Search here..

द्राक्ष वेलीवरील विकृती व त्यावरील उपाय

द्राक्ष मण्यांच्या प्रामुख्याने देठाची जळ (स्टॉंक निक्रोसीस), शॉर्ट बेरीज, वॉटर बेरीज, पिंक बेरीज, मणी हिरवे राहणे (दाढे मणी ) या विकृती आढळतात.

द्राक्षमण्याच्या देठाची जळ (स्टॉंक निक्रोसीस)
या विकृतीमध्ये द्राक्षमण्यात साखर भरण्याचे वेळेपासून देठावर टाचणीचे टोकाएवढे प्रथम पांढरट तपकिरी ठिपके पडून नंतर ते काळपट तपकिरी होतात आणि पक्ववेत वाढ होत असताना या ठिपक्यांच्या आकारातही वाढ होऊन असे अनेक ठिपके एकत्र आल्याने घडांचे अथवा मण्यांचे देठ जळून जातात. पक्वता जशी वाढत जाईल तसतशी ही विकृती वाढत जाते. यामुळे वेलीमधून साखर, पाणी आणि इतर घटकांचे वाहन यावर परिणाम होतो आणि याचा परिणाम मऊ, हिरवट , चिबचचिबीत , पाणीदार आणि परिणामी सुकलेले द्राक्षमणी घडामध्ये तयार होतात. शेवटी याचा परिणाम घडांचे ताजे वजन, रसाचे उत्पादन, विद्राव्य साखर आणि अॅन्थोसायनीनसारखे रंगीत घटक यावर अनिष्ट परिणाम होतो, तर द्राक्षमण्यांचे आम्लतेत वाढ होते. द्राक्षाचे उत्पादनावर आणि प्रतीवर आश प्रकारे अनिष्ट परिणाम झाल्यामुळे दर्जेदार उत्पादन घटते. परिणामी निर्यातक्षम द्राक्षे तयार करण्यात अडचणी येतात.

कारणे : ही विकृती संजीवके आणि अन्नद्रव्ये यांचा असमतोल विशेषत : पोटॅश कॅल्शियम + मॅग्नेशियम यांचे गुणोत्तर यांचेशी संबंध जोडतात.
उपाय :
१) अमोनिकल नत्राचा आणि पोटॅशचा पुरवठा करणे टाळावे. हे दोन्ही घटक कॅल्शियमच्या शोषणावर वाईट परिणाम करतात.
२) मणी ८ एम. एम. आकाराचे असतानांच कॅल्शियम क्लोराईड ५०० ग्रॅम / १०० लिटर पाण्यातून फवारावे. त्यानंतर यानंतर १० दिवसाच्या अंतराने २ फवारे द्यावेत.
३) १० एम. एम. बेरी साईज असतांना नंतर २ वेळा १० दिवसांच्या अंतराने मॅग्नेशियम सल्फेटचे फवारे द्यावेत. प्रमाण १० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रती लि.पाण्यातून द्यावे. 

शॉर्ट बेरीज :
द्राक्षाचा घड वाढत असताना काही मणी मोठे न होता लहान आकाराचे राहतात. त्यानं शार्ट बेरीज म्हणतात.
शार्ट बेरीज होण्याची संभाव्य कारणे :
१) परागीभवन चांगले न होणे, फुलांचे भाग विकृती असल्यास असे होते.
२) कर्बोदके (CHO) कमी पडल्यास फुले मण्यामध्ये विकसित होण्यास अडचण येते.
३) जी. ए. लवकरच्या स्टेजमध्ये वापरले तर शॉर्ट बेरीजचे प्रमाण वाढते.
४) फळधारणेच्या काळात थंडी किंवा धुके असणे.
५) बोरॉन व झिंक ह्या पोषक द्रव्यांची कमतरता.
६) वेलीला व्हायरसची लागण झाल्यावरही असे होते.
उपाय :
१) ही विकृती टाळण्यासाठी प्रमाणात जी. ए. सारखी संजीवके वापरावीत.
२) सुक्ष्मद्रव्ये योग्य प्रमाणात द्यावीत.
३) घोसाची संख्या पानांच्या प्रमाणात ठेवावी, म्हणजे कर्बोदके कमी पडणार नाहीत.

वॉटर बेरीज :
द्राक्षे पिकायला लागल्यानंतर द्राक्षाच्या घोसातील काही मणी रंगाला मंद दिसतात, नरम पोताचे असतात, त्यात गर नसतो, गोडी नसते, फक्त आंबट पाणी असते. हे मणी संपूर्ण धोसात इकडे तिकडे पसरतात. माल झाडावर जास्त दिवस ठेवल्यास हे मणी सुकतात व कधी कधी गळूनही जातात. एकूण वजनात त्यामुळे घट होते. झाडावरून द्राक्षे तोडल्यावर हे मणी लवकर सुकतात. त्यामुळे बाजारात पेटीतील माल खराब दिसतो. ह्या मण्यांना 'वॉटर बेरीज' म्हणतात. हे बनण्याची संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे
१) पालाशची कामतरता.
२) मणी पोसत असताना पाण्याचा ताण.
३) जास्त नत्र.
४) द्राक्ष घडांना कॅल्शियम पुरवठा कमी पडणे.
५) झाडावर प्रमाणापेक्ष जास्त द्राक्ष ठेवल्यास अन्नद्रव्ये कमी पडतात.
६ ) द्राक्षघोस घट्ट झाल्यास मण्यांच्या पेशी (झायलम) दबून जातात व पुढे अन्नपुरवठा होत नाही, त्यामुळेही वॉटरबेरीज वाढतात.
वर नमुद केलेल्या कारणांचा निट विचार केल्यास आपल्याला वॉटरबेरीज निश्चित कमी करता येतील. मात्र सर्व उपाय फलधारण होत असतानाच कराव्यात नंतर काहीही करता येणार नाही.

पिंक बेरीज :
साधारणत : द्राक्षात पाणी उतरायला लागल्यावर गुलाबी मणी दिसायला सुरुवात होते. असे मणी काहीसे आकाराने लहान असतात. द्राक्षे जशजशी पिकत जातात. तसतसा हा रंग अधिक गर्द होत जातो. ही द्राक्षे आधी आकर्षक दिसत असली तरी, बाजारात पोहचेपर्यंत गर्द लाल व काळसर रंगाची होतात. त्यांची चमक जाते.
पिंक बेरीज होण्याची कारणे: अॅन्थोसायनिन नावाच्या द्रव्यामुळे पिंक बेरीज होतात. हे बऱ्याच फळांत, फुलांत आणि पानांत सुद्धा आढळून येत असते. पेशीचे जे व्हेस्क्युलर सॅप असतात त्यात हे आढळते. जास्त पील असलेल्यामध्ये हा रोगण घातल्यास त्याचा रंग गर्द होतो. म्हणून काही फुलांचा रंग गर्द करण्यासाठी अमोनियम हायड्रोंक्साईडची वाफ देतात.

अॅन्थोसायनिनची रासायनिक प्रक्रिया होणाऱ्या कागदावरील आलेख केल्यावर असे आढळून आले की याचे चार प्रकार आहेत.
१) सायनाडीन,
२) माल्व्हीडीन,
३) पिनोनिडीन,
४) मनोग्लुकोईज,
ह्यातला पिनोनिडीन जास्त प्रमाणात असतो. बाकीचे अगदी अल्प प्रमाणात असतात. मुख्यत : नैसर्गिक चार घटकांची क्रिया अॅन्थोसायनिन तयार होण्यावर होते.
१) तापमानातील चढउतार
२) तीव्र सुर्यप्रकाश,
३) नत्राची कमतरता,
४) फॉस्फरसची कमतरता.
झाडाच्या पेशीमध्ये साखर जेव्हा जलद गतीने जास्त प्रमाणात तयार होते, तेव्हा ते अॅन्थोसायनिन तयार व्हायला उत्तेजन देतात. नत्राच्या पुरवठ्याने साखर नत्रजन्य पदार्थात रूपांतरित होते आणि साखरेची तीव्रता कमी होते. त्याचबरोबर अॅन्थोसायनिन कमी होते. मण्यात पाणी उतरतांना इथ्रेल वापरल्याने अॅन्थोसायनिन वाढतात. 
उपाय :
१) २५० ग्रॅम अॅस्कोर्बिक अॅसिड २०० लिटर पाण्यात घालून फवारावे. दुसऱ्या दिवशी ५०० ग्रॅम सोडियम डायथील डिथोकार्बोमेट प्रती २०० लिटर पाण्यात घालून फवारावे. अशा २- ३ फवारण्या ८ दिवसांच्या अंतराने कराव्यात, मात्र ह्या रसायनांचा एकरी खर्च जास्त असतो.
२) ५ ग्रॅम युरीया व २ ग्रॅम बोरीक अॅसिड प्रती १ लिटर पाण्यातून फवारल्यास शेंदरी मणी कमी होण्यास मदत होते.
३) एकरी १३ किलो बोरॅक्स एप्रिल छाटणीनंतर जमिनीतून दिल्यास ही विकृती लक्षणिकरित्या कमी होऊ शकते.

मणी हिरवे राहणे : (दाढेमणी)
या विकृतीमध्ये द्राक्ष पिकायला सुरुवात झाल्यानंतर घडाच्या शेंड्याकडील तसेच फांद्याकडील काही मणी पिकत नाही व ते मणी सुरकतले जाऊन गळून पडतात. जसा घड पिकत जाईल तसा या विकृतीचा प्रादुर्भाव वाढत जातो. अशा विकृती ने ग्रासलेले मणी गोडीला फार कमी असतात. तसेच त्यामध्ये गर नसतो. ही विकृती थॉम्पसन सिडलेस या जातीत मोठ्या प्रमाणात दिसून येते
कारणे : 
१) मण्यांच्या वाढीच्या काळात वेलींना पाण्याचा ताण पडला असल्यास.
२) बोरॉन सारख्या मुलद्रव्यांनी कमतरता पडल्यास.
३) रासायनिक खतांचा वाजवीपेक्षा जास्त वापर केल्यास.
४) ज्या बागेत पाण्याचा योग्य निचरा होत नाही व चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, तेथे ही विकृती मोठ्या प्रमाणात दिसून येते.
५) घडांना कॅल्शियमचा पुरवठा कमी झाल्यास.
६) वेलींवर प्रमाणापेक्षा जास्त घड ठेवल्याने सर्व घड योग्य पोसले न गेल्याने
७) घडाच्या पुढे पाने कमी ठेवली असल्यास.
उपाय :
१) खरड छाटणीनंतर प्रत्येक वेलीवर काड्यांची संख्या मर्यादित ठेवली पाहिजे.
२) ऑक्टोबर छाटणीनंतर वेलीवर घडांची संख्या मर्यादित ठेवावी.
३) घडाचा शेंडा खुडणे व विरळणी वेळेवर करावी.
४) जी. ए. चा वापर काळजीपूर्वक करावा व वाढीव प्रमाणात जी. ए. वापराचा मोह टाळावा.
५) बागेत पाण्याचा योग्य निचरा केला पाहिजे.
६) पालाश, बोरॉन, कॅल्शियम व मॅग्नेशियमसारख्या मुलद्रव्यांचा योग्य पुरवठा करावा.
७) घडांच्यापुढे पाने कमी राखल्यास घडांस अन्नाचा तुटवडा पडतो व घडांचे योग्य पोषण होत नाही.
८) पानातुन तसेच जमिनीतून सुक्ष्म मुलद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा

आवश्यकतेनुसार पुढील लिंकवर माहिती घ्या... 

2 comments:

  1. खुप खुप चांगली माहिती आहे .
    Thank you so much ☺️

    ReplyDelete