आंबा फळझाडास उत्तम निचऱ्याची जमीन योग्य असते. भारी चिकण मातीच्या, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनी आंब्यासाठी योग्य नसतात.
लागण -
हे फळपीक मुख्यतः दमट तसेच कोरड्या हवामानात चांगले येते. हापूस, रत्ना, सिंधू आणि कोकण रुची या दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती लागवडीस योग्य आहेत.
आंब्याचे झाड हे बहुवर्षीय आहे, त्यामुळे एकदा लागवड केल्यानंतर जमिनीतील दोष काढता येणे अवघड होते. तेव्हा लागवडीपूर्वीच योग्य जमिनीची निवड करावी. निवडलेल्या जमिनीत पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल-मे महिन्यांत 10 - 10 मीटर अंतरावर 1 - 1 - 1 मीटर आकाराचे खड्डे खणून ते चांगली माती आणि तीन ते चार घमेली कंपोस्ट किंवा शेणखत आणि तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरावे.
कलम पद्धत -
कलमे करण्यासाठी मे ते जुलै हा कालावधी योग्य असतो. 15 ते 20 दिवसांचे रोप मुळासकट (कोयीसह) काढून घ्यावे. रोपाचा खालचा सात ते नऊ सें.मी.चा भाग ठेवून शेंडा छाटावा. कापलेल्या टोकामधून सुमारे चार ते सहा सें.मी. लांबीचा बरोबर मध्ये काप घ्यावा. कलमे करायची जातीची तीन ते चार महिने वयाची, जून, निरोगी आणि डोळे फुगीर, परंतु न फुटलेली 10 ते 15 सें.मी. लांबीची काडी कापून घ्यावी. त्या काडीवरील सर्व पाने कापून टाकावीत. काडीच्या खालच्या बाजूस चार ते सहा सें.मी. लांबीचे दोन तिरकस काप विरुद्ध बाजूला देऊन पाचरीसारखा आकार द्यावा. त्यानंतर ही काडी मुळ रोपांवर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवावी. हा जोड दोन सें.मी. रुंद व 20 सें.मी. लांबीच्या पॉलिथिनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा. नंतर ही कलमे 14 x 20 सें.मी. आकाराच्या पॉलिथिनच्या पिशवीत लावावीत. लावताना कलमांचा जोड मातीच्या वर राहील याची काळजी घ्यावी. कलम बांधल्यापासून 15 ते 20 दिवसांत काडीला नवीन फूट येते. पावसाळा सुरू झाला की लागवड करावी. कलमाची पिशवी अलगद कापून काढावी. पिशवीतील कलम मातीच्या हुंडीसह भरलेल्या खड्ड्याच्या मध्यभागी ठेवून लावावे. लागवड करतेवेळी कलमाचा जोड जमिनीच्या थोडा वर राहील असे पाहावे. कलमासाठी बांधलेली प्लॅस्टिक पिशवी किंवा सुतळी काढून टाकावी. लागवडीनंतर कलमांना मातीचा आधार द्यावा.
मोहोर संरक्षण
आंबा पिकास पाण्याचा ताण महत्त्वाचा आहे. पावसाळ्यानंतर आंब्याच्या झाडाला सतत पाणी मिळत गेले, तर अशा आंब्याच्या झाडाला मोहोर उशिरा येण्याची दाट शक्यता असते. प्रमुख व दुय्यम पोषण प्राण्यांची कामतरता, संजीवकांचा अभाव, योग्य पाणी व्यवस्थापन नसणे आणि किडी – रोगांचा प्रादुर्भाव आदि कारणांमुळे मोहोर आणि फलगळ होते.
तुडतुडे
हे कीटक पाचरीच्या आकाराचे असतात. रंग भुरकट असून, डोक्यावर तांबड्या रंगाचे तीन ठिपके असतात. हे कीटक अत्यंत चपळ असून, त्यांची चाल तिरपी असते. मादी हिवाळ्यात फुले व पाने यांच्या शिरांत अंडी घालावयास सुरवात करते. या अंड्यांतून आठ ते दहा दिवसांत पिल्ले बाहेर पडून रस शोषण करावयास लागतात. त्यांची संपूर्ण वाढ 15 ते 20 दिवसांत होते आणि त्यापासून प्रौढ तुडतुडे तयार होतात. या किडींची पिल्ले आणि प्रौढ कोवळ्या पानांतील व मोहोरातील रस शोषून घेतात, त्यामुळे मोहोर सुकून गळून पडतो. त्याशिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात. तो पानांवर पडून नंतर त्यावर काळी बुरशी वाढते, त्यामुळे झाडे, फळे काळी पडतात.
तुडतुडे वर्षभर झाडावर असल्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहोर येण्यापूर्वी कीडनाशकांचा वापर करावा, तसेच व्हर्टिसीलियम लेकॅनी या बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर करावा.
मिजमाशी
मोहोर तसेच पालवी फुटताच कोवळ्या दांडयामध्ये अंडी घालते, दोन ते तीन दिवसांत अंडी उबून आळी मोहोरच्या देठातील आतील भाग खाते, त्या ठिकाणी सुरवातीस लहान गाठ आल्याप्रमाणे दिसते. प्रादुर्भित मोहोर वाकडा झालेला दिसून येतो. कोवळ्या पालवीवर प्रादुर्भाव झाल्यास पाने काळी पडून गळून जातात.
भुरी
या रोगामुळे मोहोरचा देठ, फुले आणि लहान फळे यावर सूक्ष्म बुरशीची वाढ होते, त्यामुळे प्रादुर्भित भाग पांढरट, भुरकट दिसतो. रोगाचा प्रसार वाऱ्यामुळे होतो. फुले व लहान फळे गळून पडतात आणि फलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विध्यापीठाने किडनाशक फवारणीचे वेळापत्रक तयार केले आहे. त्याची मदत घेऊन किडी – रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
करपा
या रोगाच्या प्रादुर्भावाची विविध लक्षणे म्हणजे डहाळ्या वाळणे, फांद्यांचे शेंडे झडणे, मोहोर करपणे, पाने करपणे ही आहेत. पानांवर 20 ते 25 मि.मी. व्यासाचे अंडाकृती किंवा अनियमित वेडेवाकडे फिकट विटकरी किंवा गडद विटकरी ठिपके पडतात. आर्द्र वातावरणात बुरशीची वाढ जलद होते. रोगाचा प्रादुर्भाव जुन्या पानांपेक्षा नवीन पानांवर जास्त होतो. पानांची रोगग्रस्त देठे काळी पडतात, पाने खाली वाकतात, वाळतात, शेवटी गळून पडतात. पानगळ झालेल्या ठिकाणी काळे व्रण निर्माण होतात. रोगग्रस्त फांद्यांवर काळे ठिपके पडतात, फांद्यांचे शेंडे वरून वाळण्यास सुरवात होते. शेंडे झडल्याचे लक्षण दिसून येते. मोहरामध्ये फुलांच्या देठांवर काळसर विटकरी काळे डाग पडतात. उमललेल्या फुलांवरही छोटे काळे डाग पडतात. हे डाग मोठे होतात. नंतर मोहोर वाळतो. फळांवर सुरवातीस हे डाग गोल असतात; परंतु नंतर डागांचे एकत्रीकरण होते, मोठे अनियमित डाग तयार होतात. काही वेळा डागांमुळे संपूर्ण फळ पडते. डागांवर खोल चिरा निर्माण होतात. बुरशी फळात खोल शिरते व फळे नासतात.