लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे नियोजन करून परिसरातील आठवडे बाजारात थेट विक्री करून नफा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दुष्काळी परिस्थितीतही माळी कुटुंबीयांनी सुयोग्य नियोजनातून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करीत आर्थिक स्थैर्य जपले आहे.
नवनाथ माळी, ९३०९८३२९८१
सौ. सकाळ न्युज नेटवर्क
लातूर जिल्ह्यातील चापोलीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरगा (यल्लादेवी) येथील गोरख माळी यांची तुकड्यात विभागलेली पाच एकर शेती आहे. माळी कुटुंबातील सर्व सदस्य पीक लागवड व व्यवस्थापन करतात, तर निलावती व त्यांची सून यांनी विक्रीची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. माळी कुटुंबीय परिसरातील आठवडी बाजारातील मागणीचा विचार करून हंगामनिहाय विविध भाजीपाला पिकाची लागवड करतात. त्यामुळे वर्षभर भाजीपाल्याला मार्केट उपलब्ध होते.
सिंचन व्यवस्था
गोरख माळी यांच्या शेतात दोन विहिरी आहेत. २०१५ मध्ये घेतलेल्या विहिरीला सुदैवाने पाणीही लागले. एक विंधन विहीर असून, त्याचे पाणी विहिरीत साठवले जाते. त्यामुळे मुबलक पाणीसाठा आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करून वर्षभर भाजीपाल्याची लागवड केली जाते. पिकाला पाणी देण्यासाठी तुषार आणि ठिबक सिंचनाची सोय केली आहे.
थेट विक्रीवर भर
निलावती माळी भाजीपाल्याची विक्री स्वतः विविध आठवडी बाजारात करतात. दर सोमवारी अहमदपूर, बुधवारी चापोली, गुरुवारी शिरूर ताजबंद, शुक्रवारी चाकूर व रविवारी हाळी या आठवडे बाजारात भाजीपाल्याची विक्री केली जाते. भाजीपाला ताजा व योग्य दारात मिळत असल्याने विविध गावांतील ग्राहक जोडले गेले आहेत. आठवड्यातून पाच आठवडी बाजार करीत असल्याने वर्षभर ताजा पैसा मिळतो.
शेतीचे नियोजन
गोरख माळी व निलावती माळी हे पती-पत्नी, तसेच नवनाथ व यशोदा हे मुलगा व सून सर्व जण एकत्र राहतात. शेतातच घर असल्याने पिकांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. भाजीपाला लागवडीपासून ते तोडणीपर्यंतची सर्व कामे घरीच केली जातात. शेतात मजूर किंवा सालगडी नाही. त्यामुळे मजुरीवरचा मोठा खर्च वाचतो.
शेळीपालनाची जोड
माळी कुटुंबीयांनी शेतीला दहा वर्षांपासून शेळी पालनाची जोड दिली आहे. दोन शेळ्यांपासून सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे दहा शेळ्या व एक बोकड आहे. आतापर्यंत त्यांनी १९ बोकडांची विक्री केली, त्यातून अतिरिक्त कमाई झाली.
माळी कुटुंबीयांचा दिनक्रम
गोरख माळी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य पहाटे चार वाजता उठतात. दूध काढणे व साफसफाई करून जनावरांना चारा-पाणी करतात. नंतर विक्रीसाठी ताज्या भाजीपाल्याची तोडणी केली जाते. भाजीपाल्याची प्रतवारी करून सर्व सदस्य भाजीपाला बाजारात घेऊन जातात. निलावती या विक्रीसाठी बाजारात बसतात, तर उर्वरित सदस्य दिवसभर शेतातील इतर कामकाज करतात.
असे आहे पीक नियोजन
एकूण क्षेत्र पाच एकर
ऊस एक एकर
भाजीपाला साडेतीन एकर
गलांडा फुले अर्धा एकर
भाजीपाला लागवड नियोजन
जून – वांगे, कांदा, भेंडी, गवार, भोपळा, मिरची, मेथी, शेपू, कोथिंबीर, चवळी, फ्लॉवर.
ऑक्टोबर – कांदा, गाजर, भोपळा, कोबी, वरणा, वाटाणा, पालक, चुका, कोथिंबीर, मुळा, बीट.
फेब्रुवारी – पालक, गवार, दोडका, कारले, पडवळ, कोथिंबीर, कोबी, मुळा, चवळी, काकडी.
गलांडा फुलाची वर्षभर लागवड.
बांधावर फळझाडांची लागवड
शेतातील बांधावर विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली आहे. त्यात आंब्याची ५० झाडे, चिंच २५, बोर ५, पेरू १०, नारळ १०, जांभूळ ५, शेवगा १५, चंदन ५०, सागवान २५; तर रामफळाची १० झाडे लावली आहेत. फळांची हंगामानुसार विक्री करून त्यातून अतिरिक्त नफा मिळतो. आठवडी बाजारातच या फळांची ते स्वतः विक्री करतात.
अर्थकारण
प्रत्येक आठवडी बाजारातून किमान एक हजार रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट असते. काही वेळा किंवा सणासुदीला ते दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत जाते. दरही ग्राहकांना परवडेल असेच असतात. महिन्याला १५ ते २५ हजार रुपये मिळतील, असे नियोजन असते. मागील पाच वर्षांपासून एक एकर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते. पाच वर्षांत सरासरी ६० ते ७० टनांचे उत्पादन झाले. यंदा दोन हजार रुपये टनप्रमाणे कारखान्याला ऊस विक्री केली आहे. उसामध्ये गवार, चवळी, कांदा व हरभरा ही आंतरपिके घेतली जातात.
‘ऍग्रोवन’ खरा मार्गदर्शक
यापूर्वी ढोबळमानाने भाजीपाल्याची लागवड व विक्री केली जात असे. गेल्या वर्षापासून माळी अॅग्रोवन वाचतात. त्यातील भाजीपाला पिकाची माहिती अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात वाढ झाली आहे.
पशुधनापासून सेंद्रिय खताची उपलब्धता
माळी यांच्याकडे दोन बैल, दोन म्हैस व दहा शेळ्या आहेत. त्यामुळे शेतीला घरच्याघरी शेणखत उपलब्ध होते. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होत असून, जमिनीची सुपीकता टिकून राहत आहे.
शेती व्यवस्थापनातील बाबी
- दर वर्षी उन्हाळ्यात शेणखत मिसळले जाते.
- रासायनिक खतांचा कमीत कमी वापर.
- उपलब्धतेनुसार गांडूळ खताचा वापर.
- शेतातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष.
- ताजा व प्रतवारी केलेला भाजीपाला. त्यामुळे मागणी चांगली.
- बीजप्रक्रिया करून भाजीपाला बियाण्यांची लागवड
- आठवडी बाजारातील दरांवर लक्ष ठेवून भाजीपाला लागवडीचे नियोजन
सणांसाठी विशेष नियोजन
श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते. याकाळात विशिष्ट भाजीपाल्याला मागणी असते. मुळा, काकडी, गवार, भेंडी आदी भाजीपाल्याला मागणी असते. दर वर्षी बाजारात फारशी आवक न होणाऱ्या, परंतु मागणी असलेल्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत चांगला नफा ते कमावतात. गौरी-गणपती, नवरात्र महोत्सव व त्यानंतर दसरा-दिवाळी आदी सणांच्या काळात भाजीपाल्याबरोबरच फुलांनाही चांगली मागणी असते. गलांडा फुलांना किलोला ५० ते ६० रुपये प्रमाणे भाव मिळतो.