Search here..

Showing posts with label ವಪದಜೋತೋ. Show all posts
Showing posts with label ವಪದಜೋತೋ. Show all posts

Friday, January 22, 2016

भोपळा लागवड करण्यापूर्वी एकदा वाचलेच पाहिजे..

हवामान
हे उबदार हवामानातील फळभाजीचे पीक आहे. थंडीचा कडाका या पिकाला अपायकारक असतो. भरपूर आर्द्रता व सौम्य तापमान असलेल्या प्रदेशात हे पीक चांगले येते. मक्यासारख्या पिकात थोड्याफार सावलीतही ते वाढते. उन्हाळ्यातील कोरड्या हवामानापेक्षा पावसाळ्यातील आर्द्र हवामान या पिकाला जास्त मानवते. बी लावल्यापासून ११० ते १२० दिवसांत फळे तयार होतात.

जमीन : या पिकाला कोणतीही चांगल्या निचऱ्याची जमीन चालते. वेलाची मुळे जमिनीच्या वरच्या भागात वाढणारी व पसरणारी असतात. धुळे जिल्ह्यात नदीकाठच्या जमिनीत भोपळ्याची लागवड करतात.

प्रकार : काळा भोपळा भारतात सर्वत्र लागवडीत आहे. यात आकार, आकारमान आणि मगजाचा रंग या बाबतींत भिन्नता असलेले अनेक प्रकार आढळून येतात. मोठा लाल, मोठा हिरवा, मोठा गोल, पिवळा मगज व लाल मगज हे लागवडीतील सामान्य प्रकार आहेत. अर्का चंदन, आय. एच. आर ८३-१-१-१ आणि सी. ओ. १ हे सुधारित प्रकार उपलब्ध आहेत. अर्का चंदन या हळव्या प्रकाराची फळे मध्यम आकारमानाची (२.५ ते ३.५ किग्रॅ. वजनाची) व गोल आकाराची असून वरच्या व खालच्या टोकाला काहीशी चपटी असतात. मगज घट्ट असून फळाच्या सालीचा रंग फिकट हिरवा असतो. बी लावल्यापासून १२५ दिवसांत फळे तयार होतात. दर वेलाला ४-५ फळे धरतात. वाहतुकीत फळे चांगली टिकतात. फळांत कॅरोटिनाचे प्रमाण पुष्कळ असते. आय. एच. आर ८३-१-१-१ प्रकाराची फळे मध्यम आकारमानाची (२ ते ३ किग्रॅ. वजनाची) व गोल असून वरच्या व खालच्या बाजूला जास्त चपटी असतात. सालीचा रंग फिकट तपकिरी ते पिवळा असून खोवणी उथळ असतात. सी. ओ. १ ची फळे गोलाकार व ७ ते ८ किग्रॅ. वजनाची असून बी लावल्यापासून १७५ दिवसांत फळे तयार होतात.

लागवड
उन्हाळी पिकासाठी बी लावणी जानेवारी ते मार्च व पावसाळी पिकासाठी जून-जुलै महिन्यांत करतात. नांगरून चांगल्या भुसभुशीत केलेल्या जमिनीत ८० सेंमी. व्यासाची गोल आळी खणून व त्यात भरपूर शेणखत घालून प्रत्येक आळ्यात ३-४ बिया २.५ ते ५ सेमी. खोलीवर लावतात. उहाळी पिकासाठी दोन ओळींत १.५ मी. व दोन वेलांत ७६ सेंमी. व पावसाळी पिकासाठी अनुक्रमे १.५ मी. व. ०.९ ते १.२ मी. अंतर ठेवतात.

पाणी
पावसाळी पिकास पाणी देण्याची गरज नसते. उन्हाळी पिकास गरजेप्रमाणे ४-५ अथवा ८-१० दिवसांनी पाणी देतात

वरखत
हेक्टरी ८० किग्रॅ, नायट्रोजन (दोन हप्त्यांत), ५० किग्रॅ. फॉस्फरस व तितकेच पोटॅश देतात. नायट्रोजनाचा निम्मा भाग, सर्व फॉस्फरस व पोटॅश जमिनीच्या मशागतीच्या वेळी व राहिलेला नायट्रोजन पीक फुलावर येण्याच्या सुमारास देतात.

रोग व किडी
या पिकावरील भुरी, तंतुभुरी, मर व व्हायरसजन्य रोग महत्त्वाचे आहेत. भुरीसाठी गंधकाचा व तंतुभुरीसाठी ताम्रयुक्त कवकनाशकांचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणाऱ्या द्रव्याचा) वापर करतात. मर रोग आणि व्हायरसजन्य रोगांसाठी रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हाच खात्रीलायक उपाय आहे. या पिकावर भुंगेरे व फळमाशी या विशेष उपद्रवी कडी आहेत. भुंगेऱ्यांसाठी १% लिंडेनाची भुकटी पिस्कारतात. फळमाशीमुळे किडलेली फळे काढून जाळतात अगर जमिनीत पुरतात. वेलांवर मॅलॅथिऑन फवारतात.

फळांची काढणी व उत्पादन
बी लावल्यापासून ३ ते ४ महिन्यांनी भोपळे तयार होण्यास सुरुवात होते व त्यानंतर दोन महिन्यांपर्यंत फळे मिळत राहतात. फळे तोडताना देठाचा काही भाग ठेवून तोडतात. वेलावरच पिकलेली फळे पुष्कळ दिवस टिकतात. फळे काढल्यावर ती काही दिवस साठवून मग विक्रीला पाठवितात. हे फळ ४-६ महिन्यांपर्यंत टिकते.
पावसाळी पिकाचे हेक्टरी उत्पादन १३,७०० ते १८,८०० किग्रॅ. व उन्हाळी पिकाचे ६,५०० ते ७,५०० किग्रॅ. असते.


संदर्भ : 1. Chauhan, D. V. S. Vegetable Production in India, Agra, 1972.
2. Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1967.
3. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, Delhi, 1950.
क्षीरसागर, ब. ग.; परांडेकर, शं. आ.; गोखले, वा. पु.
स्त्रोत: मराठी विश्वकोश, दौलतगिरी गोसावी