तीळ लागवड तंत्रज्ञान
जमीन :
पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत जमीन आवश्यक आहे.
जमीन तयार करताना प्रति एकरी ४ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे.
बियाणे :
उन्हाळी हंगामाकरिता प्रति हेक्टरी तीन ते चार किलो बियाणे वापरावे.
एकेटी-101, पीकेव्ही एनटी-११
बीजप्रक्रिया :
पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कार्बेन्डाझिम यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति किलो तीन ग्रॅम, तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी चार ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आटोपून घ्यावी.
आंतरमशागत :
पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर 15-20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून, दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे. आवश्यकतेनुसार दोन-तीन कोळपण्या/खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
खत व्यवस्थापन :
माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळी अर्धे नत्र (12.5 किलो प्रति हेक्टरी) आणि पूर्ण स्फुरद (25 किलो प्रति हेक्टरी) द्यावा.
दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा (12.5 किलो प्रति हेक्टरी) द्यावा, तसेच पेरणीच्या वेळी झिंक व सल्फर या खताच्या मात्रा 20 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावे.
पाणी व्यवस्थापन:
उन्हाळी पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसांनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे. ओलित करताना पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
कीड व रोग नियंत्रण:
पाने गुंडाळणाऱ्या/खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता 20 मि.लि. क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पर्णगुच्छ या रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार तुडतुड्यामार्फत होतो. तुडतुडे नियंत्रणासाठी 4 मि.लि. इमिडाक्लोप्रिड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगट झाडे दिसल्यास उपटून टाकून त्यांचा नाश करावा.
उत्पादन :
बोंड्या पिवळ्या होण्यास सुरवात होताच पेंड्या बांधून त्या उभ्या ठेवाव्यात.
बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या साह्याने तीळ झाडावे. चार-पाच दिवसांनी परत पेंड्या झाडाव्या व बियाणे स्वच्छ करून आणि वाळवून साठवावे. सुधारित लागवड पद्धतीमुळे हेक्टरी सहा ते सात क्विंटल उत्पादन मिळते. तेलाचे प्रमाण ४८ टक्के राहते.
अखिल भारतीय तेलबियाणे संशोधन केंद्र, (जवस/तीळ), कृषी महाविद्यालय, नागपूर
0712 - 2541245