Search here..

Wednesday, November 23, 2016

माझीशेतीच्या RSD प्रकल्पाचा महाराष्ट्रातील आढावा घेतल्यानंतर माझीशेतीचे अध्यक्ष व RSD प्रकल्पाचे प्रमुख महेश बोरगे यांनी व्यक्त केलेले मनोगत.

(आज दि.२३/११/२०१६ रोजी माझीशेतीच्या RSD प्रकल्पाचा महाराष्ट्रातील आढावा घेतल्यानंतर माझीशेतीचे अध्यक्ष व RSD प्रकल्पाचे प्रमुख महेश बोरगे यांनी व्यक्त केलेले मनोगत.)
शब्दांकन - धनंजय उरणे

सर्व सदस्यांसाठी, मग ते क्षेत्रावर काम करणारे असोत वा कार्यालयात.... आपण सर्वजण दि.०२ नोव्हें.१६ पासून माझीशेतीच्या व्यासपीठावर कार्यरत झालो आहोत. कार्यरत म्हणण्यापेक्षा एक सामाजिक कामाचा वसा घेतला आहे म्हणाले तरी वावगे ठरणार नाही. जसे की आपण घरच्यांच्या इच्छेला अनुसरून किंवा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कृषीचे शिक्षण पुर्ण केले आहे. आपण घेतलेल्या शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग करायची हि उत्तम वेळ आहे. आपल्या ज्ञानाच्या तलवारीला म्यानातून बाहेर काढायची वेळ आली आहे.

समाजातील अतिशय हलाखीत आणि जोखीमेत दिवस काढणाऱ्या शेतकऱ्यांची ध्येयवादी मानसिकता ठेवून मदत करायचे महत्वाचे काम आपल्या हातून घडणार आहे. तुम्ही या सामाजिक कामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, याची मला खात्री आहे. 

आपण जेंव्हा हा वसा हाती घेतला तेंव्हा आपल्या मनाचे समाधान होत नाही तोपर्यंत आपल्या कामात बदल घडवीत जायचे. आपण नेहमी म्हणतो की आज मला मूड नाही..., म्हणजे काय तर आपण करीत असलेल्या कामात स्वारस्य नसणे. बरेचदा फक्त काहीतरी काम करायचे म्हणून करायचे आणि आजचा दिवस पुढे ढकलायचा असे वाटते, तेंव्हा समजायचे कि हे सध्या करत असलेले काम माझ्यासाठी नाही. मग अश्या वाट चुकलेल्या गाडीतून प्रवास करत पुढे जाऊन खाली उतरण्यापेक्षा आताच योग्य निर्णय घेतलेला बरा...

जेंव्हा आपण ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा शाश्वत विकास करण्यासाठी आराखडा तयार करून कार्यरत होतो तेंव्हा त्यातून स्वतःच्या विकासाचा विचार देखील करायला हवा. आपण करतोय ते काम योग्य कि अयोग्य यासाठी स्वतःचे परीक्षण करण्याची संधी नेहमी स्वीकारली पाहिजे किंवा तशी संधी शोधली पाहिजे.

ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पामधून आपण जेव्हा कृषिच्या रण भूमीत आपल्या ज्ञानाची शस्त्रे घेऊन उतरतो तेंव्हा पहिल्या प्रथम आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे. माझ्यामुळे माझी आणि शेतकऱ्यांची प्रगती झालीच पाहिजे. आपण विद्यालयात घेतलेले शिक्षण, प्रगत शेतकऱ्यांचे अनुभव, काम करताना आलेले अनुभव, मित्र-सहकाऱ्यांचा अनुभव, महाविद्यालये, शासकीय विभाग यांचा सहयोग घेऊन आपण गरजेनुसार प्रगतीचा आलेख चढता ठेवू शकतो. 

प्रत्यक्ष काम करताना आपली ज्ञानेंद्रिये जागृत ठेवून शेतकऱ्यांसारखा जात्याच संशोधक आपला उपयोग करून घेतो का? यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली माहिती संकलित करून देणे म्हणजे हे काम आजच्या काळात शेतीला श्री कृष्णाने अर्जुनाला सारथी बनून केलेल्या पवित्र कामासारखे आहे. आणि असे हे पवित्र काम आपल्या वाट्याला आले आहे. माझ्या आणि तुमच्या पालकांचे नावलौकिक वाढविणे आणि आपल्या जन्माचे सार्थक करणे हे आपण आपल्या कर्तृत्वातून दाखवून देणार आहोत. 

शेतकऱ्यांना आपण दिलासा देत असू तर त्यांना गरजेच्या साधनांची उपलब्धता करून देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कमीत कमी खर्चामध्ये उच्च गुणवत्तापूर्ण संसाधने उपलब्ध करणे आणि उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात बऱ्याच कंपन्या शेतकऱ्यांना वेगवेगळी आश्वासने देऊन लुभावत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित करून कृषि निविष्ठांचा गुणवत्तेच्या बाबतीत शोध घ्यायला हवा. जेणेकरून गरजेपेक्षा जास्त आणि गुणवत्ता नसलेली उत्पादने शेतकऱ्यांपासून दूर ठेवता येतील. 

बरेच शेतकरी हे संपुर्ण शेतकरी समाजाला दिशादर्शनाचे काम करीत असतात मात्र दैनंदिन जीवनातील व्यापातून त्यांची माहितीची देवाणघेवाण करणे शेतकऱ्यांना शक्य नसते. याकरिता 15 दिवस किंवा महिन्यातुन किमान तासभर तरी शेतकऱ्यांना एकत्र करुन ग्रुप चर्चा करणे आवश्यक आहे. या ग्रुपचे होणारे उत्पादन योग्य त्या हमी भावाने विकले गेले पाहिजे. आपल्या शेतकरी बांधवांचे पाल्य वेगवेगळ्या शहरात शिक्षण, नोकरी, व्यवसाय करीता गेलेले असतात, त्यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आजच्या काळाची गरज आहे. 

RSD प्रकल्पाच्या विशेषतः lll नं.बॅच मध्ये महिलांनी भरारी घेतली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा राणी लक्ष्मीबाई च्या रूपाने प्रज्ञा कांबळे, पुनम सुतार, प्रियांका पाटील, प्रियांका सोनगेकर, जुईली गांधी, अश्विनी शिंदे प.महाराष्ट्रात अवतरलेल्या आहेत. प.महाराष्ट्रासारख्या अतिशय प्रगत शेतीच्या रणांगणात या रणरागिणी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. माझीशेतीचा संपुर्ण स्टाफ या रणरागिनींना सर्वोतोपरी सहकार्यासाठी तत्पर राहील याची मी अध्यक्ष या नात्याने ग्वाही देतो. 

धन्यवाद... 🙏
🏻