Search here..

Thursday, February 22, 2018

नारळ लागवड माहिती

नारळ लागवड 
सर्वच प्रकारच्या जमिनीत नारळ लागवड करता येते. जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करावी. शेताच्या बांधावर देखील नारळाची लागवड करता येते. 1 × 1 × 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करावे. रेताड, वरकस किंवा मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळात कमीत कमी एक ते दोन टोपल्या चांगल्या प्रतीची माती टाकावी. अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी प्रतीच्या जमिनीत खड्ड्याच्या तळाला एक ते दोन टोपल्या रेती (वाळू) घालावी; तसेच खड्डा भरताना एक ते दोन टोपल्या रेती मातीत मिसळावी, त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. वालुकामय जमिनीत खड्ड्याच्या तळाशी नारळाच्या सोडणांचा थर दिल्यास उत्तम. त्याद्वारे जमिनीत ओल टिकून राहते. खड्डा भरताना खड्ड्यात चार ते पाच घमेली शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम फॉलिडॉल पावडर खड्ड्याच्या मातीत मिसळावी. जमीन सपाट असल्यास खड्डे पूर्ण भरून घ्यावेत. 
पावसाचा जोर ओसरल्यानंतर ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये लागवड करावी. 


लागवडीचे अंतर -
उंच जाती - 7.5X7.5 मीटर
बुटक्या जाती - 6X6 मीटर
कुंपन करिता - 7 मीटर


एक वर्षे वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत.  रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. रोपे कृषी विद्यापीठ, शासकीय आणि शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत.

जातींची माहिती
उंच जाती 
बाणवली (वेस्ट कोस्ट टॉल) - 
या जातीचे आयुष्यमान 80 ते 100 वर्षे असून सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. उत्पादन - सरासरी 80 ते 100 फळे मिळतात.


लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) - 
या जातीची झाडे आणि फळे बाणवलीसारखीच असतात, परंतु फळाच्या तीनही कडा उठावदार असतात.
उत्पादन - सरासरी 150 फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी 140 ते 180 ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण 72 % असते.


प्रताप - 
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र (भाट्ये) रत्नागिरी येथे ही जात बाणवली वाणातून निवड पद्धतीने विकसित करून महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आली आहे. नारळाचा आकार मध्यम, गोल असून ती सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते.
उत्पादन - या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात.


फिलिपिन्स ऑर्डिनरी - 
या जातीचे नारळ आकाराने फारच मोठे असतात. 
उत्पादन - सरासरी 105 नारळ आहे.सरासरी 213 ग्रॅम खोबरे मिळते.


बुटक्या जाती (सिंगापुरी)
ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ -
लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. बुतक्या जातीचे आयुष्यमान 30 ते 35 वर्षे असते. रंगावरून ऑरेंज डाफर्‌ , ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. 
शहाळ्यासाठी ऑरेंज डार्फ ही जात सर्वांत उत्तम आहे. 100 ml. पाण्यात 7 gm एवढी साखर असते. 


संकरित जाती 
केरासंकरा (T × D) - 
या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. 
उत्पादन - सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 % इतके असते.


चंद्रसंकरा (D X T) - या संकरित जातीची फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. 
उत्पादन - सरासरी उत्पादन 116 फळे आहे


रोपांची निवड, निगा महत्त्वाची -
रोपाची लागवड केल्यानंतर लगेचच त्याला आधार द्यावा. पश्‍चिमेकडील वाऱ्याने ते हलू नये म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या 45 सें.मी. अंतरावर रोपाच्या दक्षिणोत्तर बाजूवर रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी. त्यावर रोप सैलसर बांधून ठेवावे.  पहिली दोन वर्षे उन्हाळ्यात सावली करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी रोपांच्या चारही बाजूला उंच वाढणारी केळी; तसेच पपई यांची लागवड करावी. 
कोकणात काळी मिरी, जायफळ, दालचिनी या पिकांची लागवड आंतरपिके घेता येतात.

खते आणि पाणी व्यवस्थापन : नारळाच्या झाडांना चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची गरज असते. खते आणि पाणी नियमित दिले तर नारळाची वाढ होऊन झाड ५ ते ६ वर्षांतच फुलोर्‍यावर येते. पहिल्यावर्षी शेणखत १० किलो, नत्र २०० ग्रॅम , स्फुरद १०० ग्रॅम, पालाश २०० ग्रॅम आणि कल्पतरू सेंद्रिय खत ५०० ग्रॅम या प्रमाणात द्यावे. नंतर पुढे तेवढेच प्रमाण वाढवून दरवर्षी खते द्यावीत.

नत्र व पालाश ह्या खतांच्या मात्रा जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये तीन वेळा विभागून द्याव्यात. तर शेणखत, कल्पतरू सेंद्रिय खत आणि स्फुरद संपूर्ण मात्रा जूनमध्ये द्यावी.

खते कशी द्यावीत : झाडाच्या बुंध्यापासून एक मीटर अंतरावर ३० सेंमी रुंदीचा व १५ सेंमी खोलीचा चर काढून त्यात खते द्यावीत आणि चर पुन्हा बुजवावा. जसजसे रोप मोठे होईल तसतसा चर बुंध्यापासून दूर काढावा.

मिठाचा वापर :
कोकणातील काही शेतकरी नारळाच्या झाडाला खत म्हणून काही प्रमाणात मिठाचा वापर करतात. परंतु खत म्हणून मिठाची उपयुक्तात सिद्ध झालेली नाही. यामुळे खत म्हणून मिठाच वापर करू नये. देशावरील भागात तर मिठाचा वापर अजीवात करू नये.

पाणी : नारळाच्या झाडांना नियमितपणे पाणी दिले तर त्यांचे उत्पादन बर्‍याच प्रमाणात वाढते. नारळाच्या झाडांना मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात पाणी देण्याची जास्त आवश्यकताही असते. काही ठिकाणी पावसाळ्यानंतर नारळाच्या झाडांना पाणी दिले जात नाही. परिणामी झाडांची योग्य वाढ होत नाही आणि उत्पादन कमी मिळते.

नारळाची नवीन लागवड केल्यानंतर पहिली ३ ते ४ वर्षे झाडांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या नारळाच्या झाडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते १० दिवसांतून वेळा पाणी द्यावे. नारळाच्या झाडाच्या बुंध्याभोवती झाडाच्या आकारानुसार १ ते २ मीटर व्यासाचे गोल किंवा चौकोनी आले करून पाणी द्यावे. पाणी झाडाच्या खोडाजवळ फार काळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

किडी व रोग नियंत्रण - 
गेंड्या भुंगा -
हा भुंगा नवीन येणारा कोंब खातो, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. झाडावर नवीन पाने त्रिकोणी आकारात कापलेली दिसतात. लिंडेन (५०%) किंवा कार्बारिल (५०%) पावडर २० ग्रॅम (पाण्यात मिसळणारी) दहा लिटर पाण्यात मिसळून झाडांवर फवारावीत. खताचे खड्डे बागेजवळ बनवु नये. झाडांतून कीडे काढून नष्ट करावेत.


सोंड्या भुंगा -
खोडाच्या आतील मऊ भाग पोखरला जातो, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. काही दिवसांनी झाड मरते. झाडावर प्रत्येक बेचक्यात २५० ग्रॅम लिंडेन भुकटी टाकावी. झाडावर भुंग्यामुळे पडलेल्या सर्वांत वरच्या छिद्रात २० ग्रॅम कार्बारिल (५०%) टाकावे. तत्पूर्वी खालची सर्व छिद्रे वाळू आणि १० % लिंडेन १:१ प्रमाणात मिसळून  बंद करावीत. ४० ग्रॅम ५०% कार्बारिल भुकटी (पाण्यात मिसळणारी) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावित.


पानावरील कोळी -
या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पिवळसर ठिपके पडतात. लहान फळांची गळ होते. १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम वेटेबल गंधक मिसळून फवारणी करावी.


उंदीर -
उंदीर नारळाची कोवळी वाढणारी फळे पोखरतात. बुंध्यावर जमिनीपासून २ मीटर उंचीवर अर्धा मीटर गुळगुळीत पत्र्याच्या गोलाकार पट्ट्या बसवाव्यात. १०० ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये ६ ग्रॅम झिंक फॉस्फाईड मिसळून त्याच्या गोळ्या तयार करुन खोडातील व बागेतील बिळातही टाकाव्यात.

रोग नियंत्रण -
कोंब कुजणे - 
या रोगाची लागण झालेल्या झाडाचा कोंब कुजतो व त्याला दुर्गंधी सुटते. कोवळी झाडे अधिक प्रमाणात बळी पडतात. या रोगाची लागण झालेल्या झाडाचा कुजलेला कोंब आणि कोंबाचा भाग खरडून त्यावर बोर्डो मिश्रणाची पेस्ट लावावी. १% बोर्डो मिश्रण किंवा डायथेन एम -४५ बुरशीनाशक औषध एक लिटर पाण्यात २ ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.


फळांची गळ - 
नारळाच्या झाडाला नारळा धरण्यास सुरुवात झाल्यावर पहिली १ - २ वर्षे फळांची नैसर्गिक गळ होते. खते आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

करपा - 
नारळाच्या झाडाच्या पानांवर पेस्टोलोशिया नावाच्या बुरशीमुळे तपकिरी लालसर रंगाचे ठिपके पडतात. ठिपके मोठे होऊन झाडाचे संपूर्ण पान करपते. वाळलेली पाने काढून नष्ट करावीत. १% बोर्डो मिश्रण किंवा १० लिटर पाण्यात ३ ग्रॅम डायथेन झेड -७८ हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी.

खोड पाझरणे - 
जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा करून घ्यावा. रोगामुळे कुजलेला भाग खरडून काढावा आणि त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. खते आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

फळांची काढणी आणि उत्पादन :
नारळाच्या झाडाला फुलोरा आल्यापासून १२ महिन्यांनी त्याची फळे पक्क होतात. या वेळी फळाचा हिरवा रंग जाऊन पिवळसर तपकिरी रंग येतो. नारळाच्या तयार फळावर टिचकी मारल्यास खणखणीत आवाज येतो. नंतर पाडेली कडून नारळाचा घस कापून काढावा.
शहाळ्यासाठी पहले ६ महिन्यांनंतर आवश्कतेनुसार नारळ काढतात.


प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, ता. जि. रत्नागिरी
संपर्क - 02352 - 255077