Search here..

Thursday, April 19, 2018

ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची अक्षय तृतीयेला कोल्हापुरात मुहर्तमेढ

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पातील "बेदाणा क्लस्टर विकास प्रकल्प"मधील व्यवसाय शृंखला प्रकल्प कोल्हापूरमध्ये सुरु करण्यात आला. याप्रसंगी माझीशेतीच्यावतीने कोल्हापूर जिल्हा कृषी व्यवस्थापक नरेंद्र जाधव यांनी ठरावावर स्वाक्षरी केली तर प्रकल्पाच्या सुरुवातीसाठी अन्नपुर्णा सेवाभावी महिला संस्थेच्या वतीने समाजसेविका डॉ. आश्लेषा चव्हाण यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी शिल्पा पाटील, जयश्री पाटोळे, सुजाता साळोखे, फरीदा शेख व इतर व्यवसाय गटांच्या प्रतिनिधी महिला उपस्थित होत्या. 


सांगली, नाशिक, सोलापुर, सातारा, अहमदनगर या द्राक्ष उत्पादक ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकासासाठी माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प कार्यरत आहे. अवकाळी पाऊस, बाजारपेठ चढ-उतार, व्यापारी मनमानी या सर्व अडचणींवर मार्ग काढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल विक्री करण्याची जबाबदारी अन्नपूर्णा संस्थेने उचलली आहे. 

बचत गट आणि स्वयंसहायता गट या कल्पनेला फाटा देऊन माझीशेती अध्यक्ष महेश बोरगे यांच्या व्यवसाय गट या संकल्पनेच्या विस्तृत मागणीला पाठींबा मिळत आहे. उत्पादन, मुल्यवर्धन, विक्री आणि सेवा या चतुःसूत्रीने शेतकरी, ग्रामीण आणि शहरी व्यावसायिक गट (बचत गट, स्वयंसहायता गट, सुशिक्षित बेरोजगार गट, विद्यार्थी गट) एकत्रित बांधले गेल्यामुळे शासनाच्या "शेतकरी ते ग्राहक थेट विक्री" योजनेला पाठबळ मिळत आहे. गुणवत्ता व्यवस्थापन करण्यासाठी अतिउच्च धोरण ठेवून "विषमुक्त अन्न सोसायटीमध्ये पोहोचवण्यासाठी माझीशेतीची यंत्रणा कार्यरत आहे. 

संपुर्ण प्रकल्पामध्ये कौशल्य विकास करण्यावर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. तासगाव जि.सांगली येथून प्रायोगिक स्तरावर नोंदणी केलेल्या १००० शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती उत्पादने करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. त्यांच्या उत्पादित शेतमालाचे वर्गीकरण, निवड, वेष्टन करण्यासाठी व्यवसाय गटांना व्यवसाय व्यवस्थापन आणि विक्री कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. माझीशेतीच्या धोरणांना कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जात नाही त्यामुळे शहरी सोसायटीमधील कुटुंबांची ओढ दिवसेंदिवस वाढत आहे. 

कृषी, ग्रामीण विकास, नाबार्ड, महापालिका, नगरपालिका अश्या शासकीय संस्थाच्या सहाय्याने विक्री व्यवस्था सक्षम झाली आहे. सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी रोजगार निर्मिती, आरोग्य, उपजीविका, कौशल्य विकास अश्या उपक्रम राबविण्यासाठी या प्रकल्पामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन महेश बोरगे यांनी केले.