Search here..

Tuesday, August 29, 2017

गांडुळ संवर्धन आणि गांडूळखत निर्मीती

गांडुळ जीवनक्रम

गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांढूळखत तयार करतात.

१) जागेची निवड व बांधणी - 

गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मिटर, मधील उंची ३ मिटर, बाजूची उंची १ मिटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार ५ ते २५ मिटर पर्यंत असावी. छप्परामध्ये १ मिटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत. चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचरट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पध्दतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते.



२) गांडुळ खाद्य - शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुध्दा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीतकमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे- अर्धे वापरून गांडूळखत करता येते. गांडूळामध्ये शेतातील ओला पाला-पाचोळा, भाजी पाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांची अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड याचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना काही प्रमाणात (एक तृतीअंश) शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडुळखत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगँस प्लँन्टमधून निघालेली स्लरीसुध्दा गांडुळखाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्या अगोदर गांडुळखाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सुक्ष्म जीवाणू संवर्धक (बँक्टेरीअल कल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रीयेस वापरावे. वरील संवर्धक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय पुणे-५ यांच्याकडे उपलब्ध होऊ शकेल. या व्यतीरीक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरीया व एक किलो सुपरफॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रीया लवकर होवून गांडूळखत लवकर तयार होईल.


३) गांडूळखत वेगळं करणे - गांडुळखत आणि गांडुळे वेगले करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडुळखत वेगळे करता येईल. शक्यतो खत वेगळे करताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाही. या व्यतीरीक्त दुसऱ्या पध्दतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळखताचा थर हलक्या हाताने गोळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडुळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे.


गांडुळखताचे फायदे - 
१) जमिनीचा पोत सुधारतो. 
२) मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. 
३) गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. 
४) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 
५) जमिनीची धूप कमी होते. 
६) बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. 
७) जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो. 
८) गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात. 
९) गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. 
१०) जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.


गांडूळ खतातून मिळणारी सूक्ष्म खनिज द्रव्ये.
कमी खर्चात जमिनीचा पोट सुधारून पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि पिकाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी गांडूळ खत हा उत्तम पर्याय आहे. गांडूळ खतामुळे सूक्ष्म खनिज द्रव्ये मिळतातच शिवाय फॉस्फेट,सेल्युलोज सारखे एन्झायीम आणि ओक्झीन, जीब्रालिक अॅसिड सारखी संजीवके ही मिळतात ज्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते.
ओल्या जमिनीत या खतात आलेल्या अंड्यामुळे गांडुळे निर्माण होतात, ती जमीन सच्छिद्र ठेऊन मुळांची वाढ होण्यास मदत करतात.
गांडूळ खतामध्ये खालीलप्रमाणे सूक्ष्म खनिज द्रव्ये असतात.
सेंद्रिय कर्ब - ९.८ ते १३.४ टक्के,
नायट्रोजन - ०.५१ ते १.६१टक्के,
फॉस्फोरस - ०.१९ ते १.०२ टक्के, 
पोटॅशियम - ०.१५ ते ०. ७३ टक्के, 
कॅल्शियम - १.१८ ते ७. ६१ टक्के, 
झिंक - ०.००४२ ते ०.११० टक्के, 
कॉपर - ०.००२६ ते ०.००४८ टक्के, 
मँगनीज - ०.०१०५ ते ०.२०३८ टक्के