Search here..

Friday, March 3, 2017

माझीशेती:शेतीसल्ला(१७०३०३)


     मशरूम(आलिंबी)

·                                    मशरूमला जगभर एक पौष्टिक अन्नम्हणून मान्यता मिळालेली आहे. भारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन नुकतेच सुरु झाले आहे व जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.आपल्या शरीराच्या वाढीसाठी व सुस्थितीत राहण्याकरिता १० अमिनो आम्लांची गरज असते. ही दहा अमिनो आम्ले मशरूम मध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत.
·                             मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण ते संपूर्णतः शाकाहारी असून त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. मशरूमवरील संशोधनानंतर मशरूम मध्ये अॅन्टी व्हायरलअॅन्टी कॅन्सरचे विशेष गुणधर्म आढळून आले आहेत. मशरूममध्ये तंतुमय पदार्थ अधिक आहेत. तसेच फॉलिक अॅसिड आहे. हे दोन्ही घटक पचनक्रिया सुरळीत ठेवण्याकरिता मदत करतात. कमी उर्जेचा आहार, वजन कमी करण्याकरिता उत्तम असतो. मशरूम मध्ये कमी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ असतात. हा आहार लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम आहे.
                मशरूम लागवड प्रक्रिया
*काड भिजवणे:
प्रथम काड लांब असल्यास त्याचे ३-५ सें.मी. चे तुकडे करावेत. नंतर थंड पाण्यात १०-१२ तास भिजवावे. भिजलेले काड बाहेर काढून निर्जंतुक करावे. निर्जन्तुकीकरणा करिता गरम पाण्यात १ तास ठेवावे.
*निर्जंतुकीकरण:
निर्जंतुकीकरणा करिता २०० लि. क्षमता असणारा गंज नसणारा ड्रम घ्यावा. त्यात १०० लि.पाणी टाकावे व ते ८० ते ८५ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम करावे व त्यात भिजवलेले काड १ तास ठेवावे. त्यानंतर २ तास निर्जंतुक केलेले काड निथळण्याकरिता ठेवावे.
*बी पेरणे:
प्लास्टिकच्या पिशवीत काडाचा थर द्यावा. अंदाजे दोन ते अडीच इंच. नंतर त्यावर पिशवीच्या कडेने बी पेरावे. बीच्या थरावर पुन्हा काडाचा थर द्यावा. पुन्हा बी चा ठार, असे करून पिशवी भरावी.
बी पेरताना ओल्या काडाच्या २% प्रमाणात पेरावे. पिशवी भरताना काड दाबून भरावे. पिशवी भरल्यावर दोर्याच्या सहाय्याने तोंड बांधावे व पिशवीला २५-३० छिद्रे मारावीत. छिद्रे पाडताना दाभान किंवा गंज नसलेल्या सुईचा वापर करावा.
*उबविणे:
बुरशीच्या वाढीकरिता उबविने ही महत्वाची क्रिया आहे. बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात. खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस ठेवावे.
*पिशवी काढणे:
पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. ती ब्लेडने कापून काढावी व रॅकवर ठेवावी. तापमान २० ते ३० अंश सेल्सियस  व आद्रता ७०-८५% राहील याची दक्षता घ्यावी. खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवावी. पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी. दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी करावी. फवारणी करण्याकरिता पाठीवरचा स्प्रे पंप किंवा हॅन्ड स्प्रेचा वापर करावा.
*काढणी:
मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत होते. वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत. मशरूमकाढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे. १० दिवसांनी दुसरे पीक, परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात.
एका बेड (पिशवी) पासून ९०० ते १५०० ग्रॅम पर्यंत ओली आळिंबी मिळते. शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून करण्यात येतो.
                आळिंबी लागवड प्रक्रिया:
काड भिजवणे १२ ते १५ तास गरम पाण्यात निर्जंतुक करणे
१ तास
पिशव्यांमध्ये बी भरणे
उबविणे
१४ ते २० दिवस
पिशवी काढणे
२-३ दिवस
१ ली काढणी
४-६ दिवस
२ री काढणी
५-६ दिवस
३ री काढणी
                   साठवण
        ज्या आळिंबीची (मशरूमची) साठवण छिद्रे पाडलेल्या २००-३०० गेजच्या प्लास्टिक पिशवीत करतात. ४-५ दिवस फ्रीजमध्ये मशरूमउत्तम राहते. मशरूम उन्हात दोन दिवसात उत्तम वळते. मशरूम वाळवण्याकरिता ४५-५० अंश सेल्सियस तापमान योग्य ठरते. वाळविलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.
मशरूम उत्पादन येण्याकरिता महत्वाच्या बाबी :
१. मशरूम उत्पादन परिसर स्वच्छ ठेवावा.
२. मशरूमचे उत्पादन बंदिस्त जागेतच घ्यावे.
३. मशरूमच्या खोलीत खेळती हवा राहील, याची काळजी घ्यावी.
४. खोलीतील तापमान ३० अंश सेल्सियस व आद्रता ८०% राहील याची काळजी घ्यावी.
५. आळिंबी लागवड करणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी. स्वच्छ कपडे, चप्पल यांचा वापर करावा.
६. नवीन व स्वच्छ कोरडा कच्चा माल वापरावा.
७. काडाचे निर्जंतुकीकरण महत्वाची प्रक्रिया आहे. ती योग्य करावी.
८. सूर्यप्रकाश प्रत्यक्ष येऊ देऊ नये. संधीप्रकाश बॅग उघडल्यावरच भरपूर ठेवावा.
९. मशरूम बेडवर फवारण्याचे पाणी स्वच्छ असावे.
१०. पिशव्या भरण्यापूर्वी काड फार ओले नसावे. हाताने दाबून पाहावे. पाणी न निघाल्यास भरण्यास योग्य आहे, असे समजावे.
११. पिशव्या ठेवताना दोन पिशव्यातील अंतर १० इंच ठेवावे.
१२ .रोग, किडीचा, चिलटांचा प्रादुर्भाव झाल्यास नुवान ( १ मि.मि., १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.)
१३. आळिंबीचे स्पॉन विश्वसनीय संस्थेमार्फतच घ्यावे. जुने, काळसर, हिरवी बुरशी असणारे स्पॉन वापरू नये.
१४. भरलेल्या बेड (पिशव्या) मध्ये कीडी, रोगांचा प्रादुर्भाव झाला तर नाही ना, या करिता दर रोज निरीक्षण करावे.
१५.  मशरूमची काढणी वेळेत करावी. योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. उन्हात किंवा ड्रायरमध्ये आळिंबी सुकवून सीलबंद पाकिटात साठवण करावी.
अशा पद्धतीने काळजी घेतल्यास आपण यशस्वी उत्पादन घेऊ शकतो.

         
                मशरूमची विक्री व्यवस्था
१) ताजे मशरूम २५ ते ३० रुपये प्रति किलो घाऊक दराने विकले जातात. पुणे- मुंबईत भाजी मंडईत सहज विक्री होत आहे.
२) वाळवलेले मशरूम विक्री हा ताज्या मशरूम पेक्षा विक्रीस सोपा प्रकार आहे. ताजे मशरूम वाळवून (सूर्यप्रकाशात/ड्रायर मध्ये) सीलबंद केल्यास ३ वर्षे टिकतात. त्यामुळे खराब होण्याची भीती नाही. वाळविलेले मशरूम २५० ते ३०० रुपये प्रति किलो दराने खरेदी केले जातात.
                                                                           स्रोत:वनराई संस्था 

Tuesday, February 28, 2017

पालक: भाजीपाला (१७०२२८)

प्रस्‍तावना
       पालक ही अतिशय लोकप्रीय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषणमुल्‍ये लक्षांत घेतांं पालकाची लागवड मोठया प्रमाणावर होणे आवश्‍यक आहे.
     पालकाच्‍या भाजीत अ आणि क  जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात तसेच प्रोटीन्‍स आणि कॅल्शिअम, लागवडीसाठी लोह, फॉस्‍फरस इत्‍यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पालकांचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्‍यादीमध्‍ये करतात. पालकाची भाजी काही प्रमाणात सारक आहे.
हवामान
      पालक हे कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्‍यामुळे महाराष्‍ट्रात कडक उन्‍हाळयाचे एक दोन महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचे उत्‍पादन जास्‍त येऊन दर्जा चांगला राहतो. तर तापमान वाढल्‍यास पीक लवकर फूलो-यावर येते आणि दर्जा खालावतो.
जमीन
    पालकाचे पीक विविध प्रकारच्‍या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. ज्‍या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत तेथे पालक घेता येते.
सुधारीत जाती 
   पालक ऑल ग्रिन पुसा ज्‍योती, पुसा हरित या पालकाच्‍या भारतीय कृषी संशोधन संस्‍था नवी दिल्‍ली येथे विकसि‍त करण्‍यात आलेल्‍या सुधारित जाती आहेत.
लागवड
  महाराष्‍ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळ जवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जून – जूलैमध्‍ये आणि रब्‍बी हंगामातील लागवड सप्‍टेबर आक्‍टोबरमध्‍ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्‍यासाठी 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने हप्‍त्‍या हप्‍त्‍याने बियांची पेरणी करावी. पालक हे कमी दिवसात तयार होणारे पीक असल्‍यामुळे जमिनीच्‍या मगदुरानुसार योग्‍य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फेकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्‍यास वापसा आल्‍यावर पेरणी  करावी. बी ओळीत पेरतांना दोन ओळीत 25-30 सेंटीमीटर अंतर ठेवावे. फार दाट लागवड केल्‍यास पिकाची वाढ कमजोर होवून पानांचा आकार लहान राहतो आणि पिकांचा दर्जा खालावतो. लागवडीपूर्वी बियाण्‍याला थायरम या बुरशीनाशकाची 2 ग्रॅम दर किलो बियाण्‍याला या प्रमाणात प्रक्रिया करावी. त्‍यामुळे मर रोगाला प्रतिबंध होतो. पालकाच्‍या एक हेक्‍टर लागवडीसाठी 25-30 किलो बियाणे लागते.
खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन
     पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी हिरव्‍या टवटवीत पानांवर पिकाचे उत्‍पादन व प्रतीक्षा अवलंबून असल्‍यामुळे पालकाच्‍या पिकाला नत्राचा मोठया प्रमाणावर वापर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्‍याचा नियमित पुरवठा करुन जमिनीत ओलावा राखणे आवश्‍यक आहे.
पालकाच्‍या पिकाला जमिनीच्‍या मगदुरानुसार हेक्‍टरी 20 गाडया शेणखत 80 किलो नत्र 40 किलो स्‍फूरद आणि 40 किलो पालाश द्यावे. शेणखत पूर्वमशागतीच्‍या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्‍फूरद आणि पालाश 1/3 नत्र पेरणीच्‍या वेळी द्यावे. उरलेले नत्र 2 समान भागांत विभागातून पहिल्‍या आणि दुस-या कापणीच्‍या वेळी द्यावे. ज्‍या जातीमध्‍ये दोन पेक्षा जास्‍त कापण्‍या करता येतात तेथे प्रत्‍येक कापणीनंतर हेक्‍टरी 20 किलो नत्र द्यावे.
     पानातील हिरवेपणा अधिक चांगला येऊन उत्‍पादन वाढविण्‍यासाठी बी उगवून आल्‍यानंतर 15 दिवसानी आणि प्रत्‍येक कापणी नंतर 1.5 टक्‍के युरिया फवारावा. बियांच्‍या पेरणीनंतर लगेच पाणी दयावे किंवा वापसा आल्‍यानंतर पेरणी करावी. त्‍यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्‍यानंतर पिकाला नियमित पाणी दयावे. हिवाळयात पालकाच्‍या पिकाला 10 ते 12 दिवसांच्‍या अंतराने पाणी द्यावे. काढणीच्‍या 2-3 दिवस आधी पिकाला पाणी द्यावे. त्‍यामुळे पाने टवटवीत राहून पिकाचा दर्जा सुधारतो.
किड रोग आणि त्‍यांचे नियंत्रण
    पालकावर मावा, पाने कुरतडणारी अटी आणि भुंगेरे यांचा उपद्रव आढळतो.या किडींच्‍या नियंत्रणासाठी पीक लहान असतानांच 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने 15 मिली एन्‍डोसल्‍फॉन ( 35 टक्‍के प्रवाही ) 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे. काढणीच्‍या 8 – 10 दिवस आधीच फवारणी करू नये.
    पालकावर मर रोग,  पानांवरील ठिपके, तांबेरा आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होतो.मर रोगामुळे उगवण झाल्‍यावर रोपांची मर होण्‍यास सुरुवात होते. हया रोगाच्‍या नियंत्रणासाठी पाण्‍याचा योग्‍य निचरा करावा आणि पेरणीपूर्वी बियाण्‍यावर थायरम हया बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. हवेतील आर्दता वाढल्‍यास पानांवर गोल करडया रंगाचे बांगडीच्‍या आकाराचे डाग पडतात. हया बुरशीजन्‍य रोगामुळे पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. या रोगाच्‍या नियंत्रणासाठी ताम्रयुक्‍त बुरशीनाशकाची उदाहरणार्थ, ब्‍लॉयटॉक्‍स किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराईड 10 लिटर पाण्‍यात 20 ग्रॅम हया प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
  केवडा आणि तांबेरा रोगांचा फारसा उपद्रव होत नाही आणि शेतातील ओलावा नियंत्रित ठेवल्‍यास या रोगांना आळा बसतो.
काढणी उत्‍पादन आणि विक्री
    पेरणी नंतर सुमारे 1 महिन्‍याने पालक कापणीला तयार होते. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15 ते 30 सेंटीमीटर उंचीची झाल्‍यावर पानांच्‍या देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सेमी भाग ठेवून वरील भाग खुडून अथवा कापून घ्‍यावा. आणि पानांच्‍या जूडया बाधाव्‍यात. त्‍यानंतर 15 दिवसाच्‍या अंतराने जातीनुसार 3-4 किंवा त्‍यापेक्षा जास्‍त खुडे करावेत. कापणी करतानांच खराब रोपे वेगळी काढून जुडया बांधाव्‍यात काढणीनंतर पालक लगेच बाजारात पाठवावा. जुडया उघडया जागेत रचून वरून झाकून घेऊन किंवा बांबूच्‍या टोपल्‍यामध्‍ये अगर पोत्‍यामध्‍ये  व्‍यवस्थित रचून भरून विक्रीसाठी पाठवाव्‍यात. टोपलीच्‍या खाली आणि वर कडुनिंबाचा पाला ठेवल्‍यास पालक लागवडीसाठीवकर खराब होत नाही. वाहतुकीस जुडयांवर अधून-मधून थंड पाणी शिंपडल्‍यामुळे पानांचा तजेलदारपणा टिकून राहतो. मात्र पाणी जास्‍त झाल्‍यास सडण्‍याची क्रिया सुरु होते. म्‍हणून जुडयांवर जास्‍त प्रमाणात पाणी मारु नये.  पालकाचे उत्‍पादन पिकाच्‍या लागवडीची वेळ, जात, खुडे आणि पिकाची योग्‍य काळजी यांवर अवलंबून असते. सर्वसाधारण्‍पणे हेक्‍टरी 10 ते 15 टन एवढे उत्‍पादन मिळते. शिवाय बियाण्‍याचे उत्‍पादन 1.5 टनापर्यंत मिळू शकते.
                                                       स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन