हवामान
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjKoa8qP4FBHAD9N5V8CdNGq0xBi9LRP2Ke7ZViEpTmiFZ3A5POe0OikzENfB7aYJwg44ED61u8Wmvev74zHDQsnoJ-hCc8Qa3Ih_eNdN9doLVESv6CSR0uCoYweS4jdztaj1zfcasswOo/s320-rw/Bottle-gourd.jpg)
जमीन : या पिकाला कोणतीही चांगल्या निचऱ्याची जमीन चालते. वेलाची मुळे जमिनीच्या वरच्या भागात वाढणारी व पसरणारी असतात. धुळे जिल्ह्यात नदीकाठच्या जमिनीत भोपळ्याची लागवड करतात.
प्रकार : काळा भोपळा भारतात सर्वत्र लागवडीत आहे. यात आकार, आकारमान आणि मगजाचा रंग या बाबतींत भिन्नता असलेले अनेक प्रकार आढळून येतात. मोठा लाल, मोठा हिरवा, मोठा गोल, पिवळा मगज व लाल मगज हे लागवडीतील सामान्य प्रकार आहेत. अर्का चंदन, आय. एच. आर ८३-१-१-१ आणि सी. ओ. १ हे सुधारित प्रकार उपलब्ध आहेत. अर्का चंदन या हळव्या प्रकाराची फळे मध्यम आकारमानाची (२.५ ते ३.५ किग्रॅ. वजनाची) व गोल आकाराची असून वरच्या व खालच्या टोकाला काहीशी चपटी असतात. मगज घट्ट असून फळाच्या सालीचा रंग फिकट हिरवा असतो. बी लावल्यापासून १२५ दिवसांत फळे तयार होतात. दर वेलाला ४-५ फळे धरतात. वाहतुकीत फळे चांगली टिकतात. फळांत कॅरोटिनाचे प्रमाण पुष्कळ असते. आय. एच. आर ८३-१-१-१ प्रकाराची फळे मध्यम आकारमानाची (२ ते ३ किग्रॅ. वजनाची) व गोल असून वरच्या व खालच्या बाजूला जास्त चपटी असतात. सालीचा रंग फिकट तपकिरी ते पिवळा असून खोवणी उथळ असतात. सी. ओ. १ ची फळे गोलाकार व ७ ते ८ किग्रॅ. वजनाची असून बी लावल्यापासून १७५ दिवसांत फळे तयार होतात.
लागवड
उन्हाळी पिकासाठी बी लावणी जानेवारी ते मार्च व पावसाळी पिकासाठी जून-जुलै महिन्यांत करतात. नांगरून चांगल्या भुसभुशीत केलेल्या जमिनीत ८० सेंमी. व्यासाची गोल आळी खणून व त्यात भरपूर शेणखत घालून प्रत्येक आळ्यात ३-४ बिया २.५ ते ५ सेमी. खोलीवर लावतात. उहाळी पिकासाठी दोन ओळींत १.५ मी. व दोन वेलांत ७६ सेंमी. व पावसाळी पिकासाठी अनुक्रमे १.५ मी. व. ०.९ ते १.२ मी. अंतर ठेवतात.
पाणी
पावसाळी पिकास पाणी देण्याची गरज नसते. उन्हाळी पिकास गरजेप्रमाणे ४-५ अथवा ८-१० दिवसांनी पाणी देतात
वरखत
हेक्टरी ८० किग्रॅ, नायट्रोजन (दोन हप्त्यांत), ५० किग्रॅ. फॉस्फरस व तितकेच पोटॅश देतात. नायट्रोजनाचा निम्मा भाग, सर्व फॉस्फरस व पोटॅश जमिनीच्या मशागतीच्या वेळी व राहिलेला नायट्रोजन पीक फुलावर येण्याच्या सुमारास देतात.
रोग व किडी
या पिकावरील भुरी, तंतुभुरी, मर व व्हायरसजन्य रोग महत्त्वाचे आहेत. भुरीसाठी गंधकाचा व तंतुभुरीसाठी ताम्रयुक्त कवकनाशकांचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणाऱ्या द्रव्याचा) वापर करतात. मर रोग आणि व्हायरसजन्य रोगांसाठी रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हाच खात्रीलायक उपाय आहे. या पिकावर भुंगेरे व फळमाशी या विशेष उपद्रवी कडी आहेत. भुंगेऱ्यांसाठी १% लिंडेनाची भुकटी पिस्कारतात. फळमाशीमुळे किडलेली फळे काढून जाळतात अगर जमिनीत पुरतात. वेलांवर मॅलॅथिऑन फवारतात.
फळांची काढणी व उत्पादन
बी लावल्यापासून ३ ते ४ महिन्यांनी भोपळे तयार होण्यास सुरुवात होते व त्यानंतर दोन महिन्यांपर्यंत फळे मिळत राहतात. फळे तोडताना देठाचा काही भाग ठेवून तोडतात. वेलावरच पिकलेली फळे पुष्कळ दिवस टिकतात. फळे काढल्यावर ती काही दिवस साठवून मग विक्रीला पाठवितात. हे फळ ४-६ महिन्यांपर्यंत टिकते.
पावसाळी पिकाचे हेक्टरी उत्पादन १३,७०० ते १८,८०० किग्रॅ. व उन्हाळी पिकाचे ६,५०० ते ७,५०० किग्रॅ. असते.
संदर्भ : 1. Chauhan, D. V. S. Vegetable Production in India, Agra, 1972.
2. Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1967.
3. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, Delhi, 1950.
क्षीरसागर, ब. ग.; परांडेकर, शं. आ.; गोखले, वा. पु.
स्त्रोत: मराठी विश्वकोश, दौलतगिरी गोसावी