हवामान :
आल्यास उष्ण व दमट हवामान मानवते, पण जेथे ओलीताची सोय आहे अशा उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड यशस्वी करता येते. समुद्रसपाटीपासून ते १५०० मीटर उंचीपर्यनच्या प्रदेशात आले चांगले येऊ शकते.
तापमानाचा विचार करता आले लागवडीच्या कालावधीतील एप्रिल - मे ३० डी. ते ३५ डी. से. तापमान फुटवे फुटून उगवण चांगली होण्यासाठी उत्तम असते. आल्याच्या वाढीसाठी सरासरी २० डी. ते ३० डी. से. तापमानाची आवश्यकाटा असते. थंडीच्या दिवसातील कोरडे व थंड हवामान जमिनीतील कंद उत्तम प्रकारे पोसण्यासाठी अनुकूल असते. या पिकास लागवडीपासून काढणीपर्यंत सरासरी १५० ते ३८० सें. मी. पाऊस पुरेसा ठरतो. जास्त पावसाच्या प्रदेशात विशेषत: कोकणात हे पीक पावसाच्या पाण्यावरही घेतले जाते. परंतु जमिनीमध्ये पाणी साठून राहिल्यास याचे कंद कुजण्यास सुरुवात होते, म्हणून जास्त पावसाच्या प्रदेशात पाण्याचा उत्तम निचरा होणे आवश्यक आहे. साधारणत: २५% सावलीच्या ठिकाणी आल्याचे पीक उत्तम येते. परंतु आल्याच्या पिकास दिवसाचा सुर्यप्रकाश जास्त मिळाल्यास आल्याचा सुवास कमी होतो, असे प्रयोगांती आढळून आले आहे.
जमीन :
आल्यास चांगली निचरा होणारी मध्यम प्रतीची भुसभुशीत, कसदार जमीन मानवते. नदीकाठची गाळाची जमीनदेखील कंद वाढण्याच्या दृष्टीने योग्य आहे. हलक्या जमिनीत भरपूर शेणखत व कंपोस्ट खत घातल्यास तसेच हिरवळीच्या खताचे पीक घेतल्यास हे पीक चांगले येते. आले लागवडीसाठी जमिनीची खोली कमीत - कमी ३० सें.मी. असावी. या पिकाच्या लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्यतो टाळाव्यात. कोकणातील जांभ्या खडकापासून तयार झालेल्या जमिनीत तसेच तांबड्या पोयाट्याच्या जमिनीत या पिकाचे चांगले उत्पादन मिळते. या पिकासाठी किंचीत आम्लयुक्त सामू असलेली जमिन (सामू ६.५ ते ७) मानवते. कंदवर्गीय पीक असल्यामुळे कंदाची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीत हवा खेळती राहणे गरजेचे असते. चुनखडक असलेला जमिनीत पीक चांगले येते, परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. जमीन निवडताना त्यामध्ये लव्हाळा, हराळी, कुंदा इत्यादींसारखा बहुवार्षिक तणांचा प्रादुर्भाव नसावा.
जाती :
आले हे जमिनीत वाढणारे खोड असून त्यावर प्रक्रिया करून ते वापरले जाते.
- सुंठनिर्मितीसाठी आले : करक्कल, नादिया, नरन, वैनाड, मननतोडी, वाल्लुवानाद, एरनाड,कुरूप्पमपाड, रिओ - डी -जानिरिओ, चायना, वैनाड स्थानिक, ताफेन्जिया.
- बाष्पशील असलेल्या तेलाचे जास्त प्रमाण असणार्या जाती : स्लिवा स्थानिक, नरसापटलाम, एरनाड, चेरनाड, हिमाचल प्रदेश.
- जास्त तेलयुक्त जाती : एरनाड, चेरनाडू, चायना, कुरूप्पमपाडी, रिओ - डी - जानिरिओ.
- तंतूचे प्रमाण कमी असणार्या जाती : जमैका, बँकॉक, चायना.
आल्यामध्ये प्रचलित अशा प्रमुख जाती मुख्यत: ज्या भागात ते पिकवले जाते, त्या भागाच्या नावावरून ते ओळखले जाते. उदा.
- आसाम : थिंगपुई, जोरहाट, नादिया, थायलंडीयम मरान.
- वेस्ट बेंगॉल : बुर्डवान.
- केरळ : वैनाड स्थानिक, वायनाड, मननतोडी, एरनाड, थोडूपुझा, कुरूप्पमपाडी.
- कर्नाटक : करक्क्ल.
- आंध्रप्रदेश : नरसपटलम
- महाराष्ट्र : माहीम, स्थानिक, या नावाने ओळखले जाणारे आले घेण्यात येते.
१ ) वरदा : ही जात भारतीय मसाला पिकाचे संशोधन केंद्र, कालिकत येथून १९९६ साली प्रसारित केली आहे. ही जात तयार होण्यास २०० दिवस लागतात.या जाती प्रति हेक्टरी २२.३ टन उत्पादन मिळते. या जातीमध्ये तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० % आढळते. या जातीस सरासरी ९ ते १० फुटवे येतात. ही जात रोग व किडीस सहनशील आहे. सुंठेचे प्रमाण या जातीमध्ये २०.०७% आढळते.
२) महिमा : ही जात सुध्दा कालिकत येथील संशोधन केंद्रातून २००१ साली विकसित करून, प्रसारीत केली आहे. याही जातीला तयार होण्यास २०० दिवस लागतात. या जातीपासून सरासरी प्रती हेक्टरी २३.२ टन उत्पादन मिळते. या जातीमध्ये तंतुचे प्रमाण ३.२६ % असते.
या जातीस सरासरी १२ ते १३ फुटवे येतात. हि जात सुत्रकृमीस प्रतिकारक आहे. सुंठेचे प्रमाण १९ % आढळते.
३) रीजाथा : ही जात मसाला पिकाचे संशोधन केंद्र, कालिकत येथून २००१ साली प्रसारीत केली आहे. या जातीमध्ये तंतुचे प्रमाण ४% असून सुगंधी द्रव्याचे प्रमाण सर्वात जास्त २.३६% आहे.
ही जात तयार होण्यास २०० दिवस लागतात, तर सरासरी उत्पन्न प्रति हेक्टरी २२.४ टन मिळते. या जातीस ८ ते ९ फुटवे येतात. या जातीमध्ये सुंठेचे प्रमाण २३% आहे.
४) माहीम : ही जात महाराष्ट्रामध्ये प्रचलित असून बहुतेक सर्व जिल्ह्यामध्ये ही जात लागवडीस योग्य आहे. ही जात मध्यम उंचीची, सरळ वाढणारी आहे. या जातीस ६ ते १२ फुटवे येतात . ही जात तयार होण्यास २१० दिवस लागतात. तर हेक्टरी सरासरी उत्पादन २० टन मिळते. या जातीमध्ये सुंठेचे प्रमाण १८.७% आहे.
आल्याच्या सुधारीत जाती :
१) सुप्रभा : ही जात कुंडली स्थानिक या जातीमधून निवडली आहे. या जातीच्या झाडाला भरपूर फुटवे असतात. गड्डे जाड असतात आणि त्यांची टोके गोलाकार असतात. साल चमकदार करड्या रंगाची असते. तंतू ४.४%, सुगंधी तेल १.९% व ओली ओरेझीन ८.९% असते. हिरव्या आल्यासाठी व सुंठीसाठी ही योग्य जात आहे. प्रति हेक्टरी ३.४० टन उत्पादन मिळते.
२) सुरुची : ही जात कुंडली स्थानिक या जातीमधून निवडली आहे. गड्डे हिरवट पिवळ्या रंगाचे असतात. ओरेझीन १० % असते. प्रती हेक्टरी २.२७ टन उत्पादन मिळते.
3) सुरभी : स्थानिक जातीचे कंदावर 'एक्सरे' ची प्रक्रिया करून ही जात निवडलेली आहे. गड्ड्यांचा आकार सिलेंडर सारखा असतो. साला गर्द चमकदार असते. भरपूर फुटवे असतात. तंतू ४%, तेल २.१% असते. प्रति हेक्टरी उत्पादन ४ टन मिळते.
वरील सुधारीत जाती मिळण्याचा पत्ता : Director central Plantaiton Crops Research Institute, Post Kudly, Kasaragod (Kerala).
पुर्वमशागत : आल्यासाठी १ फुटापर्यंत खोल उभी व आडवी नांगरट करून १ ते २ कुळवाच्या पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी. स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा.
आल्याचे पीक जमिनीत १८ महिन्यापर्यंत राहू शकत असल्यामुळे आणि या पिकास लागणार्या भुसभुशीत जमिनीमुळे जमीनीच चांगली पूर्व मशागत करणे गरजेचे आहे. शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे, तसेच जमीनतील बहुवार्षिक तणांचे कंद, काश्या वेचून गोळा कराव्यात. मोठे दगड - गोटे वेचून काढावेत.
आले लागवडीच्या पद्धती : जमिनीच्या प्रकारानुसार तसेच स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार आले लागवडीची पद्धत वापरावी. या पिकाची लागवड प्रामुख्याने सपाट वाफे, सारी वरंबा पद्धत आणि रुंद वरंबा किंवा गादी वाफ्यावर केली जाते.
१) सपाट वाफे पद्धत : पठारावरील सपाट जमिनीवरती जेथे पोयटा किंवा वाळू मिश्रीत जमीन आहे. अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करतात. त्यासाठी जमिनीच्या उतारानुसार २ x १ मी. किंवा २ x ३ मी. चे सपाट वाफे तयार करून घ्यावेत. सपाट वाफ्यामध्ये आल्याची लागवड २० x २० सें. मी. किंवा २२.५ x २२.५ सें. मी. अंतरावरती करावी की, जेणेकरून प्रति हेक्टरी रोपांची संख्या दोन लाखाच्या दरम्यान राहील.
२) सरी वरंबा पद्धत : मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने आल्याची लागवड करावी. या पध्दतीमध्ये लाकडी नांगराच्या सहाय्याने ४५ सें.मी. वरती सर्या पाडून घ्याव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून २ इंच खोल आल्याची लागवड करावी. दोन रोपांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे.
३) रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धत : महाराष्ट्रामध्ये काळ्या जमिनीत किंवा आधुनिक सिंचन पद्धत जसे तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर केला जातो, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करणे फायदेशीर ठरते. वरील पद्धतीपेक्षा या पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २०% उत्पादन जास्तीचे मिळते. जमिनीच्या उतारानुसार रुंद वरंब्याची (गाडी वाफ्याची) लांबी ठेवावी. १३५ सें.मी. वरती सारी पाडून घ्यावी, म्हणजे मधील वरंबा ९० सें.मी. रुंदीचा होईल. दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ४५ सें.मी. सोडावी. या रुंद वरंब्याची उंची २० ते २५ सें.मी. ठेवून त्याच्यावरती २२.५ x २२.५ सें.मी. वरती लागवड करावी.
लागवडीचा हंगाम आणि लागवडीची वेळ : ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार आल्याची लागवड १४ एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते. त्यानंतर मात्र आल्याची लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज यांचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आढळून येतो.
सातारा जिल्ह्यात शेतकरी आल्याची लागवड साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या पंधरवाड्यात करतात. अहमदनगर जिल्ह्यात मे चा दुसरा आठवडा लागवडीसाठी योग्य असल्याचे प्रयोगाअंती दिसून आले आहे. आले उगवणीसाठी उष्ण हवा, वाढीसाठी उष्ण व दमत हवा लागत असल्याने पावसानंतर कीड जास्त पडत असल्याने आल्याचे पीक पावसाअगोदर उगवून स्थिर होईल अशा दृष्टीने लागण केली जाते.
लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये. मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत. बियाणे निवडतान कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅमच्या दरम्यान असावे. तसेच लांबी २.५ ते ५ सें.मी. असावी. बियाणे सुप्तावस्थ संपलेले २ ते ३ डोळे फुगलेले निवडावे. लागवडीसाठी २५ क्विंटल / हेक्टरी आले बियाणे लागते. लागवडीच्या वेळेपर्यंत या बियाण्याच्या वजनात घट होवून साठवणुकीच्या पध्दतीनुसार त्याचे वजन १५ ते १८ क्विंटल भरते. आल्याची लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजुला असल्यास त्या डोळ्यापासून निपजणारा कोंब मजबूत असतो आणि त्याची वाढही चांगली होते. याउलट जर डोळा खाली आणि आतल्या बाजुला राहिल्यास डोळा लहान आणि कमकुवत राहतो. कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावे. लागवडीच्यावेळी कंद पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.
बीजप्रक्रिया : जमिनीत लावलेले बेणे सोडू नये, म्हणून बीजप्रक्रिया करावी लागते. मऊसड (सॉफ्ट रॉट). यामुळे बेणे सडण्याचा संभव असतो. त्यासाठी १०० लि. पाण्यामध्ये १ लि. जर्मिनेटर आणि ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट घेऊन त्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बेणे बुडवून ठेवावे. नंतर पाणी निथळून ते बेणे लावणीसाठी वापरावे. साधारणपणे बेणे ३० ते ३५ दिवसात उगवते, पण जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केल्यामुळे १८ -१९ दिवसात उगवते.
सेंद्रिय खते : मध्यम ते हलक्या जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत वरीलप्रमाणे टाकून कल्पतरू सेंद्रिय खत लागणीपुर्वी एकरी ५० किलोच्या २ ते ३ बॅगा आणी लागणीनंतर २ ते २।। महिन्याने उटाळणीच्यावेळी एकरी ५० किलो आणि त्यानंतर २।। ते ३ महिन्यांनी पुन्हा ५० किलो कल्पतरू खत द्यावे. जमीन भारी असेल तर लागणीपुर्वी २ बॅगा आणि २।। ते ३ महिन्यांनी १ ते २ बॅगा द्याव्यात. त्यानंतर २ ते २।। महिन्याने १ म्हणजे आल्याची वाढ, फणीचे पोषण चांगल्या प्रकारे होऊन आले लागण्याचा प्रादुर्भाव कमी होतो.
तणनाशकाचा वापर : आले पिकामध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. शेणखतात तणांचे बी असल्यामुळे आले लागवडीनंतर दुसर्या ते तिसर्या दिवशी जमीन ओलसर असताना अेट्राझीन हे तणनाशक एक लिटर पाण्यामध्ये ४ ते ५ ग्रॅम घेवून फवारणी करावी. त्याचाप्रमाणे लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांनी ग्लायफोसेट १ लिटर पाण्यामध्ये ४ ते ५ मिली घेवून फवारणी केल्यास पहिली फवारणी करूनसुध्दा त्यातून उगवलेल्या तणांचा नायनाट होतो.एकदा आले उगवण्यास सुरुवात झाली की, कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर शक्यतो टाळावा.
पाणी व्यवस्थापन : आले पिकाची लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात जिरायती केली जाते, तर कमी पावसाच्या प्रदेशाच्या मात्र पाणी देण्याशिवाय पर्याय राहत नाही. आल्याची लागवड एप्रिल -मे महिन्यात करत असल्यामुळे पावसाची सुरवात होईपर्यंत सुरूवातीच्या काळात या पिकास पाणी देणे गरजेचे असते. कारण मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो, म्हणून लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसर्या - चौथ्या दिवशी लगेच द्यावे. पावसाळ सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसामध्ये १०ते १२ दिवस खंड पडल्यास या पिकास पाणी द्यावे. हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
आधुनिक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे झाल्यास तुषार सिंचन, ठिबक सिंचन यासारख्या पद्धतींचा अवलंब करावा. गादीवाफा पद्धतीने या पिकाची लागवड करावी, एका गादीवाफ्यावर दोन ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकाव्यात आणि २ लि. / तास एवढेच पाणी देणार्या तोट्या बसवाव्यात. जमिनीच्या मगदुरानुसार हा संच सुरुवातीस अर्धा ते पाऊण तास सकाळ - संध्याकाळ आणि त्यानंतर एक ते दीड तास चालवावा.
आंतरमशागत : तणनाशकांचा वापर केला नसल्यास वेळच्या वेळी चेणारी तणे खुरपणी करून काढून टाकावीत. आले पिकत उटाळणी करणे ही गरजेचे असते. त्यामध्ये लांब दांड्याच्या खुरप्याने माती हलवली जाते. त्यामुळे मुळ्या तुटून त्याठिकाणी नवीन तंतुमयमुळे फुटतात. आले पिकांमध्ये उटाळणी पीक २.५ ते ३ महिन्याचे असताना करावे. या पिकास ६ व्या ते ७ व्या महिन्यात फुले येतात त्यास 'हुरडे बांड' असे म्हणतात. उशीरात उशीरा उटाळणी हुरडे बांड येण्यापूर्वी करावी. हुरडे बांड फुटल्यानंतर या पिकाच्या पानांची वाढ थांबून फण्यांची वाढ होण्यात सुरुवात होते. उटाळणी केली नाही तर उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के घट येते. उटाळणीनंतर पाण्याचा हलका ताण द्यावा, म्हणजे फुटवे चांगले फुटतात.
आंतरपिके : आल्याचे पीक २५ % सावलीच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात वाढते. त्यामुळे हे पीक नारळ, सुपारी, कॉफी इत्यादीच्या बागेमध्ये घेतल्यास उत्पादनात वाढ होते.आल्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर, झेंडू मिरची,,तूर गवार यासारखी पिके घेतात. आंतरपिकाची मुख्य पिकाशी स्पर्धा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
संजीवकांचा वापर : आल्याच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच आल्यामधील तंतुचे प्रमाण कमी करण्यासाठी २% युरिया आणि ४०० पी. पी. एम. प्लॅनोफिक्सचे मिश्रण लागवडीनंतर ६० आणि ७५ व्या दिवशी फवारावे. तसेच फुटव्यांची संख्य वाढण्यासाठी २०० पी. पी. एम. इथ्रेलची ७५ व्या दिवसापासून १५ दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात.
कीड व रोग नियंत्रण :
१) कंदमाशी : या पिकास कंदमाशीसारख्या किडीचा मोठा उपद्रव होतो. या किडीची माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाया शरीरापेक्षा लांब असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखी रंगाचे ठिपके असतात. अंडी पांढरट रंगाची असतात. अळी पिवळसर असून त्यांना पाय नसतात. या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्याच्यावर उपजिवीका करतात.
याचे नियंत्रणासाठी कंदमाशा शेतामध्ये दिसू लागल्यावर माशा मारण्यासाठी क्किनॉलफॉस २५ % प्रवाही २० मि. ली. १०० लिटर पाण्यामध्ये किंवा डायमेथोएट १५ मि. ली. प्रती १० लि. पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान आलटून - पालटून १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात. त्यानंतर क्किनॉलफॉस ५ % किंवा फोरेट १० % दाणेदार हेक्टरी २५ किलो याप्रमाणात झाडाच्या बुंध्याभोवती पसरून टाकावे व पाऊस न पडल्यास लगेच उथळ पाणी द्यावे. याच किटकनाशकाचे पुढील दोन हप्ते १ महिन्याच्या अंतराने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये द्यावेत. अर्धवट कुजके, सडके बियाणे लागवडीस वापरू नये. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीत झाकून घ्यावेत.
२) पाने गुंडाळणारी अळी : आले पिकावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची अळी हिरवट रंगाची असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पाने खाते.
किडीचा प्रादुर्भाव दिसताच गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. तसेच कार्बारील ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी.
३) खोड पोखरणारी अळी : ही कीड मुख्यत: जुलै ते ऑक्टोबर या काळामध्ये आढळते. या किडीची अळी छोट्या खोडाला छिद्र करते आणि त्यावर उपजिवीका करते. त्यामुळे खोड पिवळे पडून वाळण्यास सुरुवात होते. अळीने पडलेल्या छिद्रावर जाळीदार भाग दिसतो.
या किडींच्या नियंत्रणासाठी एक महिन्याच्या अंतराने १.५ मिली मॅलेथिऑन प्रति लिटर पाण्यात किंवा १.५ मिली मोनोक्रोटोफॉस याची फवारणी आलटून पालटून करावी.
सुत्रकृमी : काही भागामध्ये आले पिकावर सुत्रकृमीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सुत्रकृमी हे पिकाच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. तसेच त्यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशीचा सहज शिरकाव होतो. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्यावेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो /हे. शेणखतात मिसळून घ्यावा किंवा फोरेट १० जी हेक्टरी २४ किलो याप्रमाणात द्यावे किंवा १८ ते २० क्विं./ हे. निंबोळी पेंडीचा वापर करावा.
रोग नियंत्रण :
१) कंदकूज : आले तसेच कंद वर्गातील पिकांवरील हा एक प्रमुख रोग आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास या रोगामुळे ५० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. भरपूर पाऊस, भारी काळी कसदार, कमी निचरा असणारी जमीन या रोगास पोषक ठरते. हा रोग ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त परमाणात दिसून येतो. प्रथम पानांच्या शेंड्यावरून व कडांनी पिवळे पडून झाड खालीपर्यंत वाळले जाते. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले, घाणा वास येणारे पाणी बाहेर येते. अशा झाडाचे खोड थोडे जरी ओढले तरी चटकन हातात येते. हा रोग प्रामुख्याने सुत्रकृमी किंवा खुरपणी करताना, आंतरमशागत करताना कंदास इजा झाल्यास त्यातून पिथीयम, फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये शिरकाव होऊन कंद कुजण्यास सुरुवात होते.
या रोगाच्या नियंत्रणासाठी लागवड करताना निरोगी बियाण्याचा वापर करावा. जमिन हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचर्याची निवडावी. पावसाळ्यात शेतामध्ये चर घेवून पाण्याचा निचरा करून घ्यावा. तसेच मेटॅलॅक्सिल ८ टक्के + मॅकोझेब ६४ टक्के हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेन्डेझिम ( ५० डब्ल्यु. पी.) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा मॅकोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर यापैकी एका बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी करवी. लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो प्रति हेक्टरी शेणखतातून मिसळून घ्यावा.
२) पानावरील ठिपके : या रोगाची सुरुवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानावर पसरतो. या रोगामध्ये असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात. रोगाची तीव्रता वाढत गेल्यास हे ठिपके एकत्र येवून संपूर्ण पान करपते.
याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम ४५, १० लिटर पाण्यात २५ ते ३० ग्रॅम किंवा बाविस्टीन १० लिटर पाण्यात १० ते १५ ग्रॅम किंवा १ टक्के बोडोंमिश्रण तयार करून फवारणी करावी. हवामानाच्या परिस्थितिनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारण्या करव्यात. वरील औषधांच्या आलटून- पालटून फवारण्या कराव्यात एकच औषध सतत फवारणीसाठी वापरू नये.
फवारणी : वरील सर्व किडी व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि उत्पादन अधिक व दर्जेदार मिळावे म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.
१) पहिली फवारणी : (बेणे उगवल्यानंतर २१ ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १५० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी : (४५ ते ६० दिवसांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ६०० मिली. + क्रॉंपशाईनर ६०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.
३) तिसरी फवारणी : (७५ ते ९० दिवसांनी ) : थ्राईवर ६०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ६०० ते ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.
४) चौठी फवारणी : (१२० दिवसांनी ): थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १.५ लि. + राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ५०० ते ६०० मिली + ३०० लि. पाणी.
आल्याची काढणी करेपर्यंत दर महिन्याला फवारणी क्र. ४ प्रमाणे फवारणी करावी. म्हणजे आल्याच्या फण्यांची फुगवण,वाढ चांगली होऊन दर्जात वाढ होते. तसेच आले लागू नये याकरीता दर महिन्याला जर्मिनेटर १ लि. आणि कॉपरऑक्झीक्लोराईड १ किलो + हार्मोनी ५०० मिली प्रति एकरी २००लि. पाण्यातून सोडावे.
हवामानातील फेरबदल, पाणी, खतांचे नियोजन आल्याच्या लागवडीचा हेतू (मार्केट, बेणे, प्रक्रिया उद्योग इत्यादी) लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्र अथवा मुख्य कार्यालयाशी संपर्क करून तज्ज्ञांकडून माहिती घेऊनच सर्व व आवश्यक असल्यास पुढील अधिक अथवा कमी जास्त फवारण्यात घ्याव्यात कारण आले हे पीक साधरण १२ ते १८ महिने जमिनीत राहते.
काढणी आणि उत्पादन : आले पीक ७५ टक्के परिपक्क झाल्यानंतर काढणी केली तरी मार्केटला विक्रीसाठी चालते. हिरवे आले म्हणून वापरावयाचे असल्यास पिकाची काढणी ६ महिन्यांनी करता येते. आल्याची विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी लागणीनंतर आठ महिन्यानंतर पुढे आल्याची काढणी करावी.
बाजारातील मागणीप्रमाणे आल्याची काढणी करावी. गड्डे बाहेर काढताना त्यांना इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आल्याचा पाला कापून गड्डे. बोटे (नवीन आले) काढणीनंतर वेगळे करावे. काढणीनंतर आल्याचे कंद स्वच्छ धुवून मातीपासून वेगळे करावेत आणि बाजारात पाठवावे.
प्रति हेक्टरी ओल्या आल्याचे सरासरी उत्पादन १८ ते ३० टनापर्यंत हेते.
द्विहंगामी पीक : उत्तम निचर्याची जमीन असेल तर हेच आले १४ ते १६ महिने जमिनीमध्ये ठेवून आल्याचे द्विहंगामी पीक घेता येते आणि याचे उत्पन्न पहिल्या वर्षापेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दीडपट ते दुप्पट मिळते आल्याची पाने सुकल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी या पिकास पाणी द्यावे.
साधारणत: अडीच ते तीन महिन्यानंतर पुन्हा नवीन फुटवे फुटु लागतात.
आल्याचे बेणे कसे साठवावे.
आल्याची लागवड बेण्यापासून कंदापासून करतात, कारण बियापासून लागवड करता येत नाही. आल्याचे भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी बेणे निरोगी असावे लागते. सामान्यपणे आल्याची काढणी डिसेंबर महिन्यात होते आणि पुढील हंगामातील लागवड एप्रिल - मे महिन्यात होते. तोपर्यंत म्हणजे ४ ते ५ महिने साठवून ठेवावे लागते. या काळात बेण्यातील बाष्पीभवन होऊन बेणे आकसते आणि बुरशीमुळे सडते. परंतु बेण्याची योग्य पद्धतीने साठवण केल्यास ही समस्या राहत नाही. साठवणुकीत बेण्याचे नुकसान होऊ नये म्हणून निरोगी प्लॉटमधून आल्याचे पुर्ण पक्क झालेले कंद निवडावेत.
बेणे साठवण्याची पद्धत : सामान्यपणे शेतकरी खोलीच्या कोपर्यात किंवा छ्प्परात तळाशी वाळूचा पातळ थर देऊन त्यावर बेण्याचा ढीग करतात आणि तो ढीग वाळलेल्या पानांनी झाकतात. काही शेतकरी मोठ्या झाडाच्या सावलीत खड्डा करून त्यात बेणे साठवतात. काही शेतकरी आल्याची काढणी करण्याचे वेळी शेताचा काही भाग काडणी न करताच सोडतात महणजे त्या भागातील आल्याचे कंद काढत नाहीत. पुढील हंगामात लागवडीच्या आधी हे कंद काढून बेण्यासाठी वापरतात. काही शेतकरी बेणे साठविण्यापूर्वी शेणकाल्यात बुडवून काढतात.
बेण्याच्या साठविण्याची पध्दत बेण्याच्या आकारमानाप्रमाणे जमिनीत आवश्यक लांबीचा व रुंदीचा खड्डा खणावा. त्याची खोली मात्र ६० सेंमी ठवावी. ४५ x ४५ x ६० सेंमी आकाराच्या खड्ड्यात २० ते २५ किलो बेणे साठविता येते. खड्ड्याच्या भिंती व तळ शेण व मातीच्या मिश्रणाने सारावाव्यात. त्याप्रमाणे तयार झालेला खड्डा १० ते १५ दिवस वाळू द्यावा.
खड्ड्याच्या तळावर कोरड्या वाळूचा २ सेंमी जाड थर पसरावा. या थरावर बेण्याचा १० सेंमी जाडीचा थर पसरावा. याप्रमाणे बेण्याचा थर व त्यावर वाळूचा थर असे आलटून पालटून खड्ड्यात तळापासून ४५ से ५० सेंमी उंचीपर्यंत थर भरावेत. खड्ड्यावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे. ही फळी व बेण्याचा थर यामध्ये १० सेंमी खोल मोकळी जागा ठेवावी. खड्ड्यातील बेण्याला हवा मिळविण्यासाठी फळीला मधे भोक ठेवावे. खड्ड्यावर वाळलेल्या गवताचे छप्पर तयार करावे. त्यामुळे अकाली पावसापासून बेण्याचे संरक्षण होते.
बेण्याची साठवण : बेण्यासाठी ठेवावयाचे आले काढणीनंतर असणार्या जाड मुळ्या तोडून सावलीत हवेशीर ठिकाणी रचून साठवण करावी. परंतु या पद्धतीने वजनामध्ये २५ ते ३० % घट येते. त्यामुळे आले काढल्यानंतर चांगले निवडलेल्या गड्डे बेण्यावर क्किनॉलफॉस २५ ई.सी. २० मि.ली. आणि कार्बेन्डेझिम ५० डब्ल्यू पी. १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेवून त्यात १० ते १५ मीटर बुडवावेत, त्यांनतर ते सावलीत सुकवावे.
अशा प्रकारे प्रक्रिया केलेल्या बियाण्याची साठवण चार खणून किंवा खड्ड्यात केली असता त्याची उगवण क्षमता चांगली राहते. त्यासाठी सावलीत आपल्या बियाण्याच्या गरजेनुसार आवश्यक तेवढ्या लांबी रुंदीचा व एक मीटर खोलीचा खड्डा काढावा.
खड्डा खोदताना त्या जमिनीतील पाण्याची पातळी एक मीटरपेक्षा खोल आहे. याची खात्री करून घ्यावी. खड्ड्याच्या तळाला व कडेला लाकडाचा भुसा, पालापाचोळा अगर वाळलेले गवत टाकावे. अशा खड्ड्यामध्ये बियाण्याची साठवण करावी. खड्ड्याच्या तोंडावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे व त्यास हवेसाठी छिद्र ठेवावे. खड्ड्यातील आले व फळी यामध्ये अंतर सोडावे की जेणेकरून खड्ड्यात हवा खेळती रहावी. अशाप्रकारे साठविलेल्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली राहते. पत्र्याची सिमेंट, अगर कौलारू बंद खोली बेणे साठवणीसाठी वापरू नये. अडीच ते तीन महिन्यात आल्याच्या कंदाचे डोळे फुगून बारीक कोंब येतात. असे कोंब आलेले आले बेण्यासाठी वापरावे.
आले कंदाचे सरासरी उत्पन्न १५ ते ३० टन प्रती हेक्टर इतके येते. महराष्ट्रात माहिम या जातीचे चांगले उत्पन्न मिळते.
काढणी केल्यानंतर आले पुढीलप्रमाणे करून साठवणूक करता येते.
१) वाळलेले आले
२) सुंठ
३) आल्याची पावडर
वाळलेले आले किंवा सुंठ तयार करावयास वापरावयाचे आले, पीक परिपक्व झाल्यानंतरच काढणी करावी. ते पुर्ण वाढलेले निरोगी असावे. कुजके, सडलेले अपरिपक्व आले सुंठीसाठी वापरू नये. त्याचाप्रमाणे सुंठीसाठी वापरावयाचे आले अधिक तंतुमय असू नये, सुंठ तयार करण्यासाठी जमेका, चायना, रिओडी जानेरो, माहिम यासारख्या कमी तंतुमय असणार्या जातीचा वापर करावा. याच्यापासून उत्तम प्रतिची सुंठ तयार होऊन चांगला बाजारभाव मिळतो.
वाळलेले आले : वाळलेले आले तयार करण्यासाठी प्रथम आले चांगले स्वच्छ धुवून घ्यावे, ते मुळ विरहित असावे. स्वच्छ पाण्यामध्ये एक रात्रभर भिजवून ठेवावे. दुसर्या दिवशी त्याच्यावरील साल बाबुंच्या टोकदार कडाने चिवट्याने खरडून काढावी. परत एकदा स्वच्छ पाण्यात आले धुऊन काढावे. हे साल काढलेले आले ७ ते ८ दिवस उन्हात चांगले वाळवावे. वाळवताना एक ते दीड इंचापेक्षा जाड थर देऊ नये. तसेच आले सुकविणेसाठी स्वच्छ प्लॅस्टिकचा किंवा ताडपत्रीचा वापर करावा. वाळविताना वरचेवर हात घ्यावा. सायंकाळी पसरलेले आले गोळा न करता ताडपत्रीने झाकुन घ्यावे, म्हणजे धुराने काळपट पडणार नाही. आल्यातील पाण्याचा अंश आठ ते दहा टक्क्यापर्यंत कमी आल्यानंतर आले पुर्ण वाळले असे समजावे. पुर्ण वाळल्यानंतर परत एकदा हाताने चोळून घ्यावे. अशा पद्धतीने तयार केलेल्या आल्यास वाळवलेले आले किंवा चुन्याची प्रक्रिया न केलेले आले म्हणतात. असे आले थंड आणि कोरड्या जागेत साठवावे. वाळलेल्या आल्याचे उत्पन्न ओल्या आल्याच्या २० ते २५% इतके असते. हे उत्पन्न आल्याच्या वाणानुसार बदलते.
सुंठ तयार करण्याची मलबार पद्धत : या पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी प्रथम आले स्वच्छ निवडून ८ ते १० तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर त्याची साल काढून घ्यावी. साल काढलेले आले २% चुन्याच्या द्रावणात ६ ते ७ तास भिजत ठेवावे. त्यानंतर द्रावणातून काढून हे आले छोट्या बंद खोलीत पसरून ठेवताना बंद खोलीत आल्याच्या कंदाला १२ तास गंधकाची धुरी देतात थोडक्यात बंद खोलीत गंधक जळत ठेवतात. साधारणत: १ किलो कंदाला ६ ते १० ग्रॅम याप्रमाणात गंधक जाळावे. त्यानंतर कंद बाहेर काढून २% चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत १२ तास गंधकाची धुरी देतात. अशा प्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी लागते. त्यामुळे आल्याच्या कंदास पांढरा शुभ्र रंग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सुर्यप्रकाशामध्ये पाण्याचा अंश ८ ते १० % राहीपर्यंत वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते.
सुंठ तयार करण्याची सोडा खार मिश्रण पद्धती : या पध्दतीने सुंठ तयार करण्यासाठी आले सर्वप्रथम स्वच्छ निवडून घ्यावे. त्यानंतर ८ ते १० तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर १.५ x २ फूट आकाराचा हाताने उचलेल इतक्या क्षमतेचा गॅल्वनाईज जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यामध्ये सोडीयम हयाड्राऑक्साईड (कॉस्टीकसोडा) ची २०%, २५% आणि ५०% तिव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणामध्ये कंदाने भरलेला पिंजरा २०% द्रावणामध्ये पाच मिनीटे, २५% द्रावणमध्ये एक मिनीट आणि ५०% द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले ४% सायट्रीक अॅसिडच्या द्रावणात २ तास बुडवून ठेवावे. त्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सुर्यप्रकाशात वाळत घालावे. चांगले वाळल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते. या पध्दतीने तयार केलेल्या सुंठेला बाहेरच्या देशात चांगली मागणी असते. कारण मलबार पध्दतीने तयार केलेल्या सुंठेत कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते.
आल्याची पावडर : चांगले वाळलेले आले घेवून त्याची बारीक पावडर तयार केली जाते. ती पावडर ५० ते ६० मेशच्या चाळीणीमधून चाळून हवा बंद प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरली जाते. आल्याच्या पावडरीचा मुख्य उपयोग ओलीओरेझीन तसेच तिखट पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.
आद्रकाची साल काढण्यासाठी लागणारी उपकरणे: प्रक्रिया करून विविध पदार्थात वापर करण्यासाठी आद्रकाची साल काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आद्रक रात्रभर पाण्यात भिजवून काढल्यानंतर त्याची साल थोडीशी ढिली होते व काढून टाकण्यास फारसे कष्ट पडत नाहीत व त्यासोबत गराचा अंशही खरवडला जात नाही. साल काढण्यासाठी बांबूची धारदार सुरी किंवा स्टेनलेस स्टीलचा चाकू वापरतात. तसेच शिंपले किंवा कोरड्या स्वच्छ खरबडीत कापडासही घासून साल काढतात. यानंतर स्वच्छ धुवून आद्रक ३ ते ४ दिवस कडक उन्हात वाळवितात. वाळलेल्या आद्रकाची पावडर तयार करून विविध पदार्थ तयार करण्यासाठी ती वापरतात.
सौजन्य - डॉ. बावसकर टेक्नॉलॉजी