सूर्यफुल लागवड तंत्र
जमीन
सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून, त्यानंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. *शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी एकरी ८ ते १० गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
लागवड
*रब्बी सूर्यफुलाची लागवड ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. मध्यम ते खोल जमीन ४५ x ३० सें.मी., भारी जमीन ६० x ३० सें.मी, तसेच संकरित जाती आणि जास्त कालावधीच्या जातींची लागवड ६० x ३० सें.मी. अंतरावर करावी. लागवडीसाठी शिफारशीत जातींचीच निवड करावी.
*कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बियाणे ५ सें.मी.पेक्षा जास्त खोल पेरू नये. *बागायती पिकाची लागवड सरी - वरंबा पाडून वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी. *सूर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ७ते ८ किलो बियाणे आणि संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.
बिजप्रक्रिया
*मर रोगाच्या प्रतिबंधासाठी दोन ते अडीच ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर ऍझोटोबॅक्टर जिवाणूसंवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
खत व्यवस्थापन
*कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी अडीच टन शेणखत , तसेच ५० किलो नत्र, २५किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.
*बागायती पिकास प्रति हेक्टरी ६०किलो नत्र, ३०किलो स्फुरद, ३०किलो पालाश द्यावे. यापैकी ३०किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेल्या ३०किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २०किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे.
पाणी व्यवस्थापन
*सूर्यफुलाच्या पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे.
रोप अवस्था,
फुलकळी अवस्था,
फुलोऱ्याची अवस्था,
दाणे भरण्याची अवस्था.
या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.
विशेष उपाय
*पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ७ ते ११या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरून हळुवार हात फिरवावा, म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते. *सूर्यफुलाचे फूल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर आठ दिवसांनी दोन ग्रॅम बोरॅक्स प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी, त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते. *परागीभवन अधिक होण्यासाठी प्रति हेक्टरी चार ते पाच मधमाश्यांच्या पेट्या ठेवाव्यात.
*सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जातात. दर वर्षी त्याच जमिनीत वारंवार हे पीक घेतल्यास जमिनीचा पोत बिघडून उत्पादनक्षमता कमी होते, तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी कमीत कमी दोन वर्षे तरी त्याच जमिनीत सूर्यफुलाचे पीक घेऊ नये. कडधान्य सूर्यफूल किंवा तृणधान्य - सूर्यफूल याप्रमाणे पिकाची फेरपालट करावी.
*पीक फुलोऱ्यात असताना कीटकनाशकाची फवारणी करू नये