Search here..

Saturday, January 9, 2016

GREET - नाविन्यपूर्ण शेतीचे उत्तम उदाहरण श्री. जगन्नाथ तायडे. अडीच एकर क्षेत्रात १८ लाखांचं उत्पन्न...

माझीशेती : GREET (16010901)
नाविन्यपूर्ण शेतीचे उत्तम उदाहरण श्री. जगन्नाथ तायडे. अडीच एकर क्षेत्रात १८ लाखांचं उत्पन्न...
श्री. मनोज लोखंडे, हिंगोली (कृषी विभाग)

औरंगाबाद – शेतीवर भविष्यात येणाऱ्या संकटांचा विचार करून मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास त्यावर मात करता येते हे जगन्नाथ तायडे या प्रगतशील शेतकऱ्यानं आपल्या कृतीनं दाखवून दिलंय. त्यांनी केवळ अडीच एकर क्षेत्रात १८ लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळवलं, तेही सहा महिन्यांत.

महत्त्वाचं म्हणजे, तायडे यांनी हे उत्पन्न मिळवलंय ते आडरानातील पडीक जमिनीतून. यासाठी अवलंबलेली करार शेती पद्धत आणि शेडनेटचा योग्य वापर करून केलेली शेती तायडेंना फायदेशीर ठरलीय.

औरंगाबादपासून केवळ २८ किलोमीटर अंतरावर असलेल्या लाडसांगवी गावात तायडे यांची शेती आहे. त्यांनी सुरुवातीला डाळिंब, मोसंबी आणि कापूस या पिकांची लागवड केली. मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना त्यात फारसं यश आलं नाही. सुरुवातीला पैसा अपुरा होता. शेतीला लागणाऱ्या कोणत्याच गोष्टी त्यांच्याजवळ नव्हत्या. पण त्यामुळे खचून न जाता तायडे यांनी आपले शेतीविषयक वेगवेगळे प्रयोग करणं सुरूच ठेवलं. त्याच वेळी त्यांना 'करार शेती'विषयी माहिती मिळाली. यासाठी त्यांनी आपली शेती तीन महिन्याला अडीच हजार रुपये कराराने खाजगी कंपन्यांना भाड्यानं दिली. वैयक्तिक शेतीत न मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न त्यांना पुरेसं होतं. 

प्रयोगशील शेतकरी

सुरुवातीला त्यांनी कंपनीसाठी कापसाच्या बीजोत्पादनाचे प्रयोग सुरू केले. यामुळं त्यांना शेडनेटमध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं शेती केल्याचे फायदे लक्षात आले. कमी जागेत, कमी खर्चात खात्रीशीर उत्पन्नाचे स्रोत तायडेंना मिळाले. यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. गेली १० वर्षं ते या क्षेत्रात काम करताहेत. पाण्याच्या सततच्या कमतरतेमुळं पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यांनी शेतात शेततळं घेतलं. यातील पाण्याचं तुषार आणि ठिबक सिंचनाद्वारे योग्य नियोजन करून कापसासहित शेडनेटमधील सर्व पिकांच्या पाण्याची तहान भागवली. विशेष म्हणजे कमी खर्चात म्हणजेच जेमतेम ७५ हजारात शेडनेड तयार केलंय. कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या शेडनेटच्या तंत्रज्ञानाला अडीच लाख रुपये इतका खर्च येतो. 

करार शेती आणि शेडनेटचा वापर

तायडे यांनी एका १० गुंठ्याच्या शेडनेटमध्ये घेतलेल्या मिरचीचं उत्पन्न हे जवळपास सव्वा क्विंटल असून आजच्या बाजारभावाप्रमाणं साडेतीन लाख रुपये मिळतात. तर टोमॅटोच्या एका दहा गुंठ्याच्या शेडनेटमध्ये तायडे यांना ३० ते ३५ किलो उत्पन्न मिळतं. याची किंमत ८००० रु. प्रती किलो आहे. ३५ किलोप्रमाणे तायडेंना सरासरी एका टोमॅटोच्या शेडनेटमागं अडीच लाख रुपये मिळतात. तायडेंना मिरचीचे तीन शेड आणि टोमॅटोचे तीन शेड यापासून मिळणारं एकूण उत्पन्न लक्षात घेता जवळपास खर्चवजा जाता निव्वळ नफा (टोमॅटोचे साडेसात लाख आणि मिरचीचे साडेदहा लाख) १८ लाख रुपये होतो आणि तोही केवळ सहा महिन्यांत. 

या अनोख्या शेती पद्धतीबाबत 'भारत4इंडिया'शी बोलताना ते म्हणाले, “या शेडनेटमध्ये पीक घेण्यास जुलैत सुरुवात होते. पिकाचा कालावधी हा जुलै ते डिंसेबर असा सहा महिन्यांचा असतो. डिसेंबरमधील पीक काढणीनंतर जमिनीला सहा महिने विश्रांती देण्यात येते. या विश्रांतीदरम्यान जमिनीची उत्पादकता, तिचा पोत कसा वाढेल याकडं कटाक्षानं लक्ष दिलं जातं. यासाठी धेंचा, सेंद्रीय खत, शेणखत, गांडूळखत टाकून हिरवळीची जमीन तयार केली जाते. पिकांनुसार गादी आणि वाफे तयार करावे लागतात. मग जुलैत पुन्हा पीक घेतलं जातं. यावेळी पिकांच्या वाढीदरम्यान योग्य कीटकनाशकांची फवारणी करणं, पाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणं; तसंच एका शेडनेटमधून दुसऱ्या शेडनेटमध्ये जाताना काळजी घेणं आवश्यक आहे. यामुळं एका शेडमधील कीटाणू दुसऱ्या शेडमध्ये जात नाहीत किंवा रोगांचा, कीटाणूंचा फैलाव होत नाही. शेडनेटमध्ये परागीकरण योग्य पद्धतीनं करणं आवश्यक आहे. यामुळं येणारं बीज हे सक्षम आणि दर्जेदार ठरतं. हेच बीज पुढे अनेक देशांमध्ये 'सीड्स' म्हणून विकलं जातं.” तायडे यांच्या शेतातील बीज उत्पन्न आफ्रिकेसह युरोपातल्या अनेक देशांत निर्यात केलं जातं.

सरकारचे अनेक पुरस्कार 

तायडे यांच्या प्रयोगशील शेती पद्धतीला सरकारचे अनेक पुरस्कार मिळालेत. यांच्या यशाचं सूत्र जाणून घेण्यासाठी शेतकरी, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ त्यांच्या शेतीला आवर्जून भेट देतात. विशेष म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांनाही माहिती व्हावी म्हणून तायडे यांनी गावातच शेतकरी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत ते शासनाच्या विविध योजना, खतवाटप इत्यादींबाबत मार्गदर्शन करतात. 

(माझीशेतीकडून शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनासाठी हा मेसेज प्रसारित केला आहे.)

* माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान *
**********************
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
what's app 9975740444
**********************
तुमच्या मित्रांना नाविन्यपूर्ण शेती चळवळीत जोडा, त्यांना त्यांची खालील माहिती 9975740444 वर whats app मेसेज करायला सांगा.
नाव -
पत्ता -
जिल्हा -
गट नं-
मोबाईल नं.-