लागवडीचा हंगाम
आडसाली १५ जुलै ते १५ ऑगस्ट
पूर्वहंगामी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर
सुरु हंगामी १५ डिसेम्बर ते १५ फेब्रुवारी
* जमीन:
ऊस लागवडीसाठी १ मीटर खोली असलेली, मध्यम ते भारी पोताची निचरायुक्त जमीन निवडावी. हेक्टरी २० टन शेणखत द्यावे. चोपण जमिनीसाठी ५-१० टन जिप्सम प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे. लागवड करताना एकरी २०-२५ किलो युरिया,७५ किलो एसएसपी व ५ किलो जिवाणू खत द्यावे.
* वाण:
कोसी ८९०३, कोसी ६७१, कोसी ७५२७, कोसी ७४०, कोसी ९४०१२, कोसी ४३४
हि शिफारसित वाण जानेवारी-फेब्रुवारी मधे लागवडीसाठी वापरावीत.
* बेणे निवड:
- उसाचे बेणे जाड, रसरशीत, जोमदार असावे.
- ऊस लागवडीच्या वेळी, बेण्याचे वय १०-११ महिने असावे.
- बेणे रोग व किडमुक्त असावे.
- मुळ्या फुटलेला, पांग फुटलेला व तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये.
- डोळ्यांची वाढ चांगली (पूर्ण झालेली नसावी) व डोळे फुगीर असावेत.
- खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये.
- डोळे जास्त जुने व निस्तेज नसावेत. जास्त वयाचे बेणे वापरणे भाग पडत असेल तर बुडाकडील जुन्या कांड्या काढून टाकाव्यात. कारण त्याचे डोळे कठीण व तपकिरी रंगाचे झालेले असावेत. हिरवट रंगाचे डोळे असलेला उसाचा वरचा भाग घ्यावा.
- बेणे तीक्ष्ण धारेच्या कोयत्याने तोडावे व कोयता अधूनमधून फिनेलच्या द्रावणात बुडवून निर्जंतूक करावा.
- शिळे झाल्यास ५०० ग्रॅम चुना २०० लिटर पाण्यात लागणीपूर्वी २४ तास अगोदर बुडवून नंतर बेणे प्रक्रिया करावी.
- योग्य बेणे निवडल्यास बेण्याची उगवण ९० टक्क्यांपेक्षा जास्त होते. खर्चात बचत होते.
- योग्य बेणे निवडल्यास तोडणीच्या वेळी वजनदार उसाची एकरी संख्या ४५,००० ते ९०,००० पर्यंत राहते.
- योग्य बेणे निवडल्यास खत, पाणी व मशागतीस ऊस चांगला प्रतिसाद देतो.
बेणे छाटणी:
* दोन डोळ्यांच्या बेणे टिपर्या धारदार कोयत्याने कराव्यात.
* बेणे टिपरी तयार करताना बुडक्याकडील बाजूच्या डोळ्याचा खालचा भाग २/३ ठेवावा व शेंड्याच्या बाजूच्या डोळ्याचा वरचा भाग १/३ ठेवून बेणे टिपरी तोडावी.
* बेणे प्रकिया पहिले रासायनिक व नंतर जैविक करावी:
१०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम + ३०० मि.मी. डायमेथोएट मिसळून द्रावण तयार करून घ्यावे. उसाच्या एक किंवा दोन डोळ्यांच्या टिपऱ्या या द्रावणात १० मिनिटे बुडवून काढाव्यात. या रासायनिक बेणे प्रक्रियेमुळे उसावर सुरवातीच्या काळात येणारे खवले कीड आणि पिठ्या ढेकूण या किडींपासून आणि जमिनीमधून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. बेण्याची उगवण चांगली होते, रोपांची सतेज - जोमदार वाढ होते आणि परिणामी उत्पादनात वाढ होते. नंतर जैविक बेणे प्रक्रिया करावी. यासाठी प्रथम १०० लिटर पाण्यात १० किलो ऍसेटोबॅक्टर जिवाणूसंवर्धक आणि १.२५ किलो स्फुरद विघटक जिवाणूसंवर्धक चांगल्या प्रकारे मिसळावे. त्यानंतर उसाच्या टिपऱ्या या द्रावणात ३० मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापराव्यात. उसाच्या टिपऱ्यांमध्ये ऍसेटोबॅक्टरचा शिरकाव होऊन सदर जिवाणू उगवणीनंतर उसामध्ये आंतरप्रवाही अवस्थेत राहून हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून हा नत्र उसाला उपलब्ध करून देतात. यामुळे उसाला वापरण्यात येणाऱ्या रासायनिक नत्र खतात (युरिया) ५० टक्के बचत करता येते. त्याचप्रमाणे सदर मिश्रणात वापरण्यात आलेले स्फुरद विघटक जिवाणू उसाखालील जमिनीतील अविद्राव्य स्फुरदाचे विघटन करून उसाला स्फुरद उपलब्ध करून देतात. स्फुरद विघटक जिवाणू संवर्धकाच्या वापरामुळे उसाला वापरण्यात येणाऱ्या रासायनिक स्फुरद खतात (सिंगल सुपर फॉस्फेट) २५ टक्के बचत करता येते असे दिसून आले आहे.
ऊस लागवडीच्या पद्धती:
बेणे डोळा लागवड पद्धत
(टिपरीवरील डोळ्यांच्या संख्येनुसार)
उसाच्या संख्येचा विचार करता १ चौरस फुटात १ ऊस असावा.
१ एकर = ४३,५६० चौरस फूट, एकरी ४३५६० म्हणजे जवळपास ४५००० डोळे असावेत.
* तीन डोळा टिपरी (पारंपरिक पद्धत)
या पद्धतीत बेणे जास्त लागते. खर्च जास्त येतो. एकरी ४५००० ऊस संख्या राखता येत नाही. ऊस जाडीस लहान पडतो, उत्पन्नात घट येते.
* दोन डोळा टिपरी
दोन डोळ्याच्या टिपर्याची लागण करताना दोन टिपर्यांतील अंतर ६ ते ८ इंच (१५ ते २० सें. मी.) ठेवावे व बेणे टिपरीचे डोळे वरंब्याच्या बाजूस राहतील असे मातीत दाबावे. पट्टा पद्धतीत- एकरी ७००० ते ८५०० टिपरी.
फायदे
* ३३ टक्के बेणे व खर्चात बचत होते.
* दर एकरी अपेक्षित उसाची संख्या राखता येते.
* सर्व लागवड हंगामात लागणीस योग्य.
* एक डोळा टिपरी
लागण १ फूट व १.५ फूट अंतरावर सरीस आडवी करावी. आडसाली व पूर्व हंगामासाठी ही पद्धत योग्य आहे. सुरू हंगामात जास्त तापमान, पाण्याची कमतरता व खोड किडीचा प्रादुर्भाव यांमुळे नांग्या पडून उत्पन्नात भर पडते. एकरी ९,००० एक डोळा बेणे लागते. फुटवे वाढविण्यासाठी जाड कोंब दीड महिन्यांनी मोडावा.
फायदे
* ६६ टक्के बेणे लागते व खर्चात बचत होते.
* काळजी घेतल्यास एकरी ४५,००० ऊस संख्या मिळते.
* ऊस जाडीस चांगला पोसतो व उत्पन्नात वाढ होते.
तोटे
* टिपरी तयार करताना जास्त काळजी घ्यावी लागते.
*ऊस पुनर्रोप लागवड
लागवडीपूर्वी १ ते १.५ महिने अगोदर एक डोळा बेणे वरीलप्रमाणे तयार करून लागवडीच्या वेळी ४५ रोपांची, खत दिलेल्या सरीत पुनर्रोप लागवड करावी. जमिनीत करावयाच्या आराखड्यानुसार ऊस लागण करावी. पारंपरिक पद्धतीत दोन सरीतील अंतर २.५ ते ३ फूट ठेवून कट वाफा (७ बाय ७ किंवा १० बाय १० मीटर) पद्धतीने वाफे तयार करून लागण करतात.
तोटे
* पाण्याचा जास्त वापर करावा लागतो.
* आंतरपीक घेण्यास अयोग्य, घेतल्यास उत्पन्नात घट येते.
* पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही.
* लांब सरी पद्धत
* दोन सर्यांतील अंतर ४ ते ४.५ फुटांपर्यंत ठेवावे.
* लांबी ४०-६० मीटर ठेवावी.
फायदे
* पिकास आवश्यक तेवढेच पाणी देता येते.
* पिकाची वाढ जोमदार होते, उत्पन्नात वाढ होते.
* जमिनी खराब होण्याचे प्रमाण कमी होते.
* यांत्रिकीकरणास ही पद्धत योग्य आहे.
* पट्टा पद्धत/जोड ओळ पद्धत (२.५ बाय ५ फूट किंवा ३ बाय ६ फूट)
एक किंवा दोन सरी आड पट्टा ठेवून उसाची लागवड करावी. रिजर अथवा ट्रॅॅक्टरच्या सहाय्याने तीन फूट अंतरावर सर्या सोडाव्यात. ऊस लागण करताना दोन सर्यात लागण करावी व एक सरी मोकळी सोडावी. सरीचा पट्टा सहा फूट रुंदीचा राहतो, तो आंतरपीक लागवडीसाठी वापरता येतो.
* पट्टा पद्धतीचे फायदे
* भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा मिळते.
* आंतरपिकाचे बोनस उत्पन्न मिळते.
* ठिबक सिंचन पद्धतीसाठी योग्य.
* पाटाने पाणी दिल्यास पाण्यात बचत होते.
* रिकाम्या जागेमुळे पीक संरक्षण चांगले होते.
* तणाचा प्रादूर्भाव कमी होते.
* यांत्रिकीकरणासाठी योग्य पद्धत.
* खोडवा ठेवल्यास पाचट आच्छादनासाठी
योग्य पद्धत.
* रुंद सरी पद्धत
दोन सरीतील अंतर ५ फूट ठेवावे व सरीची लांबी ४० ते ६० मीटर ठेवावी. दोन डोळा किंवा एक डोळा पद्धतीची लागण करावी.
फायदे
* सरीतील अंतर जास्त असल्याने ऊस भरण्याचे प्रमाण कमी असते.
* वाढ जोमदार होते.
* उत्पन्नात वाढ होते.
ऊस पिकावर पडणार्या रोगांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. ऊस पिकावर चाबूक काणी, गाभा रंगणे, लाल कांडी, मर, तांबेरा, केवडा, अननस, गवताळ वाढ, विषाणूजन्य व बुरशीजन्य केवडा रोगांचा प्रादूर्भाव होतो. या रोगांमुळे उत्पादनात घट होते हे लक्षात घेऊन वेळीच रोग नियंत्रण केल्यास रोग आटोक्यात येऊ शकतात.
चाबूक काणी नियंत्रण:
* या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बेणे वापरावेत. प्रादूर्भाव झालेला ऊस उपटून टाकावा व अशा उसाचा खोडवा घेऊ नये.
* बाष्प उष्ण हवा प्रक्रिया देऊन तयार केलेले मळ्यातील बेणेच नवीन लागवडीसाठी वापरावे.
* लागवडीपूर्वी उसाचे बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम व १०० लिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
* लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा.
गाभा रंगणे किंवा लाल कांडी नियंत्रण:
* या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बेणे वापरावे. उसाला पाणी गरजेपूर्ते द्यावे. खोडवा ठेवू नये. ज्या भागात रोगाचा प्रादूर्भाव झालेला असेल, तेथे ३ ते ४ वर्षे उसाचे पीक घेऊ नये.
* पिकांची फेरपालट करावी.
* लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम व १०० लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून वापरावे.
* रोगग्रस्त शेतातील उसाची कापणी शक्यतो लवकर करावी.
* ऊस कापण्याचा कोयता निर्जंतूक करून घ्यावा.
* ऊसतोड, कापणीनंतर शेतातील पाचट, वाळा, फणकटे जागेवरच जाळून नष्ट करावी.
* रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी.
तांबेरा नियंत्रण:
* ऊस पिकाला पाणी बेताने द्यावे व या रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या पिकाचा खोडवा घेऊ नये.
* या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातीची निवड करावी.
पोक्का बाईंग नियंत्रण:
* उसाची लागवड वेळेत करावी.
* रोगाची लागण दिसल्यास २० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड, २० ग्रॅम मॅन्कोझेब अथवा १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पायनापल (अननस) रोग नियंत्रण:
* निरोगी बेणे वापरावे. पाण्याचा योग्य निचरा झालेली जमीन निवडावी. उसाची लागवड जास्त खोल करू नये. लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १०० लिटर पाण्यात मिसळावे व या द्रावणात बेणे १० मिनिटे बुडवून लागवड करावी.
केवडा किंवा लोह कमतरता नियंत्रण:
* हेक्टरी २.५ किलो फेरस सल्फेट ५०० लिटर पाण्यात मिळसून १० ते १२ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.
* हिरवळीची पिके घ्यावीत. गंधकयुक्त खताचा वापर करावा. उसाची लागवड चुनखडीच्या जमिनीत करू नये. हेक्टरी १० किलो फेरस सल्फेट कम्पोस्ट किंवा शेणखतात मिसळून लागवडीपूर्वी जमिनीत टाकावे.
मर नियंत्रण:
* लागवडीपूर्वी १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १०० लिटर पाण्यात मिसळून त्यात उसाचे बेणे बुडवून लागवड करावी.
* निरोगी बेणे वापरावे. रोगट उसाचा खोडवा ठेवू नये.
* मुळे पोखरणार्या किडीचा बंदोबस्त करावा. फेरपालटाची पिके घ्यावीत.
बुरशीजन्य केवडा नियंत्रण:
* निरोगी बेणे वापरावे.
* लागवडीपूर्वी बेण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून घ्यावी.
* रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा व जमिनीची फेरपालट करावी.
विषाणूजन्य केवडा नियंत्रण:
* रोगमुक्त बेण्यांचा वापर करावा. रोगट झाडे शोधून नष्ट करावीत.
* मावा किडीचा किटकनाशकाद्वारे प्रतिबंध करावा.
* लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
गवताळ वाढ नियंत्रण:
* लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा. गवताळ वाढीचे बेणे मुळासकट काढून नष्ट करावे. रोग झालेल्या उसाचा खोडवा ठेवू नये.
* बेणे लागवडीपूर्वी ५०० किंवा १००० पीपीएम लिंडरमायसीनमध्ये बुडवून ठेवावे.
* किटकनाशके वापरून मावा किडीचे नियंत्रण करावे.
* लागवडीकरिता रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
ऊस उत्पादनातील सर्वात खर्चाची बाब म्हणजे ख़त व्यवस्थापन होय. अतिरिक्त ख़त वपरामुळे उत्पादन खर्च तर वाढतोच पण जमीनीचा पोत हि ख़राब होतो. त्यामुळे योग्य ख़त व्यवस्थापन खूप गरजेची आहे.
- खत देण्याचे वेळापत्रक व ख़त मात्रा किलो प्रति एकर मधे
* पहिला हप्ता म्हणजे लागवड करताना
लागणीचे वेळी ३० किलो यूरिया २१२.४ किलो एस. एस. पी.५७ किलो एम. ओ. पी. द्यावा.
* लागणी नंतर ६-८ आठवड्यांनी दूसरा हप्ता
११८ किलो नीम कोटेड यूरिया द्यावा.दुसरा हप्ता योग्य वेळीच योग्य प्रमाणात दिला नाही, तर त्याचा परिणाम फुटव्यांच्या संख्येवर होतो. पर्यायाने ऊस तोडणीच्या वेळी गाळप लायक उसांची संख्या कमी मिळते. फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये ऊस पिकाची नत्राची गरज जास्त असते.
* लागणी नंतर १२-१६ आठवड्यांनी तीसरा हप्ता ३० किलो यूरिया द्यावा.
* चवथा हप्ता मोठ्या बांधणीचे वेळी ११८ किलो निम कोटेड यूरिया २१२.४ किलो एस एस पी ५७ एम ओ पी द्यावे.नंतर बांधणी करावी.
* अश्या प्रकारे एकूण १३६ किलो नत्र,६८ किलो स्फुरद,६८ पालाश खताची एकरी शिफारस आहे.
* या सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मंन्गेनीज सल्फेट आणि २ किलो बोराक्स प्रति एकरी शिफारस आहे.
* टिप:१) को-८६०३२ (नीरा) या जातीस अधिक उत्पादनासाठी खतमात्रेपेक्षा २५ टक्के जादा खतमात्रा द्यावी.
२) उत्पादन खर्च कमी करण्यासाठी माती परिक्षण अहवालात सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता असेल त्याच प्रमाणात वापरावीत.
किड व्यवस्थापन
पांढरा लोकरी मावा व्यवस्थापन :
- ऊसाची पट्टा अथवा रुंद सरी पध्दतीने लागण करावी जेणे करुन पीक संरक्षण उपाय योजना करणे सोयीस्कर होईल.
- सुरुवातीस कमी प्रादुर्भाव असलेल्या शेतातील कीडग्रस्तपाने तोडून जाळून टाकावीत.
- कीडग्रस्त शेतातील पाने दुस-या शेतात नेऊ नयेत.
- कीडग्रस्त बेणे वापरु नये. कोनोबाथ्रा अफिडोव्होरा या परभक्षी मित्र किटकांची २५०० अंडी किंवा १००० अळया प्रति हेक्टर सोडाव्यात.
- क्रायसोपा या परभक्षी मित्र किडीची २५०० अंडी/अळया प्रती हेक्टरी सोडाव्यात. जैविक मित्र कीटक शेतात सोडल्यावस किटकनाशकांची फवारणी ३ ते ४ आठवडे करुन नये.
- शेतात किटकनाशकाचा वापर करतांना हातमोजे व चेह-यावर मास्कचा वापर करावा.
पांढरा लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास:
- ऑक्सिडिमेटॉन मिथाईल २५ टक्के प्रवाही हे लहान उससाठी ६०० मिलि ४०० लिटर पाण्यामध्ये वापरावे,
- मध्यम उससाठी १०५० मिलि ७०० लिटर पाण्यामध्ये वापरावे आणि मोठ्या उससाठी १५०० मिलि १००० लि पाण्यामध्ये वापरावे किंवा डायमिथोएट ३० टक्के प्रवाही हे लहान उससाठी ६०० मिलि ४०० लिटर पाण्यामध्ये वापरावे.
- मध्यम उसात १०५० मिलि ७०० लिटर पाण्यामध्ये वापरावे आणि मोठ्या उसात १५०० मिलि १००० लिटर पाण्यामध्ये वापरावे किंवा मॅलेथिऑन ५० टक्के प्रवाही हे किटकनाशक लहान उसात ८०० मिलि ४०० लिटर पाण्यामध्ये वापरावे, मध्यम उसात १४०० मिलि ७०० लिटर पाण्यामध्ये वापरावे, मोठ्या उसात २००० मिलि १००० लिटर पाण्यामध्ये वापरावे. किंवा फोरेट १० जी दाणेदार १५ किलो प्रति हेक्टरी टाकण्याची शिफारस केली आहे.
- (फोरेट हे कीटकनाशक ऊस तोडण्या पूर्वी तीन महिने वापरु नये.)
हुमणी व्यवस्थापन:
अळया व कोष नियंत्रणासाठी खोल नांगरट करावी. भुंगेरे गोळा करुण नाश करावे. जमीन वाफश्यावर असताना क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही २.५ लीटर १००० लीटर पाण्यात मिसळून झारीने ओतावे व हलकेसे पानी द्यावे.
ऊसावरील खोडकिडा व्यवस्थापन :
ऊस लागवडीच्या वेळी दाणेदार कार्बारिल ४ टक्के किडनाशक जमिनीत मिसळावे व नंतर बेणे लावावे.
ऊस लागवडीच्या वेळी दाणेदार कार्बारिल ४ टक्के किडनाशक जमिनीत मिसळावे व नंतर बेणे लावावे.
शेंडा पोखरणारी अळी व्यवस्थापन :
क्विनॉलफॉस २५ ईसी १००० मि. लि. ५००लि.पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. दोन आठवडयाच्या अंतराने दुसरी व तिसरी फवारणी वरीलप्रमाणे करावी.
पानावरील तुडतुडे (शुगरकेन पायरीला) व्यवस्थापन :
डायमेथोएट ३० ईसी १००० मिलि किंवा मॅलाथियॉन ५० ईसी ८५० मिलि किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी १२०० मिलि किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ ईसी ८५०मिलि १००० लिटर पाण्यात मिसळून दर हेक्टरी फवारावे,आवश्यक असल्यास १५ दिवसांनी वरीलप्रमाणे दुसरी फवारणी करावी. या किडीसाठी जरी किटकनाशके उपयुक्त असली तरी वाढलेल्या उसात शिरता येत नसल्यामुळे फवारणी अथवा धुरळणी करणे अशक्य होते. तेंव्हा इपिरीकेनीया मेलॅनोल्युका या परोपजीवी किटकाचे कोष सुमारे ५००० प्रति हे. किंवा ५ लाख अंडी पायरीलाग्रस्त शेतात सोडावेत.
पांढरी माशी व्यवस्थापन :
खताच्या मात्रा शिफारशी प्रमाणेच द्याव्यात.
नत्राच्या खतांचा जास्तीचा वापर करु नये.
क्रायसोपरला कारनीया (क्रायसोपा) हया भक्षकाचे १००० प्रौढ किंवा २५०० अळया प्रति हेक्टरी सोडाव्यात.
अतिप्रादुर्भावग्रस्त शेतातील काळे कोष असलेली पाने काढून डायक्लोरोव्हास ७६ ईसी हे कीटकनाशक ११०० मिलि किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी १६०० मिलि किंवा डायमिथोऐट ३० ईसी २६५० मिलि किंवा ऑक्सिडिमेटॉन मिथाईल २५ ईसी ३२०० मिलि किंवा मॅलेथिऑन ५० ईसी २००० मिलि १००० लिटर पाण्यातून १५ दिवसाचे अंतराने दोन वेळा फवारावे.
उसात आंतरपीक घेतल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न ऊस उत्पादनचा खर्च पूर्ण काढतो आणि ऊस पूर्ण नफा देवून जातो हे आम्ही प्रात्यक्षिकातुन सिद्ध केले आहे.
उसाची पूर्ण उगवण होण्यासाठी सर्वसाधारणपणे ३ ते ६ आठवडे लागतात. त्यानंतर सुरवातीच्या २.५ ते ३ महिन्यांत पिकाची वाढ सावकाश होत असते. या कालावधीत आंतरपीक निघु शकते.या सोबतच तणांचे प्रमाण कमी होते, द्विदलवर्गीय पिकांची लागवड केल्याने जमिनीचा पोत सुधारतो. आंतरपिकामुळे जमीन, पाणी व दिलेली खते, तसेच सूर्यप्रकाश यांचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो.
उसात आंतरपीक घ्यावयाच्या पद्धती:
* सलग सरी पद्धत -
जमिनीच्या प्रकारानुसार १०० सें.मी. ते १५० सें.मी. अंतरावर सऱ्या- वरंबे पाडून सरींमध्ये ऊस व वरंब्यांवर एक किंवा दोन्ही बाजूंना आंतरपीक लावले जाते.
* एकाआड एक सरी पद्धत -
या पद्धतीत ७५ किंवा ९० सें.मी. अंतरावर सलग सऱ्या पाडून पहिल्या सरीत ऊस लावून पुढे एक आड एक सऱ्या मोकळ्या सोडून त्यांचा उपयोग आंतरपिकाच्या लागणीसाठी केला जातो.
पूर्वहंगामी उसात घ्यावयाची आंतरपिके -
- पूर्वहंगामी उसामध्ये बटाटा, कांदा, लसूण, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा, टोमॅटो, हरभरा इ. आंतरपिके घेता येतात.
- नेहमीच्या ऊस लागणीत वरंब्यांच्या एका बाजूस तळापासून २/३ अंतर सोडून किंवा पट्टा अथवा जोड ओळ पद्धतीत उसाच्या लागणीनंतर ६ ते ७ दिवसांनी म्हणजेच आंबवणीचे पाणी देण्याच्या आधी आंतरपिकाची टोकण किंवा पुनर्लागण करावी. या पिकांना योग्य पाणी व्यवस्थापन करावे.
- उसामध्ये कांद्याच्या रोपांची लागण सरीच्या दोन्ही बाजूंस १० ते १५ सें.मी. अंतरावर दुसऱ्या पाण्याच्या (आंबवणी) वेळी करावी.
- जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी कांदा हे उत्तम आंतरपीक आहे.
उसाच्या शिफरशीत ख़त मात्रे व्ययिरिक्त आंतरपिकांसाठी रासायनिक खतांची मात्रा अशी दया:
* आंतरपिकामुळे उसाची होणारी घट टाळण्यासाठी आंतरपिकासाठी रासायनिक खतांची वेगळी मात्रा त्या पिकाच्या लागवड क्षेत्राच्या प्रमाणानुसार द्यावी.
* कांदा - ४० किलो नत्र - २० किलो स्फुरद - २० किलो पालाश प्रति एकरी द्यावे.
* कोबी - ६० किलो नत्र - ३३ किलो स्फुरद - ३३ किलो पालाश प्रति एकरी द्यावे.
* फुलकोबी - ६० किलो नत्र - ३३ किलो स्फुरद - ३३ किलो पालाश प्रति एकरी द्यावे.
* बटाटा - ४० किलो नत्र - २५ किलो स्फुरद - ४५ किलो पालाश प्रति एकरी द्यावे.
* उसातील कांदा, कोबी, फुलकोबी व बटाटा पिकास आंतरपिकाची खतमात्रा देताना १०० टक्के स्फुरद व पालाश आणि ५० टक्के नत्र लागणीच्या वेळी देऊन उरलेले ५० टक्के नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे. रासायनिक खते माती परीक्षणाच्या अहवालानुसार द्यावीत.
उसामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची (एकदल) गतवर्गीय तणे आणि घेळ, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची (द्विदल) गवतवर्गीय तणे आढळतात.तणांमुळे होणारे ऊस पिकाचे नुकसान हे कीड व रोग यांमुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा जवळपास जास्त आहे; परंतु मजुरांची कमतरता व मजुरीचे वाढीव दर यामुळे तणांच्या बंदोबस्ताचा प्रश्न अधिक अधिक अड़चनीचा बनत आहे. या तणांच्या नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
* पूर्वीचे पीक निघाल्यानंतर हराळी आणि लव्हाळा यासारख्या बहुवार्षिक व इतर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी जमिनीची उभी- आडवी खोल नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी करणे, तणांचे अवशेष गोळा करून जाळून नष्ट करणे इत्यादी उपाययोजना केल्या जातात.
* जमिनीची नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी करणे इ. मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करावीत.
* तणे, धसकटे वेचून जाळून नष्ट करावी.
* गाजरगवतासारखी तणे बी येण्यापूर्वीच उपटून टाकावीत.
सलग ऊस लागवडीतील तणनाशक (शिफारशीत केलेले सर्व उपचार शेतीमध्ये करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा.)
- 👉🏿 ऊस लागवडीच्या ३ दिवसा नंतर पण ऊस उगवण्यापूर्वी अट्रॅझिन २ किलो किंवा ऑक्सिफ्लोरफेन ७५० मिली प्रति ६०० लीटर पानी प्रमाणे २.५ एकर क्षेत्रासाठी वापरावे. हि फवारनी करताना नॅपसैक पंपावर डिफ्लेक्टर किंवा फॅन टाइप नोझल वापरावा.
- 👉🏿 ऊस लागवडीच्या ४५ व ९० दिवसा नंतर उगवनी पश्चात वापरायचे गल्यफोसेट १ लीटर प्रति ६०० लीटर पानी प्रमाणे २.५ एकर हे पण प्रभावी ठरेल.
- 👉🏿 ऊस उगवण्यापूर्वी तणनाशक घेतले नसेल तर ग्रामोक्झोन १ लीटर + २-४ डी २.५ किलो प्रति ६०० लीटर पानी प्रमाणे २.५ एकर व ऊस लागवडीच्या २१ दिवसा नंतर उगवनी पश्चात वापरायचे.
- 👉🏿 ऊस लागवडपूर्वी २१ दिवस अगोदर गल्यफोसेट २ किलो + २% अमोनियम सल्फ़ेट प्रति ६०० लीटर पानी प्रमाणे २.५ एकर वापरावे. यामुळे लव्हाळा नियंत्रित होवू शकेल.
- 👉🏿 ऊस उगवनी पश्चात २-४ डी २ ग्रॅम + यूरिया १० ग्रॅम प्रति १० लीटर पानी प्रमाणे फवारनी केल्यास वेलवर्गीय तन नियंत्रण शक्य आहे.
- 👉🏿 तन नाशकां शिवाय ऊस लागवड नंतर २५,५५ व ८५ दिवसांनी मशागत किंवा खुरपनी करून केलेले तण नियंत्रण अधिक उपयुक्त ठरू शकते.
- 👉🏿 आंतरपीक घेतलेल्या उसात किंवा शेजारी तज्ञांच्या सहाय्याने योग्य तणनाशक निवड़ावे.