द्राक्ष वलांडा देठावरील गाठी व्यवस्थापन

देठावरील गाठी

द्राक्ष फुलोऱ्याच्या रचनेतील मुख्य भाग हा त्यातील देठ असतो. द्राक्ष घडाच्या एकूण भागांपैकी दोन ते पाच टक्के भाग हा देठाचा असतो. फळ छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या कमी करण्यासाठी ऑक्‍सिन व सायटोकायनिन यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, त्यामुळे बऱ्याच वेळा द्राक्षबागेत देठावरील गाठीची समस्या निर्माण होते.

मागील काही वर्षांच्या पाहणीमध्ये आढळून आलेल्या बाबी -
- मागील हंगामात आपल्या राज्यामध्ये बऱ्याच भागात द्राक्ष घडांच्या देठावर लहान, मोठ्या गाठी आढळून आल्या. वाळवा, गोळेगाव, बार्शी व इतर काही भागांत गाठीची समस्या सातत्याने दिसून येत आहे, त्यामुळे पुरेशा प्रमाणात अन्नपुरवठा न झाल्याने मण्यांची फुगवण होत नाही. कधी कधी मण्यांमध्ये गाठीमुळे आंबटपणा निर्माण होतो. देठावरील गाठीमुळे तसेच देठ सुकण्यामुळे द्राक्ष घडावर वॉटर बेरीज, ममीफिकेशन या विकृतींसारखी लक्षणे दिसून येतात.

- फळ छाटणी लवकर म्हणजे सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या बागांमध्ये देठावरील गाठीची समस्या अधिक होती. या उलट त्याच भागातील द्राक्षबागांची फळ छाटणी उशिरा म्हणजे ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात झाली, त्या बागांमध्ये गाठीचे प्रमाण कमी म्हणण्यापेक्षा शक्‍यतोवर आढळले नाही. यावरून असा निष्कर्ष काढता येऊ शकतो, की लवकर छाटणी झालेल्या बागा ऑक्‍टोबर हिटच्या सान्निध्यात येतात. त्याचा परिणाम देठावरील गाठी निर्माण होण्याच्या समस्येमध्ये होऊ शकतो. बऱ्याच बागा सध्या प्रीब्लूम अवस्थेमध्ये असून ऑक्‍टोबर हिटमुळे अशा बागांमध्ये गाठींची समस्या उद्‌भवू शकते.

- केवळ भारतातच नाही तर परदेशातदेखील देठावरील गाठींची समस्या वाढत आहे. ही समस्या सर्व प्रथम खाण्याच्या द्राक्ष बागांमध्ये प्रामुख्याने शरद सीडलेस व थॉमसन सीडलेस आणि त्यांचे क्‍लोन यामध्ये दिसून आली आहे. मात्र पुणे येथील द्राक्ष संशोधन केंद्राकडून झालेल्या सर्वेक्षणामध्ये ही समस्या बेदाण्याच्या द्राक्षांमध्येही दिसून आली आहे.

देठावर गाठी येण्याची कारणे -
- वनस्पती शरीर क्रियाशास्त्राच्या अभ्यासानुसार, देठावरील गाठी पेशीतील अमर्याद वाढीमुळे येऊ शकतात.
- सर्वसाधारणपणे द्राक्ष देठावरील गाठीची समस्या घड दिसायला सुरवात झाल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर वातावरणात घडणाऱ्या बदलानुसार दिसू लागते. देठावरील गाठी आतून पोकळ असून त्या पाकळ्यांचे देठ सुकण्यास कारणीभूत ठरतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनानुसार देठावरील गाठीसाठी वेगवेगळी कारणे नमूद करण्यात आली आहेत. उष्ण तापमान, प्रकाशाची तीव्रता, पाऊस व सूर्यप्रकाशाचा कालावधी इ. देठावर येणाऱ्या गाठीसाठी कारणीभूत ठरतात.
- सूक्ष्म अभ्यासानुसार देठाच्या गाठीमध्ये छोटे खड्डे असून, त्यात प्रामुख्याने कर्बोदके, प्रथिने किंवा लिपिडचे (Lipids) चे स्फटिक काही तज्ज्ञांना आढळून आले आहे .

प्राथमिक प्रयोगांमध्ये आढळलेले निष्कर्ष -
सध्यातरी या समस्येवर ठोस उपाय सांगता येत नसले तरी गाठ तयार होऊ नये यासाठी प्राथमिक प्रयोगामधील निष्कर्ष उपयुक्त ठरू शकतात.
- जर सप्टेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात ज्या बागांची फळ छाटणी होते. अशा बागा ऑक्‍टोबर हिटच्या कालावधीमध्ये प्रीब्लूम अवस्थेत असतात. याच वेळी देठाचीदेखील वाढ होत असते. अशा अवस्थेमध्ये घड जिरू नये म्हणून बागेत जर ऑक्‍सिन सायटोकायनिन किंवा ब्रासिनोस्टेराईडस या संजीवकांची वारंवार फवारणी केली तर ऑक्‍टोबर हिट व संजीवकांचा वापर यामुळे घडाची वाढ जोमाने होते; परंतु या संजीवकांचा परिणाम कमी झाल्यानंतर घडाच्या वाढीवर ताण पडतो. याचा परिणाम म्हणून घडाच्या देठावर गाठी आल्याचे दिसून येते म्हणूनच एकतर ही समस्या असणाऱ्या बागांची फळ छाटणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर घ्यावी किंवा घडाच्या वाढीसाठी वापरण्यात येणाऱ्या संजीवकांचा संतुलित वापर करावा, त्यामुळे गाठी येण्याची शक्‍यता कमी होईल.
- अवेळी झालेल्या अतिपावसामुळे देखील देठावरील गाठींची समस्या उद्‌भवू शकते. यासाठी द्राक्ष बागेच्या फळ छाटणीचे नियोजन महत्त्वाचे ठरते. मागील वर्षी ज्या बागांमध्ये गाठी आढळून आल्या त्या बागांमध्ये चालू वर्षी गाठी येण्याची शक्‍यता जास्त असते. अशा जागांची शक्‍यतोवर फळ छाटणी लवकर घेऊ नये. संजीवकांचा समंजसपणे वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याचे नियोजन करावे.
- बाग फुलोऱ्याच्या आधीच्या अवस्थेत असताना बागेमध्ये अधिक आर्द्रता राहु देवु नका.

आवश्यकतेनुसार पुढील लिंकवर माहिती घ्या... 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.