Search here..

Friday, January 22, 2016

बाजरी लागवड

मॉन्सून पावसानंतर जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीसाठी शिफारस केलेल्या सुधारित व संकरित वाणांचाच वापर करावा. 

संकरित वाण - 
श्रद्धा (आर.एच.आर.बी.एच. 8609), सबुरी (आर.एच.आर.बी.एच. 8924) शांती (आर.एच.आर.बी.एच. - 9808) ओलिताची सोय असेल अशा ठिकाणी शक्‍यतो संकरित वाण पेरावेत.

पेरणी व बीजप्रक्रिया -
पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करून 45 x 15 सें.मी. अंतराने पेरणी करावी. बाजरीचे वाणानुसार हेक्‍टरी तीन ते चार किलो बियाणे वापरा. बाजरी अधिक तूर 2:1, 2:2 या प्रमाणात आंतरपीक घ्यावी. कोरडवाहू बाजरीसाठी सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.अरगट रोग नियंत्रणासाठी 20 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी. गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी सहा ग्रॅम मेटॅलॅक्‍झील 35 एसडी (बीजप्रक्रियेसाठीचे) प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यावर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धक व 250 ग्रॅम स्फुरद जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन -
शिफारशीप्रमाणे वरखते वेळेवर द्यावीत. हलक्‍या जमिनीसाठी 40 किलो नत्र, 20किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. मध्यम जमिनीसाठी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे.

आंतरमशागत -
पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी गरजेनुसार विरळणी करावी किंवा नांग्या भरून दोन रोपांतील अंतर 12-15 सें.मी. ठेवावे. जमिनीत चांगली ओल असल्यास विरळणी केलेली रोपे नांग्या भरण्यास वापरता येतात. तीस ते चाळीस दिवसांपर्यंत पीक तणविरहित राहण्यासाठी खुरपणी किंवा डवरणी करावी. एक महिन्यानंतर पिकास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. कोरडवाहू पिकास युरिया देताना जमिनीत चांगली ओल असणे गरजेचे आहे. 

हंगाम ----माध्यान्ह---- उपाययोजना -
चांगल्या उगवणीनंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर मृद्‌बाष्पाची गरज भागविण्यासाठी डवरणी करून जमिनीचा वरचा पापुद्रा मोकळा करावा. यालाच डस्ट मल्चिंग म्हणतात. पिकातील काढलेले तण दोन ओळींत पसरून ठेवावे. डवरणी करताना डवऱ्याला खाली दोरी बांधल्यास पिकाला मातीची भर बसेल व पडणाऱ्या पावसाचे पाणी तयार झालेल्या सरीमध्ये व्यवस्थित मुरले जाऊन त्याचा उपयोग पिकाच्या पुढील वाढीच्या काळात होतो. 

पाणी व्यवस्थापन -
बाजरी पिकास फुटवे येण्याची वेळ, पीक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. या अवस्थेत जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पिकास संरक्षित ओलित म्हणून पावसाचा अंदाज बघून हलकेसे पाणी द्यावे. 

आंतरपीक -
अन्नद्रव्यासाठी व जागेसाठी स्पर्धा नसलेला कालावधी या तत्त्वानुसार बाजरी + तूर ही आंतरपीक पद्धती सर्व दृष्टीने फायदेशीर आहे. यासाठी बाजरी व तूर यांची आंतरपीक म्हणून पेरणी करताना याचे ओळीचे प्रमाण 2ः1 (बाजरी ः तूर) किंवा 4ः2 ठेवावे. या प्रमाणेच बाजरीत सोयाबीन, सूर्यफूल ही पिकेसुद्धा 4ः2 या प्रमाणात आंतरपीक म्हणून घेता येतात. 
हलक्‍या जमिनीत आणि कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात बाजरी + मटकी 2ः1 या प्रमाणात आंतरपीक अवलंब करावा. 

तणनाशकाचा वापर -
गरजेनुसार बाजरी पिकात तणनाशकांचा वापर करता येतो. यासाठी ऍट्राझीन किंवा सिमाझीन हे उगवणपूर्व (पेरणीनंतर परंतु बी उगवण्यापूर्वी) तणनाशक हेक्‍टरी 1.5 ते 2 किलो 600 ते 700 लिटर पाण्यासोबत फवारावे. फवारणी नंतर 15 ते 20 दिवस पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये. तसेच पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 2,4-डी (फक्त सोडिअम साल्ट) हे उगवणपश्‍चात तणनाशक हेक्‍टरी 1250 ग्रॅम या प्रमाणात 600 लिटर पाण्यासोबत तणावर फवारावे. तणनाशक फवारणीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला अवश्‍य घ्यावा.