Search here..

Sunday, January 3, 2016

पिकांची काळजी (160103)

माझीशेती: पिकांची काळजी (160103)
-इरफ़ान शेख, बीड

* उभ्या बटाटा
पिकामध्ये करपा व बटाटा पोखरणा-या अळीचा प्रादुर्भाव ब-याच शेतांमध्ये जाणवत आहे. जेथे ठिबक सिंचनावर बटाटा पिकाची लागवड केलेली आहे अशा ठिकाणी एकरी १ लिटर क्लोरोपायरीफॉस ड्रिपमधून सोडावे. जेथे ठिबक सिंचनाची सोय नाही अशा ठिकाणी फोरेट १० जी एकरी ५ कि. सरीत टाकून पाणी द्यावे. करपा व मर रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझॉल ५ मिली + ८०% पाण्यात मिसळणारे गंधक २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

* पपई, भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी
या पिकावर रस शोषण करणा-या कीडींच्या प्रादुर्भावामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेषतः पपईमध्ये रिंगस्पॉट व्हायरस व फायटोक्थोरा या रोगांचा तर भेंडीमध्ये यलोव्हेन मोझॅक, टोमॅटो, मिरचीमध्ये कोकडा तर वांगी पिकामध्ये गोसावी व पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. नियंत्रणासाठी फवारणी ही स्ट्रेप्टोसायक्लीन २ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम किंवा कॅपटॉफ २५ ग्रॅम + हेक्झाकोनॅझॉल ५ मिली किंवा ८०% गंधक २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळू फवारणी करावी.

*मोसंबी
पिकास आंबेबहार कालावधीत लाल कोळी, फुलकीडी, कॅन्कर, करपा व फायटोक्थोरा या कीड रोगांचा प्रादुर्भाव सूरू होतो. यांचे नियंत्रणासाठी सुध्दा वर दिल्याप्रमाणे फवारणी करावी. यामुळे बागेतील मधमाशीचे प्रमाण कमी होणार नाही व फळधारणा चांगली होण्यास मदत मिळेल.

* वेलवर्गीय पिकांच्या
लागवडीसाठी पूर्वतयारी झाली असल्यास आता लागवड करावयास हरकत नाही. प्रयत्न मल्चिंग पेपर व बेड करूनच लागवड करण्याचा करावा. लागवडीपूर्वी आवश्यक रासायनिक खतांच्या व सेंद्रिय खतांच्या मात्रा बेडमध्ये भरून घ्याव्यात व नंतरच लागवड करावी.

* कांदा
(रब्बी हंगामात) लागवड केलेल्या पिकास २० किलो नत्र खताचा दुसरा हप्ता प्रति एकरी द्यावा. 

* टोमॅटो
पिकासाठी ताटी पद्धत उभारणी करावी. तसेच मातीची भर पिकास लावावी. 

* कोबी-फुलकोबी
पिकास मातीची भर लावावी तसेच लवकर लागवड केलेल्या गड्ड्याची पूर्ण वाढ झाली असल्यास फुलकोबीचा गड्डा पिवळा पडण्यापूर्वी वेळेवर काढणी करावी. 

* ब्रोकोली
पिकाची लागवड केलेल्या गड्ड्याची काढणी वेळेवर करावी उशिरा काढणी केल्यास गड्ड्याची चव कडसर होते. 
महाराष्ट्रामध्ये सध्या विषम वातावरणामुळे अनेक प्रकारचे बुरशीजन्य, जीवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांचे व तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. 

* कांदा व लसूण
पिकांवरील फुलकिडे व करपा नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन ८ मिलि किंवा फिप्रोनील १५ मिलि या कीडनाशकासोबत मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा क्‍लोरोथॅलोनील २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १० मिलि अधिक स्टिकर १० मिलि प्रति १० लिटर पाण्यातून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी. 

* कोबी व फुलकोबी
पिकांवर जर चौकोनी ठिपक्‍यांचा पतंगाचा (डीबीएम)च्या दोन अळ्या प्रति रोप दिसू लागल्यास बॅसिलस थुरीजिएन्सीस (बीटी) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० मिलि स्टिकर मिसळून संध्याकाळी फवारणी करावी. दुसरी फवारणी निंबोळी अर्क ४ टक्के करावी. तिसरी फवारणी गरज भासल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने इंडोक्‍झाकार्ब १० मिलि किंवा स्पिनोसॅड (२.५ एससी) १० मिलि प्रति १० लिटर पाण्यातून १० मिलि स्टीकर मिसळून फवारणी करावी. 

* वाटाणा
पिकावर मावा या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून आल्यास त्यासाठी डायमेथोएट १० मिलि किंवा इमिडाक्‍लोप्रिड ४ मिलि प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डेल्टामेथ्रीन ७ मिलि प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारावे. त्यानंतर ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

* भुरी
रोगाची लक्षणे दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रॅम किंवा डिनोकॅप १० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

* माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान *
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
whats app - 9975740444
-----------------------------------
जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आपल्यासोबत चळवळीत सामावून घ्या.