 1% शेतकरी डिजिटल आहेत मात्र 99% अजूनही प्रतीक्षेत आहेत. तुमचा पुढे केलेला एक हात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जाणार आहे. 

आपणाकडून मिळालेले लॅपटॉप / डेस्कटॉप ग्रामीण भागातील गरजू शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना गरजेचे आणि अतिशय महत्त्वाची संसाधने मिळवण्यासाठी आपण दिलेल्या डोनेशनचा उपयोग केला जातो. दैनंदिन जीवनातील शेतीच्या कामकाजासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून घ्यावयाच्या माहितीसाठी आणि मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी वापर करायला देण्यात येणार आहेत. 

माझीशेतीचा दस्तऐवजामध्ये / डेड स्टॉकमध्ये तुमच्या दिलेल्या योगदानाचा समावेश केला जाईल व योग्य तपासणी करून गरजू शेतकरी गटांना प्रति गट एक याप्रमाणे संगणक देण्यात येईल. यामुळे झालेल्या अमुलाग्र बदलाचा मासिक अहवाल सर्वत्र प्रकाशित केला जाईल. 

Call us - 9975740444
Write us - mazishetifoundation@gmail.com
Know us - mazisheti.org
Like us - fb.com/agriindia
Twit abt us - @mazisheti
Link with us - LinkedIn.com/in/mazisheti