Search here..

द्राक्ष बागेत आच्छादन अन्‌ पाणी नियोजन

काही बागांमध्ये दाट कॅनॉपी व नत्राची जास्त प्रमाणात उपलब्धतेमुळे मणीगळ दिसून येत आहे. मण्यात पाणी उतरेपर्यंत वाढ जोमाने होते. याकरिता बागेत भरपूर पाणी व आवश्‍यकतेप्रमाणे स्फुरदची पूर्तता करावी. बागेत आच्छादन करावे.

मणीगळ होणे -
1) बऱ्याच ठिकाणी द्राक्ष बागेत जास्त प्रमाणात पाऊस झाला. त्याचाच परिणाम म्हणजे जमिनीत जास्त प्रमाणात पाणी साचले व वातावरणात आर्द्रता जास्त प्रमाणात तयार झाली.
2) फळछाटणीनंतर ज्या भागात पाऊस नव्हता किंवा कमी होता अशा बागेत या वेळी झालेल्या पावसामुळे मुळीच्या भोवतालच्या भागातून जे अन्नद्रव्य उपयोगात आले नाही अशा भागातील अन्नद्रव्य विशेष म्हणजे नत्र जास्त प्रमाणात मुळांद्वारे शोषले गेले. त्यामुळे वेलीचा वाढीचा जोम जास्त प्रमाणात दिसला. दाट कॅनॉपी व नत्राची जास्त प्रमाणात उपलब्धता या गोष्टी मणीगळ होण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.
3) बरेच बागायतदार मणीगळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीए व त्यासोबत इतर संजीवकांची फवारणी करतात. महत्त्वाचे म्हणजे बागेत प्रीब्लूमची अवस्था असेल तरच काही द्राक्षजातीमध्ये (थॉमसन, तास-ए-गणेश, क्‍लीन-2 इत्यादी) याचा परिणाम मिळेल, अन्यथा हीच जर फवारणी फुलोरा अवस्थेत केल्यास शॉटबेरीजची समस्या दिसेल. सोनाका, माणिक चमन, सुपर सोनाका इत्यादी द्राक्षजातींमध्ये जीएची फवारणी फुलोरा अवस्थेत केल्यास शॉटबेरीज होणार नाहीत. मण्याची लांबी वाढवण्याकरिता आपण या जातीमध्ये फुलोरा अवस्थेमध्येच फवारणी करतो.
4) तेव्हा ज्या जातीमध्ये शॉटबेरीजची अडचण येऊ शकते, अशा ठिकाणी पालाशची पूर्तता (फवारणी व ड्रिपद्वारे) करावी. तसेच शेंडा पिचिंग व पाण्यावर नियंत्रण करावे. 

मण्याचा विकास आणि पाण्याचे नियोजन -
1) बऱ्याच भागात फळछाटणीनंतर पाऊस झाला नाही. साठवणुकीची साधने नसल्यामुळे पाण्याचा साठासुद्धा काही ठिकाणी नसेल. अशा परिस्थितीमध्ये या वेळी मण्याचा विकास होत असताना पाण्याची जास्त प्रमाणात गरज असते.
2) हिरव्या रंगाच्या द्राक्षजातीमध्ये मणी सेटिंगनंतरच्या जीएच्या डीपनंतर थिनिंग करून पुन्हा रिव्हर्स डीप घेतला जातो. त्यानंतर खरे तर द्राक्षमणी लॅग फेजच्या बाहेर येतो. मण्यात पाणी उतरेपर्यंत वाढ जोमाने होते. याकरिता बागेत भरपूर पाणी व आवश्‍यकतेप्रमाणे स्फुरदची पूर्तता करणे गरजेची असते; परंतु बागेत जर पाणी कमी असल्यास खतांच्या वापरावरसुद्धा मर्यादा येते.
3) ज्या बागेत पाऊस कमी झाला अशा ठिकाणी या वेळी वारेसुद्धा जास्त प्रमाणात वाहताना दिसेल. त्याच बागेत या वेळी दिवसाचे तापमानसुद्धा जास्त प्रमाणात दिसून येईल. याचाच अर्थ या बागेत पानांतून बाष्पीभवनाद्वारे पाणी जास्त प्रमाणात निघून जाईल. वेलीची गरज पुन्हा वाढेल. ही परिस्थिती सोलापूर व विजापूर विभागात दिसू शकेल. 

पाणी बचतीसाठी उपाययोजना -
1) बागेत पाणी शक्‍यतो सकाळी किंवा सायंकाळी द्यावे.
2) ड्रीपलाइन वर बांधली असल्यास जमिनीच्या जवळ आणावी.
3) बोदावर काडीकचरा, गवत, उसाचे पाचट किंवा शेणखत इत्यादीचे आच्छादन करावे.
4) बागेत शिफारशीत बाष्परोधकांची फवारणी घ्यावी.
5) कॅनॉपी नियंत्रणात ठेवावी.
6) बागेत ज्या दिशेकडे वारे वाहते, त्या दिशेने सुरवातीस वाऱ्यास अडथळा आणावा. जर पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत असल्यास बागेत पश्‍चिमेकडील बाजूस जमिनीपासून एक फूट अंतरावरून वर मांडवपर्यंत शेडनेट बांधून घ्यावी. यामुळे वाहणारे वारे अडल्यास बागेतील पाण्याची गरज काही प्रमाणात पूर्ण करता येईल. 

मुरमाड जमिनीत द्राक्ष फळछाटणीनंतर करावयाचे पाणी व्यवस्थापन
मुरमाड जमिनीमध्ये पाणी आडवे न पसरता सरळ खोल जाते. जमीन लवकर कोरडी पडते. अशा वेळी ठिबक अथवा पाट पाणी पद्धतीने पाणी नियोजन करण्याविषयी अधिक माहिती घेऊ.
वासुदेव काठे
कोणत्याही फळपिकाच्या एकूण उत्पादनापैकी 60 टक्के उत्पादन हे पाणी व्यवस्थापनावर अवलंबून असते. उर्वरित 40 टक्के उत्पादनामध्ये रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर, संजीवकांचा वापर, कीड व रोगनियंत्रण, मशागत, पानांचे नियोजन इत्यादी मुद्यांवर अवलंबून असते. जमिनीमध्ये दिलेली रासायनिक खते उचलण्याकरिता तंतुमय मुळांची वाढ होणे गरजेचे असते. ही मुळे खते पाण्याच्या माध्यमातून उचलतात. 
- मात्र, पिकांना प्रमाणापेक्षा अधिक पाणी दिल्यास रासायनिक खते पिकाच्या मुळांच्या कक्षेच्या बाहेर जातात. तसेच अतिरिक्त पाण्यामुळे तंतुमय मुळ्या कुजून जातात. परिणामी पानांची संख्या कमी होते. फळांचे पोषण कमी होते. वजनात घट येते.
- पाणी गरजेपेक्षा कमी झाले तरी मुळांची संख्या कमी होते. रासायनिक खते उचलली जात नाहीत. पिकाची वाढ कमी होते.
- त्याचप्रमाणे दिलेले पाणी पिकाभोवती योग्य रितीने पसरण्याऐवजी फक्त खोलच जात राहिले तरी मुळांची संख्या मर्यादित वाढते. उत्पादनात घट येते.
- जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर योग्य दिवसांचे ठेवत वाफसा स्थिती ठेवावी.
अधिक उत्पादन मिळविण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य तितके पाणी देण्याची पद्धत राबवावी लागते. त्याविषयी समजून घेऊ.

मुरमाड जमिनीतील पाणी व्यवस्थापन -
मुरमाड जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अन्य कोणत्याही जमिनीपेक्षा कमी असते. या जमिनी लवकर कोरड्या पडतात. ताण पडल्यास पाणी घेणारी मुळी लवकर मरतात. वरील 2 ते 6 इंचात असलेली खते पिकांना घेता येत नाहीत.
- 6 इंचाखालील जमिनीतही मुरमाडपणा, खडकाळपणा असल्यास, पाणी धरले जात नाही. पिकाच्या मुळ्या खोलवर जात नाहीत.
- या जमिनीची पाणी धरण्याची क्षमता कायमस्वरूपी वाढवण्याकरिता काळ्या मातीचा कमाल एक फुटापर्यंतचे थर द्यावा. यामुळे या जमिनीची पाण्याची गरज निम्म्याने कमी होत असल्याचे माझ्या शेतात केलेल्या प्रयोगातून लक्षात आले आहे. (चित्र माती मल्चिंग क्र.1) असे केल्याने द्राक्षाचा दर्जा सुधारून घट्ट गराचे मनी व फुगवण जादा झाली, त्यामुळे एकरी वजनात 30 टक्के वाढ झाली.
- सर्वांना हे शक्‍य नाही किंवा लगेचच शक्‍य नाही; त्यांना सध्याच्या मुरमाड जमिनीच्या दोन प्रकारानुसार पाणी व्यवस्थापन करावे लागेल.

ठिबक पद्धतीने पाणी व्यवस्थापनाचेही दोन प्रकार पडतात.
1) एका प्रकारातील मुरमाड जमिनीत 3 ते 5 फुटांदरम्यान खोलीत बारीक फुटणारा मुरूम असतो. अशा जमिनीत ड्रीपरचे पाणी फारसे आडवे न पसरता जेथे पडते तेथून खोल खाली जाते. यामुळे मुळ्यांची संख्या ड्रीपरखाली ओलाव्याच्या एक फुटातच वाढते. परिणामी द्राक्ष व अन्य फळपिकांच्या वजनात 25 ते 40 टक्‍क्‍यापर्यंत घट येते. त्याच प्रमाणे दिलेली पाण्यासोबत मुळाच्या कक्षेखाली जाऊन निरुपयोगी ठरतात.
- अशा जमिनीत ठिबक सिंचन करतेवेळी ड्रीपरची संख्या दर 2.5 फुटाऐवजी 1.5 फुटावर ठेवावी. ओले होणारे क्षेत्र जास्त राहून, रासायनिक खते वरील 2 ते 6 इंचाचे थरातील तंतुमय मुळांना उपलब्ध होतील. यामुळे कमी खतात कमी पाण्यात उत्पादनात वाढ मिळेल. याकरिता दर 1.5 फुटांवर 4 किंवा 8 लिटरचा ड्रीपर असावा.
- पाणी आडवे रुंदीत पसरण्याकरिता वरंब्यात दीड ते 2 फूट रुंदीत व 6 इंच खोलीचा चर घेवून, त्यात शेणखत टाकावे. जमिनीची पाणी लावून धरण्याची क्षमता चांगली वाढते. दोन पाणी पाळीतील अंतर वाढते.

2) दुसऱ्या प्रकारातील मुरमाड जमिनीमध्ये 1 ते 2 फुटाखाली पक्का खडक असतो, त्यामुळे या जमिनीत पाणी खोल न जाता, आडवे रुंदीत पाणी लवकर पसरते. एक ते दीड तास पाणी दिल्यावर वरंबा 2 ते 3 फुटापर्यंत ओला होतो. या थरातील मुळांचे प्रमाण चांगले असले तरी खोल असणाऱ्या मुळांचे प्रमाण कमी असते. या जमिनीत पाणी खोल जाणाऱ्या मुरमाड जमिनीपेक्षा कमी पाणी द्यावे लागते.
- दोन्हीही प्रकारच्या जमिनीस वापरानुसार थंडीच्या कालावधीत 1 ते 2 दिवसाआड पाणी दिले पाहिजे.

मुरमाड जमिनीस पाट पाणी व्यवस्थापन -
पाट पाणी दिल्याने मुळांची संख्या वाढून, पानांचा हिरवेपणा व जाडी वाढते. प्रकाशसंश्‍लेषणाचा वेग वाढून अन्ननिर्मिती वाढते. पिकांच्या वजनात व दर्जात वाढ होते. पिकाची रोगप्रतिकारक्षमता वाढते.
हे सर्व फायदे मिळण्याकरिता दाभोळकर प्रयोग परिवाराचे गौळाने (ता. जि. नाशिक) येथील रामचंद्र दगुजी चुंभळे यांनी एक पद्धत तयार केली आहे.
- पाट पाणी देताना द्राक्षबागेचे 9 इंच ते 1 फूट उंचीचे वरंबे पूर्ण भिजणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता ओळीच्यामध्ये मातीचे आडबंद द्यावे लागतात. प्रत्येक पाण्याच्या वेळी आडबंद करणे जिकिरीचे ठरते. चुंभळे यांनी मातीऐवजी बारदानाचे आडबंद तयार केले आहेत. हे हलके असल्याने उचलणे सोपे ठरतात. हे आडबंद संपूर्ण बागेकरिता दोन पुरेसे होतात.
(चित्र क्र. 2 - आडबंद)
असे पाट पाणी मुरमाड जमिनीस खालील टप्प्यात दिल्यास फायदेशीर ठरते.
1) वांझ फुटी काढल्यावर
2) मनी 4-5 मि.मी. आकाराचे झाल्यावर.
3) मनी 8-10 मि.मी. झाल्यावर.
4) मण्यात पाणी उतरताना.
5) नंतर 15 दिवसांनी.

आडबंद तयार करण्याची पद्धत -
एका 9-10 फुटाच्या बांबूला साखर बारदानाचे 4 पोती सुतळीने शिवून बांधावीत. या पोत्यांना चार ठिकाणी दोन-दोन फुटांचे बांबूचे तुकडे बांधावेत, त्यामुळे आडबंदांचे पोते पाण्याने गोळा न होता पसरून राहतात. हे आडबंद धरण्याकरिता हातात एकत्र धरता येतील असे चार-चार फुटांचे बांबूचे दोन तुकडे बांधून घ्यावेत. वरंबे ओले झाल्यावर या बांबूने ओढून आडबंद पुढे घेता येतो.
- या आडबंदामुळे वरंबे एक-दीड फुटापर्यंत उंच असले तरी पूर्ण भिजतात. वरंबे पूर्ण भिजल्यामुळे पाऊस पडल्यासारखा परिणाम मिळून बागेचा जोमदारपणा वाढतो.

आवश्यकतेनुसार पुढील लिंकवर माहिती घ्या... 

No comments:

Post a Comment